ज्ञानेंद्रिये : प्राण्यांना आपल्या परिसरातील बऱ्यावाईट बदलांचेज्ञान व्हावे आणि त्यातून पोषण, संरक्षण व प्रजनन या कार्यांमध्ये मदत व्हावी या उद्देशाने विकसित झालेल्या इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. त्यांचे कार्य म्हणजे विशिष्ट अंतर्गत वा बाह्य संवेदनांचे ग्रहण करून त्यांचे रूपांतर तंत्रिकांमधून (मज्जातंतूंमधून) मेंदूकडे पाठविता येणाऱ्या संदेशात करणे इतकेच असते. या संदेशांमधून अर्थ लावून बोधनाची जाणीव निर्माण करण्याचे काम मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये होत असते. ज्ञानेंद्रियांचे दोन प्रकार आहेत : (१) विशेष ज्ञानेंद्रिये आणि (२) कायिक अथवा सार्वदेहिक ज्ञानेंद्रिये.
विशेष ज्ञानेंद्रिये प्रकारात डोळा, नाक, कान व जीभ या इंद्रियांचा समावेश होतो. प्राण्यांचे चलन होत असताना सर्वांत पुढे असलेल्या म्हणजे डोक्याकडील भागात दृष्टी, गंधग्रहण, श्रवण व रुचिज्ञान करण्यासाठी ही इंद्रिये विकसित झालेली आहेत. चतुष्पाद सस्तन प्राण्यांच्या डोक्यामध्ये ती एकवटलेली असल्यामुळे द्विपाद माणसातही ती मानेच्या वरच्या क्षेत्रातच आहेत. पुरातन कालापासून भारतीय आणि इतर वाङ्मयात त्यांचा उल्लेख ‘ज्ञानेंद्रिय’ असा केलेला आढळतो. या चार इंद्रियांखेरीज, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आवश्यक आणि गतिमान शरीराच्या गतीची व त्वरणाची तसेच डावी-उजवीकडे वळण्याच्या (म्हणजेच कोनीय) हालचालींची जाणीव करून देणारी यंत्रणा कानात (आंतरकर्णात) असते तिचाही समावेश विशेष ज्ञानेंद्रियात केला जातो.
सार्वदेहिक ज्ञानेंद्रियांत वेदना, तापमान (उष्ण/शीत), खोल दाब, हलका स्पर्श, कंपन, खाज, गुदगुल्या यांच्या संवेदनांशी संबंधित ग्राहींचा समावेश होतो. संपूर्ण शरीराच्या त्वचेत कमी-अधिक प्रमाणात ती पसरलेली असतात. नाक, कान, डोळे, जीभ, घसा यामध्येही हे संवेदन होऊ शकते. मराठी विश्वकोशात कान, घसा, जीभ, डोळा, त्वचा व नाक यांवर स्वतंत्र नोंदी असून त्या ठिकाणी सविस्तर वर्णन दिले आहे.
ज्ञानेंद्रियांकडून निघालेले संदेश तंत्रिका तंत्रातील (मज्जासंस्थेतील) विविध मार्गांनी मेंदूकडे जाणाऱ्या तंत्रिका आणि मेरुरज्जूतील मार्गांनी मेंदूच्या निरनिराळ्या खंडांमध्ये पोहोचतात. तेथे त्यांचे बोधन होऊन पूर्वानुभवातून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे अर्थ लावला जातो. तसेच एकापेक्षा अधिक प्रकारांच्या (उदा., स्पर्श व दृश्य किंवा दृश्य व ध्वनी) संवेदनांच्या संपर्कामुळे वस्तूबद्दल नक्की माहिती मिळते. ह्या सर्व प्रक्रियेत मस्तिष्क तंत्रिका आणि मेरुरज्जू तंत्रिकांची पश्च तंत्रिकामुळे महत्त्वाची भूमिका बजावतात. मस्तिष्क तंत्रिकांपैकी क्र. १, २, ५, ७, ८, ९ व११ च्या संवेदन वाहकतेची माहिती मराठी विश्वकोशातील ⇨ तंत्रिका तंत्र या नोंदीत विस्ताराने आली आहे. मेंदूच्या मध्य सीतेच्या मागील भागात अर्थबोधन क्षेत्र असते. तेथील शंखक खंडात श्रवण क्षेत्र, पश्चकपाल खंडात दर्शन (दृष्टी) क्षेत्र आणि पार्श्वललाट खंडात इतर संवेदना क्षेत्रे असतात. [→ संवेदना तंत्र].
