पंचतंत्र :संस्कृत भाषेतील अक्षर बोधकथांचा जगद्विख्यात संग्रह. त्याचे एकूण पाच भाग असून प्रत्येक भागास ‘तंत्र’ अशी संज्ञा आहे. प्रत्येक भागाचा विस्तार एका मुख्य कथेच्या आधारे दुसऱ्या कथा रचून केला गेला असल्यामुळे त्याला ‘तंत्र’ (तनु विस्तारे) ही संज्ञा दिली गेली असणे शक्य आहे. पंचतंत्राच्या आरंभी एक लहानसे ‘कथामुख’ आहे. त्यात ह्या संग्रहातील कथा कोणत्या निमित्ताने सांगितल्या गेल्या, त्याची माहिती आहे. ती थोडक्यात अशी : दक्षिण देशी, महिलारोप्य नगरीत अमरशक्ती ह्या नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला वसुशक्ती, उग्रशक्ती आणि अनेकशक्ती असे तीन राजपुत्र होते. हे तिघेही विवेकशून्य आणि शास्त्रविमुख होते. त्यांची बुद्धी जागृत करावी अशी राजाची इच्छा होती. म्हणून त्याने सुमती नावाच्या एका मंत्र्याच्या सल्ल्यावरून विष्णुशर्मानामक एका विद्वान ब्राह्मणाला पाचारण करून त्यास आपल्या मुलांना राजनीती अणि दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यवहारज्ञान शिकविण्याची विनंती केली. विष्णुशर्म्याने ज्या कथांद्वारे ह्या राजपुत्रांना उपदेश करून शहाणे केले, त्याच ह्या कथा.
ह्या बोधकथासंग्रहाचा काळ निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. तथापि तो इसवी सनाचे दुसरे किंवा तिसरे शतक असावा, असे मानण्याकडे कल आहे. मात्र इ. स. पाचशेच्या सुमारास तो अस्तित्वात होता, असे निश्चितपणे म्हणता येते.
पंचतंत्रातील पाच तंत्रांना (१) मित्रभेद, (२) मित्रसंप्राप्ती, (३) काकोलूकीय किंवा संधि-विग्रह, (४) लब्धप्रणाश (मिळालेले घालविणे) आणि (५) अपरिक्षितकारित्व (घाईने केलेली कृती) अशी नावे आहेत. प्रत्येक तंत्राचे नाव त्याच्या आरंभीच सांगितले आहे आणि मुख्य कथेचे सूचन करणारा एक ‘आद्य श्लोक’ ही दिलेला आहे. उदा., ‘मित्रभेद’ ह्या पहिल्या तंत्राच्या आरंभी –
वर्धमानो महान्स्नेहः सिंहगोवृषयोर्वने।
पिशुनेनातिलुब्धेन जंबुकेन विनाशितः।।
(वनामध्ये सिंह अणि बैल ह्यांची वाढती मैत्री एका दुष्ट आणि अतिलोभी कोल्ह्याने नाहीशी केली) असा आद्य श्लोक आहे.
उपर्युक्त श्लोक गुरू विष्णुशर्मा ह्याने उच्चारल्याचे पंचतंत्रात स्पष्ट म्हटलेले नसले, तरी तसे गृहीत धरता येईल. ह्या श्लोकावर राजपुत्र ‘असे कसे झाले?’ असा प्रश्न विचारतात आणि मग पिंगलक नावाचा सिंह आणि संजीवक नावाचा बैल ह्यांच्या मैत्रीत एका कोल्ह्याने फूट पाडल्यामुळे अखेर पिंगलकाने संजीवकास मारले, ही ह्या तंत्रातील मुख्य कथा विष्णुशर्मा सांगतो. कथेत येणाऱ्या उपकथांचा आरंभ असाच एखाद्या श्लोकाने होतो परंतु ह्या उपकथा कथेतली पात्रे सांगतात, अशी योजना आहे.
