पंचकन्या : प्रातःस्मरणीय अशा पाच साध्वी स्त्रियांना अनुलक्षून ही संज्ञा लावली जाते. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा व मंदोदरी या त्या पाच स्त्रिया होत. काही ठिकाणी या पाच नावांत सीतेऐवजी कुंतीचा निर्देश आढळतो. प्रातःस्मरणात म्हटल्या जाणाऱ्या याबाबतच्या श्लोकात आचारमयूखानुसार ‘पन्च कन्याः स्मरेत्’ असा पाठ आहे, तर आचारेंदुनुसार ‘पन्च कन्याः स्मरेत्’ असा पाठ आढळतो. त्या ‘साध्वी’ म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत.
गौतमाची पत्नी ⇨अहल्या. इंद्राने तिचे पातिव्रत्य भंग केल्यामुळे गौतमाने तिला शाप दिला पण पुढे रामाच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. ⇨द्रौपदी पाच पांडवांची पत्नी असून तेजस्वी पातिव्रत्यासाठी तिचा लौकिक आहे. सीतेला रावणाच्या बंदिवासात काळ कंठावा लागला होता. आपल्या पातिव्रत्याचा निर्वाळा देण्यासाठी तिने अग्निदिव्य केले होते. कुंतीला दुर्वासाने दिलेल्या मंत्राच्या सामर्थ्यामुळे विवाहापूर्वीच कर्ण आणि विवाहानंतर धर्म, भीम व अर्जुन हे पुत्र झाले. तारा ही वालीची पत्नी. वालीच्या वधानंतर तिने सुग्रीवाबरोबर विवाह केला. मंदोदरी ही रावणाची पत्नी. अंगदाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृतीत ह्या पाच साध्वींना आदराचे व महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
भिडे, वि. वि.