प्राण्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) त्यांच्या परिसरानुसार व जीवनातील आवश्यकतेनुसार होत आली आहे. ज्ञानेंद्रियेही याच उत्क्रांतीतून विकसित झाली आहेत. त्यामुळे प्राण्यांमध्ये ज्ञानेंद्रियांच्या प्रकारात आणि संवेदन--क्षमतेमध्ये विविधता आढळते. तसेच वयोमानानुसार कार्यक्षमतेचा हळूहळू र्हासही होत असतो. माणसाची श्रवणशक्ती १६२८,००० हर्ट्झकंप्रतांचे (दर सेकंदात होणाऱ्या कंपानांच्या संख्येला कंप्रता म्हणतात). ध्वनितरंग ग्रहण करू शकते. वार्धक्यामुळे यातील उच्च वारंवारतेच्या ग्रहणाचे प्रमाण २०,००० हर्ट्झपेक्षा बरेच कमी होते. तसेच कमीतीव्रतेचा आवाज ऐकण्याची क्षमताही ओसरू लागते. डोळ्यांच्या बाबतीतही अशीच मर्यादित ग्रहणशक्ती असल्याने ४००७०० नॅमी.(१ नॅनोमीटर = १०?९ मीटर) तरंगलांबीचे प्रकाशतरंग (तांबडा ते जांभळा रंग) दृश्यमान होऊ (दिसू) शकतात.
जिभेतील रुचिकलिका गोड, कडू, आंबट, खारट आणि मांसल अशा चवी ओळखू शकतात [→ रुचि]. यासाठी आवश्यक अशा रुचिग्राहींच्या प्रकारांत सध्या माहिती असलेले काही ग्राही असे : सोडियम, पोटॅशियम, क्लोराइडे, हायड्रोजन, ॲडिनोसीन, इनोसीन व ग्लुटामेट. निरनिराळ्या पदार्थांची रुचिसंवेदन निर्माण करण्याची क्षमता वेगवेगळी असते. उदा., साखरेपेक्षा सॅकॅरीन गोड असते. नाकामध्ये गंधग्राहींचे अनेक प्रकार आढळतात [→ गंध]. माणसात ३५०–४०० प्रकारच्या रेणूंचा गंध ओळखण्याची क्षमता असावी. स्थूलमानाने त्यांचे कापूर, कस्तुरी, पुष्प, पुदिना, कुजलेले पदार्थ, आंबलेले पदार्थ अशा गटांत वर्गीकरण केले जाते. त्वचेतील कंपने ओळखण्याची क्षमता माणसात मर्यादितच आहे. त्यामुळे काही प्राण्यांना भूकंपाची आगाऊ सूचना मिळते तशी माणसाला मिळू शकत नाही.
