परक्राम्य पत्रे: पोच किंवा पृष्ठांकन केल्याने ज्यांच्या स्वामित्वात बदल करता येतो, असे दस्तऐवज. उदा., वचनचिठ्ठ्या, हुंड्या व धनादेश. त्यांचे मुख्यत: दोन गुणधर्म आहेत : (१) सुलभ रीतीने त्यांचे हस्तांतर करता येते. (२) त्यांचा धारक हा त्या पत्रांप्रमाणे मिळणाऱ्या संपूर्ण हक्कांचा स्वामी होतो. हा दुसरा गुणधर्मच परक्राम्य पत्रांना इतर दस्तऐवजांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त करून देतो.
परक्राम्य पत्रांचे साधे रूप म्हणजे लेखी हक्क. हे हक्क केवळ पैशासंबंधीचेच असतात आणि ते जर इतर गोष्टींसंबंधी असतील, तर तो दस्तऐवज परक्राम्य पत्रात बसू शकणार नाही. उदा., जमीन विकत घेण्यासंबंधीचे खरेदीखत हे परक्राम्य पत्र नव्हे.
परक्राम्य पत्रांचा विशेष गुणधर्म म्हणजे धारकास मिळणारे संपूर्ण हक्कांचे स्वामित्व. यामुळेच परक्राम्य पत्रे ही केवळ हस्तांतरित होणाऱ्या पत्रांहून आणि अभिहस्तांकन केल्यावर दुसऱ्यांस हक्क देणाऱ्या पत्रांहून भिन्न होत.
परक्राम्य पत्रांचे गुणधर्म त्यांस पुष्कळच महत्त्व प्राप्त करून देतात. ही पत्रे जवळजवळ चलनी नाण्यांसारखीच असल्याने त्यांची जलद देवाणघेवाण होते आणि म्हणूनच व्यापार-उद्योगधंदे करणारे इसम परक्राम्य पत्रांचा वापर करतात.
भारतात परक्राम्य लेख अधिनियमान्वये परक्राम्य पत्रांचे तीन प्रकार सांगितले आहेत. वचनचिठ्ठी, हुंडी आणि धनादेश.
वचनचिठ्ठी: परक्राम्य पत्रांपैकी एक. ज्यावर लेखकाने स्वत: सही करून एखाद्या व्यक्तीस किंवा तिने आदिष्ट केलेल्या किंवा वाहकास पैशाची निश्चित रक्कम कोणत्याही अटीशिवाय देण्याचे वचन दिलेले असते, असे पत्र. हे वचन पैसे वचनचिठ्ठी दाखविल्याबरोबर देण्याचे किंवा काही निर्दिष्ट मुदतीनंतर देण्याचे असतात. दर्शनी वचनचिठ्ठी दाखविल्याबरोबर पैसे द्यावे लागतात परंतु मुदती वचनचिठ्ठीच्या बाबतीत निर्दिष्ट मुदतकाळ संपल्यानंतरच पैसे द्यावे लागतात. वाहकास पैसे देण्याचे वचन असलेली दर्शनी वचनचिट्ठी काढण्याचा अधिकार फक्त शासनाकडे असतो. एखाद्या पत्रास वचनचिठ्ठी म्हणता येण्यासाठी खालील बाबींची पूर्ती होणे आवश्यक आहे : (१) लेखी पत्र. (२) रक्कम देण्याचे वचन : केवळ देण्यासंबंधी उल्लेख किंवा कबुली नसावी. (३) पैसे देण्याचे अटींविरहित निश्चित वचन. (४) वचनचिठ्ठी लिहून देणाऱ्याची सही. (५) वचन देणाऱ्याचा नामनिर्देश. (६) देय रकमेची निश्चिती. (७) रकमेची फेड रोखीने करण्याचे वचन. (८) ज्यास रक्कम द्यावयाची त्याचा नामनिर्देश. वचनचिठ्ठी कोठे लिहिली, त्या गावाचे नाव तीवर घालण्याचा प्रघात आहे पण ते नसल्यास ती अवैध ठरत नाही. तसेच पैसे अमुक ठिकाणी मिळतील असा उल्लेख असला, तरी ती वैध समजण्यात येते.
