पटनाइक, बैकुंठनाथ : (? १९०४ – ). आधुनिक ओडिया कवी. जन्म कटक जिल्ह्यातील बारांबा नावाच्या गावी. कलकत्ता व पाटणा विद्यापीठांत एम.ए. बी.एड‌्.पर्यंत शिक्षण. १९२८ पासून ओरिसा सरकारच्या शिक्षण खात्यात त्यांनी नोकरी केली आणि १९५९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १९२१ पासून ते ‘सबुज साहित्यसमिती’चे सदस्य आहेत. साहित्य अकदेमीचेही ते काही काळ सदस्य होते. १९६५ मध्ये त्यांच्या उत्तरायण ह्या काव्यसंग्रहास साहित्य अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

ओरिसातील काही तरुण लेखखांनी १९२० च्या सुमारास ‘सबुजदल’ नावाचे एक साहित्यिक मंडळ स्थापन केले. ‘सबुज’ म्हणजे हरित. प्राचीन, पारंपरिक वा जीर्ण यांच्याशी विरोध दाखविणारे हे प्रतीकात्मक नाव त्यांनी बंगालीतील सबुजपत्र या प्रसिद्ध नियतकालिकाच्या नावावरून स्वीकारले. सबुज दलाच्या संस्थापकांत बैकुंठनाथही होते. पारंपरिक ओडिया साहित्याविरुद्धची तरुण लेखकांची बंडखोरी सबुज साहित्यातून प्रतिबिंबित होते. बैकुंठनाथांची आरंभीची कविता उत्कल साहित्य नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यांतील निवडक कविता नंतर सबुज–कविता (१९३१) नावाने प्रसिद्ध झालेल्या संकलनात ग्रथित आहेत. बैकुंठनाथ हे चांगले भावकवी आहेत. त्यांनी शेकडो भावपूर्ण गीते, उद्देशिका (ओड्स) व वीरगीते लिहिली. काव्यसंचयन (१९४५) व उत्तरायण हे त्यांचे दोन काव्यसंग्रह होत. मुक्तिपथे हे त्यांचे एकमेव नाटक असून त्यात त्यांनी स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे.

सबुज दलाचे ⇨ अन्नदाशंकर राय, ⇨ कालिंदीचरण पाणिग्राही व बैकुंठनाथ हे आघाडीचे कवी होत. कालिंदीचरण व बैकुंठनाथ यांच्या आरंभीच्या कवितेने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. गीतानुकूलता व ज्वलंतपणा हे त्यांच्या आरंभीच्या कवितेचे विशेष होत. नंतरची त्यांची कविता मात्र अधिक वैचारिक बनली आमि तिच्यातून प्रचारकी ढंगही आला. आपल्या एका अपत्याच्या निधनावर बैकुंठनाथांनी रचलेली चाळीस सुनीतांची एक विलापिका परिणामकारक आहे. ओडिया साहित्यात ‘मृत्तिका-दर्शन’ (म. शी. मातीचे तत्त्वज्ञान) नावाने ही सुनीते प्रसिद्ध असून ती बैकुंठनाथांची उत्कृष्ट रचना मानली जाते. कमालीची अंतर्मुखता, शोकभावनेचे उन्नयन व चिंतनातून प्राप्त झालेली तात्त्विक उंची यांमुळे ही सुनीते ओडिया साहित्यात विशेष महत्त्वाची मानली जातात. सबुज दलाच्या साहित्याने ओडिया साहित्यावर आपला कायमचा ठसा उमटविला.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)