प्राणिजगतात काही ठिकाणी ज्ञानेंद्रियांची क्षमता अधिक विस्तृत आढळते. पक्षी, मधमाश्या आणि चतुरासारखे काही कीटक ३०० नॅमी. तरंगलांबीचे जंबुपार किरण ओळखू शकतात. सापासारखे प्राणी ७०० नॅमी.पेक्षा अधिक तरंगलांबीचे अवरक्त किरण ग्रहण करू शकतात. त्यामुळे आपल्या भक्ष्याच्या शरीरातील उष्णतेवरून त्याचा माग त्यांना लागतो. मधमाश्या व कटलफिश (एक प्रकारचे मृदुकाय जलचर) यांना ध्रुवित[→ ध्रुवणमिती] प्रकाश समजू शकतो. मार्जार कुलातील सस्तन प्राण्यांना अंधारात दिसू शकते. ध्वनितरंगांच्या ग्रहणशक्तींतही काही प्राणी अधिक संवेदनक्षम असतात. वटवाघूळ व डॉल्फिन यांच्यात १,००,००० हर्ट्झहून अधिक कंप्रतेच्या श्राव्यातील (स्वनातीत) तरंगांचे संवेदन होऊ शकते. वटवाघळांमध्ये तर असे तरंग स्वतः निर्माण करून त्यांचे बाह्य वस्तूंकडून होणारे परावर्तन ओळखण्याची ⇨ रडारसारखी क्षमता असते.
गंधग्रहणात प्राण्यांमध्ये माणसाच्या तुलनेने बरीच मोठी क्षमता आढळते. प्राण्यांनी निर्माण केलेली (स्वजातीय किंवा परजातीय) गंधद्रव्ये[→ फेरोमोने] ओळखण्यासाठी त्यांच्यात नाकाला जोडलेली नासापटलेंद्रिये असतात. त्यांचा उपयोग (जोडीदाराची) लैंगिक क्षमतेची स्थिती जाणणे, भक्ष्याचा माग काढणे, स्वतःच्या अधिकारक्षेत्राच्या भौगोलिक मर्यादा आखून घेणे यांसारख्या कामांसाठी होतो. यासाठी आवश्यक अशा गंधग्राहींची संख्या उंदरामध्ये सु. १,००० असते (माणसात ३०० ते ४००). कुत्र्यासारखा प्राणी गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी याच क्षमतेमुळे उपयोगी पडतो. कीटकांच्या सर्वांत पुढे असलेल्या भागात स्पर्शसंवेदकां-बरोबरच शृंगिकांमध्ये अशाच प्रकारचे गंधसंवेदक आढळतात.
गंधग्राही अंतस्त्वचा नाकाच्या सर्वांत वरच्या भागात असते. गंधनिर्मिती करणारे रेणू जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) अथवा तैलविद्राव्य असतात. अंतस्त्वचेजवळ विरघळणारे रेणू तेथील कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) सूक्ष्म विद्युत् भार निर्माण करतात. त्याचे ज्ञान मेंदूच्या सर्वांत पुढच्या भागातील गंधज्ञान केंद्रामध्ये होते. विरघळणाऱ्या रेणूचे आकारमान आणि वस्तुमान यांवर हे गंधज्ञान कोणते असेल ते ठरते.
चव ओळखण्याच्या क्षेत्रात प्राणिजगतातील विविधता अजून फारशी स्पष्ट झालेली नाही. माशीच्या व फुलपाखरांच्या पायाच्या तळाशी रुची जाणणारे ग्राही आढळतात. रुचिसंवेदन आणि प्राण्याची एखाद्या अन्न-घटकाची आवश्यकता यांचा संबंध असतो. हे काही प्रयोगांवरून स्पष्ट होऊ लागले आहे. उदा., अधिवृक्क किंवा परावटू ग्रंथी काढून टाकलेल्या प्राण्यां-मध्ये सोडियम किंवा कॅल्शियमाचे प्रमाण कमी होते. परिणामतः मीठ किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दलची रुची अधिक होते असे दिसून आले आहे.
त्वचेतील ग्राहींचे काही विशेष प्रकार माशांमध्ये आढळतात. त्यामुळे त्यांना पाण्याचा दाब आणि समुद्रातील प्रवाहांचे ज्ञान होते. इतर काही प्राण्यांमध्ये त्वचेतील संवेदकांमुळे गतिमानता, त्वरण, गुरुत्वाकर्षणाचा जोर यांची जाणीव होते.