वचनचिठ्ठीचा परक्राम्य पत्रांमध्ये समावेश होत असल्याने धनादेशाप्रमाणे पृष्ठांकन करून व पोच देऊन तिचे हस्तांतरण करता येते. परंतु बनावट पृष्ठांकनाच्या बाबतीत धनादेशाचे पैसे देणाऱ्या बँकरला जे संरक्षण कायद्याने दिले आहे, ते वचनचिट्ठीवरील बनावट पृष्ठांकनाच्या बाबतीत मिळू शकत नाही. वचनचिठ्ठी करणाऱ्याने पैसे देण्यास अनादर केला, तर वचनचिठ्ठी धारकाने अनादराची नोटीस तिच्याशी संबंधित असणाऱ्या इतर सर्वांना दिली पाहिजे.
हुंडी: एका इसमाने आपल्या सहीने दुसऱ्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीस अथवा ती व्यक्ती सांगेल त्या व्यक्तीस, किंवा तो दस्तऐवज घेऊन येणाऱ्यास पैशातच द्यावयाची एक विशिष्ट रक्कम देण्यासंबंधी केलेली अटींविरहित लेखी आज्ञा. म्हणून हुंडीमध्ये खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक ठरते : (१) अटींविरहित लेखी आज्ञा, (२) जीस आज्ञा केली असेल अशा व्यक्तीचे नाव, (३) आज्ञा करणाऱ्या व्यक्तीची सही, (४) आज्ञेप्रमाणे द्यावयाच्या ठराविक रकमेचा उल्लेख आणि (५) पैसे कोणास द्यावयाचे त्याचे नाव.
या इसमास हुंडी बेचन करून किंवा केवळ हुंडीचे हस्तांतर करून दुसऱ्याच इसमास त्या हुंडीचे पैसे वसूल करण्याचा अधिकार देता येतो. म्हणूनच हुंड्या या बाजारात चलनी नाण्यांसारख्या पैशाच्या देवघेवींचे व्यवहार सहज रीतीने करतात.
धनादेश: धनादेश म्हणजे एका विशिष्ट बँकेवर मागणी करताच पैसे उपलब्ध करून देणारी दर्शनी हुंडी. यामुळे धनादेशाच्या स्वीकृतीची जरूरी नसते.
धनादेश अथवा हुंडी यांमध्ये जो आज्ञा देतो तो इसम आणि ज्यास आज्ञा दिली आहे असा इसम यांत मुख्यत: धनको-ऋणकोंचे नाते असते कारण त्याशिवाय आज्ञापालन होऊच शकणार नाही. धनादेश बँकेवर काढल्यावर तो ज्या बँकेवर काढला असेल, त्या बँकेमध्ये जर खातेदाराने (म्हणजेच धनादेश काढणाऱ्या इसमाने) पुरेसे पैसे शिल्लक ठेवले नसतील, तर बँक धनादेशाचे पैसे देणार नाही. बँकेने खातेदारास ठराविक मर्यादेपर्यंत तारणावर अथवा तारणाशिवाय ज्यावेळी कर्ज देण्याचे मान्य केलेले असते, त्यावेळी त्या मर्यादेपर्यंत जणू काही खातेदाराची रक्कम बँकेकडेच ठेव म्हणून आहे, अशा समजुतीवर बँक त्या मर्यादेपर्यंत खातेदाराच्या धनादेशाचे पैसे देते. मात्र ती मर्यादा ओलांडली की, बँक खातेदाराच्या आज्ञा पाळू शकत नाही आणि धनादेशाचे पैसे देत नाही.
धनादेश वा हुंड्या व वचनचिठ्ठ्या या दोन प्रकारच्या असू शकतात :
(२) दर्शनी (बेअरर) : यांचे पैसे आदात्यास वा दाखविणाऱ्यास द्यावयाचे असतात.
परक्राम्य पत्राचे पैसे (१) आदाता अथवा पत्रवाहक यास द्यावयाचे असतील, तर त्या पत्राने पैसे घेण्याचे अधिकार केवळ हस्तांतराने दुसऱ्या इसमास देता अथवा घेता येतात. परक्राम्य पत्र नामजोग असल्यास अशा पत्राचे पैसे देण्या-घेण्याचे अधिकार हे पृष्ठांकन आणि हस्तांतर यांद्वारे दिले-घेतले जातात. पृष्ठांकन हे मुख्यत: दोन प्रकारचे असते. संपूर्ण पृष्ठांकन आणि कोरे पृष्ठांकन.
