सारिपुत्त : गौतम बुद्घाच्या दोन प्रमुख शिष्यांपैकी एक. दुसरा मोग्गलान (मौदगल्यायन). सारी (शारी) नावाच्या बाह्मणीच्या पोटी त्याचा जन्म झाला, म्हणून त्याला सारिपुत्त (शारीचा पुत्र) असे नाव पडले. शारद्वतीपुत्र असाही त्याचा निर्देश काही संस्कृत ग्रंथांतून आढळतो. त्याचप्रमाणे उपत्तिस्य ह्या राजगृह नगराजवळ असलेल्या गावी त्याचा जन्म झाला, म्हणून त्याला उपत्तिस्य असेही म्हणतात. सम्राट अशोकाच्या शिलालेखांत ‘उपत्तिस पसिने’ म्हणून जो उल्लेख येतो, तो ह्याने विचारलेल्या प्रश्नांना उद्देशून. सुत्तनिपाता तील सारिपुत्रसुत्तातल्या प्रश्नांचाच हा उल्लेख असावा, असे अनेक विद्वानांचे मत आहे. सुत्तनिपाता तच ह्याला बौद्घ धर्माचा धर्मसेनापती, असे म्हटले आहे. अंगुत्तरनिकायातील एतदग्गवग्गात महाप्रज्ञ भिक्षूंमध्ये सर्वश्रेष्ठ असे स्थान त्याला दिले आहे. सारिपुत्त हा नास्तिक्यवादी संजय बेलथिपुत्त या प्रसिद्घ गुरूंचा शिष्य होता परंतु तो एकदा बुद्घाच्या मूळ पाच शिष्यांपैकी अस्सजि या शिष्यास भेटला. त्या दोघांत बौद्घ धर्मातील मूलभूत तत्त्वांविषयी संभाषण झाले आणि अस्सजि (श्विजित) भिक्षूकडून बुद्घाची शिकवण थोडक्यात समजून घेतल्यानंतर तो बुद्घाचा अनुयायी झाला. एका दंतकथेनुसार त्याने ‘संगीति सुत्तन्त’ नावाची संहिता बनविली होती कारण जैन गण-समूहातील विभाजन त्याने पाहिले होते. तसे बौद्घ संघात ते होऊ नये, अशी त्याची इच्छा होती. बुद्घाच्या या बुद्घिमान व कर्तबगार शिष्याचे निधन बुद्घाच्या महापरिनिर्वाणापूर्वीच झाले.

बापट, पु. वि.