मित्रभेद कसा केला जातो, हे पहिल्या तंत्रात सांगून झाल्यानंतर ‘मित्रसंप्राप्ती’ ह्या दुसऱ्या तंत्रात कपोतराज चित्रग्रीव, त्याचा मित्र मूषक हिरण्यक, हिरण्यकाची मैत्री संपादन करणारा कावळा लघुपतनक, त्याचा मित्र कासव मंथरक आणि शेवटी ह्यांना येऊन मिळणारा मृग चित्रांगद ह्यांच्या मैत्रीची कथा आहे. ‘संधि-विग्रह’ किंवा ‘काकोलूकीय’ ह्या तिसऱ्या तंत्रात कावळे आणि घुबडे (काक व उलूक) ह्यांच्या वैराची मुख्य कथा असून कावळ्यांचा राजा मेघवर्ण हा आपल्या सचिवाच्या–स्थिरजीवीच्या–कपटनीतीचे अवलंबन करून उलूकराज अरिमर्दनाची गुहा जाळून टाकतो, असे दाखविले आहे. ‘लब्धप्रणाश’ म्हणजे हाती आलेले घालविणे. ह्या चौथ्या तंत्रात हाती आलेले वानर सुसराने कसे घालविले, ती कथा आहे आणि पाचव्या तंत्रात परिस्थिती नीट समजून घेण्यापूर्वीच जो घाईने कृत्य करतो, त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ कशी येते, हे एक ब्राह्मण आणि मुंगूस ह्यांच्या कथेतून दाखविले आहे.
पंचतंत्रातील पात्रे मुख्यतः पशुपक्षी असली, तरी काही कथांत मनुष्यपात्रेही आहेत. शिवाय पंचतंत्रातील पशुपक्षी हे विविध वृत्तिप्रवृत्तींंच्या माणसांची प्रतीके म्हणूनच येतात. साहजिकच त्यांचा वर्तनक्रम माणसांसारखाच दाखविलेला आहे. उदा., एका कथेत गाढवाचे हृदय आणि कान औषध म्हणून खाण्याच्या आधी सिंह स्नानादी नित्यकर्मे करून येतो, असे वर्णन आहे (तंत्र चौथे, लब्धप्रणाश).
मूळ पंचतंत्र आज उपलब्ध नाही. लहानमोठे फरक असलेले त्याचे दोनशेहून अधिक पाठ मिळतात. ह्या पाठ़ांच्या सामान्यतः ज्या परंपरा मानता येतात, त्या अशा :
(१) पेहलवी :इसवी सनाच्या सहाव्या शतकात पंचतंत्राचे पेहलवी भाषांतर झाले. ह्या भाषांतर झाले. ह्या भाषांतराचे नाव ‘करटक आणि दमनक’ (मराठी शीर्षकार्थ) असे होते. पंचतंत्राच्या पहिल्या तंत्रात येणाऱ्या दोन कोल्ह्यांच्या नावांवरून ते दिल्याचे दिसते. मूळ पेहलवी भाषांतर आज उपलब्ध नाही. तथापि ह्या भाषांतरावरून तयार केलेली सिरिॲक आणि अरबी भाषांतरेे मिळतात. अरबी भाषांतराच्या आधारे ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश, इटालियन, चेक आदी यूरोपीय भाषांत पंचतंत्राचे अनुवाद झाले.
(२) बृहत्कथेतील पंचतंत्र :गुणाढ्याच्या बृहत्कथेत त्याने पंचतंत्र अंतर्भूत केले होते, असे दिसते. तसे असल्यास त्या कथा पैशाची प्राकृतात लिहिल्या गेल्या असल्या पाहिजेत तथापि गुणाढ्यकृत बृहत्कथा आज उपलब्ध नाही. क्षेमेंद्राच्या बृहत्कथामंजरीत आणि सोमदेवाच्या कथासरित्सागरात (अकरावे शतक) पंचतंत्रातील कथा आहेत आणि त्या पद्यमय आहेत. क्षेमेंद्र आणि सोमदेव ह्यांचे हे कथाग्रंथ बृहत्कथेच्या आधारे लिहिले गेले, असे म्हटले जाते.
