ज्ञेयवाद : ज्ञेयवाद ही ग्नॉस्टिसिझम ह्या संज्ञेसाठी वापरण्यात आलेली पर्यायी मराठी संज्ञा आहे. ज्ञान – विशेषतः आध्यात्मिक ज्ञान – ह्या अर्थाच्या ग्नॉॅसिस ह्या ग्रीक शब्दावरून आधुनिक अभ्यासकांनी ग्नॉस्टिसिझम हीसंज्ञा तयार केली. इ. स. च्या पहिल्या दोन शतकांत ग्रीको-रोमन जगात उदयाला आलेली ही चळवळ एकसंधपणे संघटित अशी चळवळ नव्हती. तिच्यात काहीशा सैलपणे संबंधित असलेले काही उपदेशक, त्यांची शिकवण, तसेच काही संप्रदाय अंतर्भूत होते. विविध मिथकांतून प्रकट झालेले ह्या जगाचे ज्ञान, तसेच मानवी आत्म्याचे मूळ वा उद्गम आणि त्या आत्म्याची भवितव्यता स्पष्ट करणारे ज्ञान देण्याचे उद्दिष्ट ह्या चळवळीचे होते. एका अतिशायी (ट्रॅन्सेन्उेन्ट) आध्यात्मिक शक्तीपासून आरंभी सर्व काही प्रवर्तित झाले तथापि काही भ्रष्टता घडून आली आणि कनिष्ठ सत्ता प्रादुर्भूत झाल्या. परिणामतः हे भौतिक जग निर्माण झाले आणि मानवी आत्मा आता त्यात कैद होऊन पडला आहे. ह्या तुरुंगातून त्याला मुक्त व्हायचे असेल, तर आपल्या आंतरिक जीवनाची जोपासना केली पाहिजे. ज्ञेयवादाच्या उदयानंतर तो ख्रिस्ती चर्चचा विरोधक म्हणून पाहिला गेला त्याला चर्चचा विरोधही झाला.
एकाच कुटुंबातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यामोहऱ्यांत जसे काही साम्य दिसून येते, तसेच ज्ञेयवादी संप्रदायांना समान असलेली काही समान वैशिष्ट्ये ओळखता येतात तथापि ज्ञेयवादाची एक सार्विक दृष्ट्या समान वैशिष्ट्यांच्या आधारे अनेकदा केले जाणारे प्रयत्न ज्ञेयवादासंबंधीच्या संपूर्ण सत्याच्या केवळ जवळपास येऊ शकतात.
सर्व ज्ञेयवादी संप्रदायांना समान असलेल्या तत्त्वांत पुढील तत्त्वांचा समावेश होता : (१) ज्ञेयवाद द्वैतवादी आहे. अतिशायी असे विशुद्ध आत्म्याचे जग आणि जडाचे स्थूल जग ह्यांच्यातले हे द्वैत आहे. असेद्वैत माणसाच्या घडणीतही दिसते. तेथेही आत्मा आणि इंद्रियभोग्यता ह्यांच्यात विभेद आहे. त्यामुळेच आध्यात्मिक प्रवृत्तीची वेचक माणसे आणि उर्वरित समाज ह्यांच्यात अंतर पडते. (२) ह्या जगाचा निर्माता हा अपूर्ण आणि दुष्ट असा ज्ञेयवादाला अभिप्रेत आहे. ह्या जगावर ज्यूंचा देव ⇨ येहोवा ह्याचे वर्चस्व आहे, असे मानून त्याचे आणि त्याच्या इतिहासाचे ज्ञेयवादाने अवमूल्यन केल्याचे आढळते. तसेच हा देव आणि परम देवत्व ह्यांच्यातही भेद केलेला आहे. परम देवत्वाचे, त्याच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण विविध मिथकांच्या आधारे देण्यात आलेले आहे. (३) मानवी आत्मा उच्च स्तरावरच्या जगात उद्भवला तथापि जड देहाच्या तुरुंगात आता तो अडकून पडला आहे. (४) ज्ञेयवाद्यांचे ध्येय आपले आत्मेसर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीपासून दूर राहून निवडक, अल्पसंख्य आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तींसह अंतिम आनंदापर्यंत पोचण्याचे असल्या-मुळे त्यांचा जीवनक्रम पावित्र्यानुकूल अशा नैतिकतेचा होता.
ज्ञेयवाद कोठून उगम पावला, हा प्रश्न बराच वादग्रस्त ठरलेला आहे. ग्रीक, ज्यू का इराणी, हे ह्या वादाचे विषय आहेत तथापि असे दिसतेकी ज्ञेयवादी चळवळ इतकी विविधरूपी आहे, की तिचा उगम अमुक एक आहे, अशी उपपत्ती स्वीकारता येत नाही. तिची अनेक रूपे पाहतातीत विविध संस्कृतींचे संश्लेषण झाल्याचे दिसून येते. व्हॅलेन्शस (इ. स.चे दुसरे शतक) आणि मार्सिऑन (इ. स.चे दुसरे शतक) ह्यांसारखे ज्ञेयवादाचे प्रमुख प्रतिनिधी ह्यांचा वारसा ज्यू आणि ख्रिस्ती असा दोन्ही प्रकारचा असल्याचे दिसून येते.
अनेक शतके ज्ञेयवाद हा त्याच्या ख्रिस्ती विरोधकांच्या–विशेषतः आयरेनीअस, टर्टल्यन आणि क्लेमेंट ह्यांच्या–लेखनातूनच ज्ञात झाला होता. ह्या विरोधकांनी आपल्या लेखनातून ज्या ज्ञेयवादी ग्रंथांवर टीका केली होती, त्या ग्रंथांचे निर्देश त्यांनी अपरिहार्यपणे केले होते. काही ज्ञेयवादी ग्रंथ उपलब्ध झाले होते, पण ते संशयास्पद होते तथापि १९४४ मध्ये ईजिप्तमध्ये कोडेक्सच्या स्वरूपात असलेल्या ४४ ग्रंथांचा शोध लागला. त्यातील बहुतेक ग्रंथ मूळ ग्रीक ग्रंथांची कॉप्टिकमधील भाषांतरे आहेत. तसेच काही ग्रंथ इ. स.च्या पहिल्या शतकापासूनचे आहेत.
ज्ञेयवादी हे बऱ्याच प्रमाणात पहिले ईश्वरविद्यावादी म्हणता येतील आणि त्यांच्या प्रणालींनी आरंभीच्या ख्रिस्ती विचाराला पद्धतशीर रूप मिळण्यास चालना मिळाली.
संदर्भ : 1. Jonas, H. The Gnostic Religion, Boston, 1958.
2. Layton, B. Ed. & Trans, The Gnostic Scriptures : A New Translation, London, 1987.
कुलकर्णी, अ. र.
“