पतंजलि: पातंजल ⇨ महाभाष्याचा (व पारंपरिक समजुतीने योगसूत्रे यांचाही) कर्ता. हा गोनर्द देशाचा रहिवासी होता, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यास पूर्वी गोनर्द म्हणत. तथापि विदिशा व उज्जैन यांमध्ये गोनर्द हा देश होता, असे एक मत आहे. पतंजलीने दक्षिणेत चिदंबरम् येथे महाभाष्य लिहिले, अशीही एक आख्यायिका आहे. त्याच्या आईचे नाव गोणिका असे मानण्यात येते. ही तप करीत असता तिच्या ओंजळीत शेषनाग सूक्ष्म रूप घेऊन पडला व ओंजळीतले पाणी खाली टाकत असता तो मानवी रूप घेऊन जन्मला. तो ओंजळीतून पडला म्हणून त्याला पतंजली (पतत् + अञ्जली ) हे नाव त्याचा आईने दिले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. ती बहुधा त्याच्या नावाचा खुलासा करण्याकरिता रचिली गेली असावी. पतंजलीचे अध्ययन तक्षशिलेत झाले व त्याने अनेक शास्त्रांत प्रावीण्य संपादन केले. शुंगवंशीय राजा पुष्यमित्र याच्या यज्ञात पतंजलीने पौरोहित्य केले (‘इह पुष्यमित्रंयाजयाम:’, ३·२·१२३ भाष्य) आणि पुष्पमित्राच्या काळी यवनांनी अयोध्या (साकेत) व मध्यमिका या नगरांना वेढे घातले (‘अरुणद् यवन: साकेताम्’, ‘…मध्यमिकाम्’, ३·२·१११ भाष्य) असा उल्लेख या महाभाष्यात आहे. पंजाब व काबूल ह्या प्रांतांवर राज्य करणाऱ्या मीनांदर ह्या यवन (आयोनियन) राजाने इ. स. पू. सु. १५० मध्ये अयोध्येला वेढा घातला होता, हा इतिहास लक्षात घेता पतंजलीचा काळ इ. स. पू. सु. १५० च्या सुमाराचा असावा, असे म्हणता येते. तथापि ‘शूद्राणामनिखसितानाम्’ या सूत्रावरील (२·४·१०) ‘शकयवनम्’ या महाभाष्यातील उदाहरणावरून पतंजलीचा काळ इ.स.पू. ५० च्या मागे जाऊ शकत नाही, असे मानण्याकडे हल्लीच्या विद्वानांचा कल आहे.
पाणिनीच्या अष्टाध्यायीतील सूत्रांवर कात्यायनाने वार्तिके लिहिली आणि ह्या सूत्र-वार्तिकांवर पंतजलीने महाभाष्य लिहिले. यांत पतंजलीने व्याकरणातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून अधिकारवाणीने निर्णय दिले आहेत. व्याकरणविषयक मुद्द्यांबरोबरच तत्कालीन, सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थिती समजण्यास महाभाष्याचा पुष्कळ उपयोग होतो. संस्कृत व्याकरणशास्त्राच्या इतिहासात महाभाष्याचे स्थान फार मोठे आहे. पाणिनी, कात्यायन व पतंजली यांना ‘मुनित्रय’ अशी संज्ञा आहे आणि त्यांत पतंजलीचे प्रामाण्य सर्वाधिक मानले जाते.
पतंजलीच्या नावावर योगसूत्रे या नावाचा योगदर्शनावरील एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. योगसूत्रांचा रचयिता पतंजली हा महाभाष्यकार पतंजलीहून निराळा असावा, असे सर्वसामान्य मत आहे. दोन्ही ग्रंथांची भाषा व रचना पाहता, त्यांचा कर्ता समान असावा, हीही एक शक्यता आहे.
आयुर्वेदाच्या चरकसंहितेचे संस्करण पतंजलीने केले, अशी पारंपरिक कल्पना आहे. त्या संहितेचे मूळ नाव आत्रेय संहिता होते आणि कृष्ण यजुर्वेदाच्या चरकशाखेच्या पतंजलीने त्या संहितेचे संस्करण केले म्हणून त्यास चरकसंहिता हे नाव मिळाले, असे मानले जाते. ही समजूत, तसेच “योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि।। ” हा अज्ञातमूल व परंपरागत श्लोक, यांना शास्त्रीय आधार नाही.
संदर्भ : अभ्यंकर, का. वा. व्याकरण महाभाष्य, भाग ७ वा (प्रस्तावना, खंड), पुणे, १९५४.
मेहेंदळे, म. अ.