(३) तंत्राख्यायिक :हे नाव असलेली काही हस्तलिखिते काश्मीरात सापडली आहेत. हा पंचतंत्राचा सर्वांत जुना पाठ असावा. मूळ पंचतंत्राच्या तो बराच जवळचा असण्याचीही शक्यता दिसते मात्र तो अगदी मुळाबरहुकूम असल्याचा काही विद्वानांचा दावा सर्वमान्य झालेला नाही.
(४) दक्षिण भारतीय पंचतंत्र :ह्याची हस्तलिखिते दक्षिण भारतात मिळालेली आहेत. पंचतंत्राचे बरेच संक्षित असे रूप त्यांत दिसते. हे पंचतंत्र तंत्राख्यायिकाला अतिशय जवळचे आहे. ह्या दक्षिण भारतीय पाठावरून तयार करण्यात आलेले अनेक पाठ लोकांत प्रसृत झाले.
(५) नेपाळी पंचतंत्र :हे पद्यमय असून दक्षिण भारतीय पंचतंत्राला बरेच जवळचे आहे. ह्याचे फक्त एक हस्तालिखित मिळते.
(६) जैन पंचतंत्र :‘टेक्स्टस सिंप्लिसिअर’ ह्या नावाने हे ओळखले जाते. पंचतंत्राच्या ह्या पाठाचा कर्ता अज्ञात असला, तरी एका जैन व्यक्तीने तो तयार केला असावा अणि इ. स. चे नववे ते अकरावे शतक ह्यांच्या दरम्यान कधीतरी तो झालेला असावा, असा तर्क पंचतंत्राचे एक विख्यात संशोधक डॉ. योहानेस हेर्टेल ह्यांचा आहे. तथापि ह्या पाठात जैन प्रवृत्ती दिसून येत नाहीत. ह्या टेक्स्टस सिंप्लिसअरवरून पूर्णभद्र नावाच्या एक जैन यतीने एक नवा पाठ तयार केला (११९९). हा पाठ तयार करण्यासाठी तंत्राख्यायिकेच्या एका उत्तरकालीन पाठाचाही पूर्णभद्राने उपयोग केलेला दिसतो. पूर्णभद्राच्या ह्या पाठास ‘टेक्स्टस ऑर्नाटिअर’ आणि ‘पंचाख्यान’ अशी नावे आहेत. त्यात काही नव्या कथा आणि सुभाषिते आलेली आहेत. पंचतंत्राच्या उत्तरकालीन पाठांत हा पाठ सर्वोत्तम समजला जातो. टेक्स्टस सिंप्लिसिअर आणि टेक्स्टस ऑर्नाटिअर हे दोन पाठ भारतात फार मोठ्या प्रमाणावर प्रसृत झाले. ह्या दोहोंच्या आधारे काही नवे पाठही तयार करण्यात आले. जैन मुनी मेघविजय ह्याच्या पंचाख्यानोध्दाराचा (१६५९-६०) अंतर्भाव अशा पाठांत होतो.
पंचतंत्रात आढळून येणारी गद्यशैली साधी पण वेधक आहे. शिवाय विविध कथांचे सार कलापूर्ण, सुभाषितात्मक श्लोकांत देण्याची पद्धती पंचतंत्राने अवलंबिलेली आहे. उपदेश करणे हा प्रधान हेतू असूनही त्यातील कथांची मनोरंजकता कमी झालेली नाही. अनेक शतके आणि अनेक ठिकाणी ज्यांतील कथा पिढ्यान् पिढ्या मोठ्या आवडीने वाचल्या गेल्या, सांगितल्या गेल्या, अशा काही थोड्या ग्रंथांमध्ये पंचतंत्राचा समावेश होतो. पन्नासांवर भाषांत ते अनुवादिले गेले आहे, ह्यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येऊ शकेल.
संदर्भ :1. Edgerton Franklin Trans. The Panchatantra, London, 1965.
2. Edgerton, Franklin, The Panchatantra Reconstructed, 2 Vols., New Haven (Conn.). 1924.
3. Hertel, Johannes, Das Panchtantra, Leipzing and Berlin, 1914.
मेहेंदळे, म. अ.
“