संपूर्ण पृष्ठांकनात प्रथम धारक ज्या दुसऱ्या धारकास हे अधिकार देणार असतो, त्याचा नामनिर्देश करून आपली सही करतो आणि त्यास त्या पत्राचा धारक करण्याच्या दृष्टीने ते परक्राम्य पत्र देतो. कोरे पृष्ठांकन म्हणजे प्रथम धारक त्या पत्रावर स्वत:ची केवळ सही करतो आणि आता त्याचे पैसे कोणास द्यावयाचे याचे नाव पृष्ठांकन करताना लिहीत नाही. याचाच अर्थ पत्रवाहकास ते पैसे मिळतील असा असल्याने त्यास ‘कोरे पृष्ठांकन’ असे संबोधले जाते. याचा परिणाम असा होतो की, कोऱ्या पृष्ठांकनाने परक्राम्य पत्राचे नामजोग रूप नाहीसे होऊन त्यानंतर ते परक्राम्य पत्र ‘दर्शनी’ होते. म्हणजेच आता यापुढे अधिकार पुन्हा एखाद्या तिसऱ्या इसमास द्यावयाचे असल्यास केवळ हस्तांतराने हे अधिकार दिले-घेतले जातात. या प्रकाराखेरीज धनादेश हा रेखांकित अथवा अरेखित असू शकतो. ज्यावेळी धनादेशावर दोन समांतर रेषा काढलेल्या असतात, त्यावेळी त्यास रेखांकित धनादेश म्हणतात. अशा प्रकाराचे रेखांकन सर्वसाधारण रेखांकन असते. या दोन रेघांमध्ये ‘आणि कंपनी’ अथवा त्याबद्दलचे लघुरूप किंवा ‘नॉट-निगोशिएबल’ असेही कधीकधी लिहिले जाते. त्यावेळी हे शब्द रेखांकनाचेच भाग म्हणून समजले जातात. याखेरीज रेखांकन ‘विशिष्ट’ (स्पेशल) असते म्हणजे या दोन रेघांमध्ये एखाद्या बँकेचे नाव लिहिलेले असते. ज्यावेळी धनादेश हा सर्वसाधारण रेखांकित असतो, त्यावेळी ज्या बँकेवर तो काढला असेल, ती बँक धनादेशाची रक्कम बँकखात्यावर जमा करण्यासाठीच देते. म्हणजेच धारकास रोख पैसे न मिळता ते त्याच्या बँकेमार्फत मिळवावे लागतात. धनादेश ज्यावेळी विशिष्ट रेखांकित असतो, त्यावेळी दोन रेघांमध्ये असणाऱ्या बँकेसच किंवा बँकेच्या प्रतिनिधी बँकेसच त्या धनादेशाची रक्कम बँकखात्यावर जमा करण्यासाठी दिली जाते. रेखांकनात ‘अकाउंट पेई’ किंवा ‘पेई’ हे शब्द वापरले असल्यास त्या धनादेशाचे पैसे फक्त आदात्याच्या खात्यातच जमा होऊ शकतात. साहजिकच आदात्यास असा धनादेश पृष्ठांकन करून दुसऱ्या कोणाकडे हस्तांतरित करता येत नाही.
हुंडीचे मुख्य प्रकार खालील गोष्टींवर अवलंबून आहेत : (१) स्थळ, (२) काळ, (३) व्यक्ती आणि (४) उद्देश.
(१) स्थळ हुंडी : या प्रकारात अंतर्देशीय हुंडी व विदेशीय हुंडी हा प्रकार संभवतो. अंतर्देशीय हुंडी म्हणजे जी भारतात काढली गेली आहे आणि जिचे पैसे भारतात द्यावयाचे आहेत अथवा जी भारतीय व्यक्तीवर काढली आहे, अशी हुंडी अशी जर नसेल तर ती विदेशीय हुंडी.
