विनिमय: (एक्स्चेंज). वस्तूंची अथवा सेवांची आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण. जसजशा आर्थिक गरजा वाढू लागल्या व त्यांच्यात विविधता येऊ लागली, तसतशी उत्पादन कार्यातील श्रमविभागणीवाढू लागली. काही विशिष्ट ठिकाणी ठराविक उद्योगांचे केंद्रीकरण होऊ लागल्यामुळेही प्रादेशिक तत्त्वावर श्रमविभागणी अस्तित्वात आली. प्रत्येक विशेषीकृत उत्पादन करणारी व्यक्ती त्या वस्तूविषयीची स्वतःची गरज भागवून उर्वरित उत्पादन-राशी अन्य वस्तूंच्या उत्पादकांना देऊ करत असे व त्याबदली त्यांच्याकडून उत्पादित अन्य वस्तू स्वीकारत असे. पुरातनकाळी जेव्हा खेडी स्वयंपूर्ण होती, तेव्हा देखील खेडेगावात शेतकरी, सुतार, लोहार, विणकर, मेंढपाळ, कोळी, कुंभार असे निरनिराळे कामकरी होतेच. शेतकरी अन्नधान्य पिकवी, तर लोहार शेतकऱ्यांसाठी नांगराचे फाळ आणि कोयती, फावडी वगैरे अवजारे तयार करी. अशा रीतीने कामकरी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करून आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी त्यांची आपसांत अदलाबदल करीत असत. या देवाणघेवाणीला ⇨वस्तुविनिमय (बार्टर) असे संबोधण्यात येते.
वस्तुविनिमयामुळे अनेक गैरसौयी निर्माण झाल्या. कोणत्याही वस्तूचे मूल्य निश्चित होणे व ते स्थिर राहणे अवघड जाई, वस्तूंची प्रत्यक्ष देवघेव होण्यासाठी निरनिराळ्या गरजवंतांची एकाच ठिकाणी गाठ पडावी लागे, नाशिवंत वस्तूंच्या बाबतीत तर द्रव्याचा साठा करण्याची सोय नव्हती, भावी काळात देणीघेणी मिटविता येणे. दुष्कर होते. या गैरसोयी दूर होण्यासाठी ज्याचे मूल्य स्थिर राहील अशा एखाद्या वस्तूची विनिमय-माध्यम म्हणून आवश्यकता भासू लागली. आधुनिक काळात ⇨पैसा हे विनमयाचे माध्यम झालेले आहे. विनिमयाचा व्यवहार हा पैसा व वस्तू यांच्या दरम्यान होणाऱ्या रूपांतराचा आहे, असे म्हणता येईल. हा व्यवहार दुहेरी असतो. विक्रेत्याच्या बाजूने वस्तूचे रूपांतर पैशात होते, तर खरेदीदाराच्या बाजूने पैशांचे रूपांतर वस्तूत झालेले असते.
विनिमयाचे दोन प्रकार संभवतात. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे जंगम वस्तूंची अथवा सेवांची होणारी देवाणघेवाण व दुसरा म्हणजे वस्तूच्या कायदेशीर मालकीहक्काची देवाणघेवाण. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत हा दुसऱ्या प्रकारचा विनिमय साधारणपणे होतो. एखाद्या व्यवसायाचा विनिमय होताना व्यवसायाच्या ख्यातिमूल्यांचाही त्यात समावेश असतो.
श्रमविभागणीजन्य विशेषीकरणातून विनिमयाची गरज निर्माण झाली, त्याचप्रमाणे जसजसे विनिमयाचे व्यवहार वाढू लागले, तसतशी श्रमविभागणी व विशेषीकरण देखील अधिकाधिक वाढू लागले.
विनिमयाचे व्यवहार सुकर होण्यासाठी बँका,अडत्ये, घाऊक व किरकोळ व्यापारी महत्वाची भूमिका बजावतात.
स्वेच्छापूर्वक होणाऱ्या विनिमयात सहभागी असलेल्या उभय पक्षांचा लाभ व्हावा, निदान त्यांना तसा तो झाल्याचे वाटावे, अशी अपेक्षा असते. प्रत्येक पक्षाने विनिमयात मिळविलेल्या वस्तूपासून त्याला मिळालेले समाधान हे त्याबदली दिलेल्या वस्तूपासून त्याला जे समाधान मिळाले असते त्यापेक्षा अधिक असते, या गृहीतकावर विनिमयाचा व्यवहार आधारलेला असतो.
वर्तमान अर्थव्यवस्था ही विनिमयप्रधान असल्याने निरनिराळ्या आर्थिक घटकांत परस्परावलंबित्व निर्माण होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट घटकाच्या परिस्थितीत प्रतिकूलता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम अपरिहार्यतेने इतर घटकांवर कमी अधिक प्रमाणात होतोच. तथापि पैसा हे विनिमयाचे माध्यम असल्याने प्रत्यक्षातील ह्या परावलंबनाचीजाणीव क्षीण असते.
विनिमयाच्या व्यवहारांचे स्वरूप काळानुसार बदलत गेलेले आहे. हे व्यवहार पूर्वी बहुधा रोखीनेच होत असत परंतु अलीकडे ⇨भाडेखरेदी पद्धतीने विनिमयाचे व्यवहार अधिक प्रमाणात होऊ लागले आहेत. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंची (उदा., मोटार, दूरचित्रवाणीसंच, शीतकपाट इ.) खरेदी ही भाडेखरेदी पद्धतीनेच करण्याची प्रवृत्ती आधुनिक काळात सरसकट आढळते.
विनिमयाचे माध्यम म्हणून प्रत्यक्ष रोख चलनाऐवजी धनादेश, पतपत्रिका (क्रेडिट-कार्ड) इत्यादींचा वापर वाढत आहे. त्यातही पतपत्रिकांचा वापर हा अलीकडे अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रत्यक्ष रोख रक्कम जवळ न बाळगताही विनिमयाचे मोठमोठे व्यवहार केवळ पतपत्रिका आणि धनादेश यांच्या साहाय्याने करता येतात. यात सोयीस्करपणा तर आहेच, शिवाय सुरक्षितताही आहे. विकसित देशांमध्ये तर पतपत्रिका हे विनिमय व्यवहारांचे अविभाज्य अंग बनलेलेच आहे परंतु भारतासारख्या विकसनशील देशातदेखील ‘डायनर्स क्लब कार्ड’,‘बॉब कार्ड’,‘मास्टर कार्ड’ यांसारख्या पतपत्रिका-प्रकारांचा वापर विनिमयाचे सोयीस्कर माध्यम म्हणून वाढत आहे.
सद्यःकालीन अर्थव्यवस्थतील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती ही विनिमयाच्यापरिघात येत असल्याने, विनमयाच्या अटी या खरोखरच संबंधित पक्षांना न्याय देणाऱ्या असतात काय? विनिमयाच्या व्यवहारांवर शासनसंस्थेचे नियंत्रण असावे की नसावे व तसे ते आवश्यक असल्यास ते कितपत असावे, अशांसारखे महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात.
वस्तू आणि सेवा यांच्याप्रमाणेच भांडवल-उभारणीच्या संदर्भात शेअर्सचा विनिमय ⇨शेअरबाजारात होतो. औद्योगिक अर्थव्यवस्थेत अशा प्रकारच्या विनिमयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
संदर्भ: Wade, William W. From Barter to Banking, New York, 1967.
सुर्वे, गो. चिं. हातेकर, र. दे.