(२) काळ हुंडी : ही दोन प्रकारची असते. दर्शनी हुंडी अथवा मुदती हुंडी. दर्शनी हुंडीचे पैसे दाखविल्याबरोबर मिळतात परंतु मुदती हुंडीचे पैसे हुंडी दाखविल्यानंतर हुंडीत लिहिलेला विशिष्ट कालावधी संपल्यावर मिळतात. म्हणजे मुदती हुंडीमध्ये पैसे देण्यासाठी काही ठराविक मुदत हुंडीनेच दिलेली असते व ती मुदत संपल्यावर मात्र मुदती हुंडी ही दर्शनी हुंडीसारखीच होते.
(३) व्यक्ती हुंडी : हा प्रकार आधीच सांगितल्याप्रमाणे नामजोगहुंडी अथवा दर्शनी हुंडी असा आहे.
(४) उद्देश हुंडी : या प्रकारामध्ये हक्कपत्रासहित हुंडी अथवा कोरी हुंडी (क्लीन बिल) असे भाग पडतात. यांशिवाय व्यवहारासाठी काढलेली हुंडी आणि केवळ पैसे उभे करण्यासाठी काढलेली हुंडी, असेही भाग पडू शकतात. भारतामध्ये शाहाजोग हुंडी, जबाबी हुंडी, मुलतानी हुंडी, जोखमी हुंडी असेही विविध प्रकार आहेत. कारण हुंडीव्यवहार हा भारतामध्ये फार पुरातन काळापासून चालत आला आहे.
ह्या विविध प्रकारांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे प्रत्येक प्रकारानुरूप धारकास असणारे भिन्नभिन्न अधिकार हे आहे. प्रकार कोणताही असो, हुंडीचे मुख्य रूप म्हणजे पैसे वसुलीसंबंधी असणारे व मिळणारे अधिकार हेच आहे आणि त्याच कारणाने बँका हे अधिकार विकत घेऊन हुंडी-खरेदीत आपल्या पैशाची गुंतवणूक करतात आणि त्यावर व्याजरूपाने किंवा कसररूपाने पैसे मिळवितात. अर्थात बँका या हुंड्या विकत घेताना त्यांची योग्य प्रकारे तपासणी करून घेतात. या तपासणीमध्ये मुख्यत: खालील गोष्टींची पाहणी केली जाते: (१) हुंडी ज्याच्याकडून विकत घ्यावयाची त्याची पत, (२) हुंडी ज्या इसमावर काढली असेल त्याची पत, (३) हुंडीची रक्कम, (४) हुंडी केव्हा वसूल व्हावयाची ती मुदत, (५) हुंडीवर असणाऱ्या सह्यांची-पृष्ठांकनांची पत आणि (६) हुंडी काढण्यामागे असलेला उद्देश.
वरील गोष्टींची तपासणी केल्यावर बँक विपत्र किंवा हुंड्या विकत घेते आणि विकत घेत असताना ती हुंडी दर्शनी असल्यास बँकेच्या ठरलेल्या दराने हुंडीच्या रकमेवर पैसे आकारून उरलेली रक्कम खातेदाराच्या नावाने जमा करण्यात येते परंतु हीच मुदतहुंडी असल्यास बँक तीवर कसर (डिस्काउंट) आकारते. कसरीचा दर हा मुदतीवर अवलंबून असतो. जास्त मुदत असल्यास कसरीची रक्कम जास्त व कमी मुदत असेल तर त्या मानाने कसरीची रक्कम कमी असते. बँकांकडे साधारणपणे जेवढ्या रकमा ठेवी म्हणून स्वीकारलेल्या असतात, त्यांपैकी सु. १० ते १५% ठेवीइतकी रक्कम विपत्र अथवा हुंड्यांची खरेदी यात गुंतविली जाते. हुंड्या खरेदीचे एकूण कर्जाशी प्रमाण तेजीकाळात सु. १५ ते २०% इतके असते आणि मंदीकाळात ते १०% इतके असते. ३० जून १९७५ या दिवशी सर्व बँकांच्या धंद्यात कर्जे ९,२३३ कोटी रुपयांची होती. त्यांपैकी १,६८७ कोटी रुपये हे अंतर्देशीय (१,३६७ कोटी), विदेशीय (३२० कोटी) व हुंड्यांच्या खरेदीमध्ये बँकांची रक्कम गुंतलेली होती. याच दिवशी सर्व बँकांच्या एकूण ठेवी या १२, ७७३ कोटी रुपयांच्या होत्या. यांखेरीज बँका ज्या वेळी हुंड्या खरेदी करतात, त्या वेळी व्यापारास चालना मिळते आणि वेळोवेळी वसूल झालेली रक्कम पुनःपुन्हा हुंड्यांच्या खरेदीत गुंतविण्यात येते. हे लक्षात घेतले म्हणजे विपत्राच्या किंवा हुंड्यांच्या आधारे व्यापारास अथवा उद्योगधंद्यास कोणत्या प्रकारचे साहाय्य होते, हे कळून येईल.
हुंडी व विपत्र: (बिल्स ऑफ एक्स्चेंज). यांत वस्तुत: तत्त्वाचा फरक नाही. थोडाफार फरक अथवा फेरफार हा तपशिलासंबंधीचाच आहे. उदा., शहाजोग हुंडीचे पैसे ‘शहा’ स अथवा सचोटीच्या माणसासच फक्त मिळतात. याचाच अर्थ पैसे देणारा ज्यास पैसे देतो, त्याच्या सचोटीची तो खात्री करून मगच पैसे देतो. जोखमी हुंडीने जबाबदारी दाखविली जाते आणि या जोखमी दस्तऐवजाने (डॉक्युमेंटरी बिल्स) माल पोहोचल्यावरच त्याचे पैसे मिळतात अथवा दिले जातात. जबाबी हुंडीमुळे रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविता येते आणि त्याबद्दलची पोचपावतीही पैसे पाठविणारास मिळू शकते. एवढ्या तपशिलांचा फरक सोडला, तर इतर प्रकारचे विशिष्ट अधिकार वरीलप्रमाणेच आहेत. यांशिवाय हुंडीचा आणखी एक प्रकार म्हणजे मुलतानी हुंडी हा आहे. इतर हुंड्या ह्या मालापोटी काढलेल्या असतात परंतु मुलतानी हुंडीचे स्वरूप सावकारी हुंडी असे असते. म्हणजेच उसनवार दिलेले पैसे वसूल करण्यासाठी मुलतानी हुंड्या वापरल्या जातात.
परक्राम्य लेखांचा वापर करणाऱ्यांना कायद्याचा आधार व संरक्षण आवश्यक वाटते कारण कायद्यानुसार त्यांना आपले हक्क प्रस्थापित करणे सोपे जाते. भारतात १८८१ च्या परक्राम्य लेख अधिनियमामध्ये परक्राम्य लेखांसंबंधी कायदेशीर तरतूद आहे परंतु जे परक्राम्य लेख या अधिनियमात केलेल्या धनादेश, हुंडी किंवा वचनचिठ्ठी यांच्या व्याख्येबरहुकूम नसतात, त्यांना या कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत. उदा., पतपेढ्यांच्या हुंड्या, ऋणपत्रे, राजपत्रे, डाकप्रेष (पोस्टल ऑर्डर), भागपत्रे (शेअर सर्टिफिकेट), सर्टिफिकेट, ठेवपत्रे इत्यादी. शिवाय हा कायदा होऊन आता ९७ वर्षे झाली असून या कालावधीत बँका आणि व्यापारी यांच्या व्यवहारांत पुष्कळच फेरफार झाले असल्यामुळे या कायद्यात सुधारणा करणे निकडीचे झाले आहे. भारतीय अधिनियम आयोगाने यासंबंधीचा अहवाल १९५८ मध्येच शासनाला सादर केला असला, तरी १८८१ च्या अधिनियमात अद्याप दुरुस्ती व्हावयाची आहे. परक्राम्य लेखांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारातही होत असल्याने शक्यतोवर विविध राष्ट्रांतील याविषयींचे कायदे समान व सुसंगत असणे व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असते. ब्रिटनने १९५७ मध्ये धनादेश अधिनियम (चेक ॲक्ट) करून व अमेरिकेने वेळोवेळी आपल्या एकसमान परक्राम्य लेख अधिनियमात (युनिफॉर्म निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स लॉ) सुधारणा करून कालानुरूप फेरबदल केले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही ह्या प्रश्नाचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे भारतीय बँकिंग आयोगाने आपल्या १९७२ च्या अहवालात सुचविले आहे.
करमरकर, वि. मो. धोंगडे, ए. रा.
“