मानवी ज्ञानेंद्रियांना सहसा न जाणवणारे असे परिसरातील वातावरणीय(हवामानातील) बदल काही प्राण्यांना ओळखता येतात. उदा., पक्ष्यांनाव मधमाश्यांना चुंबकीय क्षेत्रांतील बदल जाणवतात शार्क, डॉल्फिन वइतर काही जलचरांना विद्युत् क्षेत्र ओळखता येते. अनेक प्राण्यांना जैव घड्याळासारख्या यंत्रणेचा उपयोग होतो. त्यामुळे काळाचे भान राहून त्यानुसार त्यांचे दैनंदिन कार्यक्रम निश्चित होतात. तसेच ऋतुबदलानुसार घरटी बांधणे, अंडी घालणे, स्थलांतर इत्यादी वार्षिक कार्यक्रमहीनियंत्रित होतात. माणसातही असे बदल – झोपेचे वेळापत्रक, अंतःस्रावी ग्रंथींचे स्राव, स्त्रीबीजाचे विमोचन, गर्भाशयातील मासिक बदल – काही प्रमाणात अजाणतेपणी व काही जाणतेपणी घडत असतात.
पक्ष्यांना स्थलांतराची माहिती जन्मतःच असते. बहुतेक वेळा नव्यानेच उडायला शिकलेली पिले सर्वप्रथम स्थलांतराच्या जागी पोहोचतात, जिथेती पूर्वी कधीच आलेली नसतात. पक्ष्यांना स्थलांतर करताना भूप्रदेशाची माहिती तर असतेच, तसेच त्यांना आकाशातील नक्षत्रांचीही माहिती असते असे मानण्यास जागा आहे. कारण काही पक्षी रात्रीही मार्गक्रमण करीत असतात, तसेच आकाशात ढग असताना पक्षी रस्ता चुकल्याचीही उदाहरणे आहेत. स्थलांतराच्या जागेबरोबरच पक्षी तिथे येण्याची वेळही सहसा चुकवीत नाहीत.
ज्ञानेंद्रियांची निर्मिती जनुकीय गुणधर्मांनुसार होत असते. जनुकांच्या दोषांमुळे काही व्यक्तींमध्ये या निर्मितीत कधीकधी दोष आढळतात. उपजत रंगांधत्व, बहिरेपणा किंवा काही चवी जाणण्याची असमर्थता त्यामुळे निर्माण होते. इतर काही फरक हे व्यक्तींमधील नैसर्गिक भेद असतात. काही व्यक्तींना स्वरांमधील सूक्ष्मभेद लक्षात येतात व संगीतातील बारकावे समजतात, तर काहींना असे स्वरज्ञान नसल्यामुळे संगीताचा आनंद मिळतो, परंतु त्यातील सूक्ष्मज्ञान होऊ शकत नाही. असेच फरक चव किंवा गंध यांच्याबाबतीतही असतात. या सर्व भेदांमधील क्षमतांची विविधता काही अंशी ज्ञानेंद्रियांवर अवलंबून असते, तर काही अंशी तिचा उगम मेंदूंमधील अर्थबोध जाणण्याच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये असतो. लहानपणी किंवा तरुणपणी जाणीवपूर्वक शिक्षण घेऊनही अशा क्षमता कमावता येतात. मँडॅरीन ( चिनी भाषा), व्हिएटनामी किंवा संस्कृत यांसारख्या भाषांच्या अभ्यासात स्वराच्या (नादाच्या) गुणवत्तेला फार महत्त्व असते.
सर्व प्राण्यांमध्ये ज्ञानेंद्रियांच्या मदतीने मिळालेल्या माहितीचा उपयोग शरीरस्वास्थ्य, परिसरात टिकून राहणे किंवा शत्रूपासून संरक्षण यासाठी होत असतो. माणसामध्ये मात्र त्यातून इतरही काही कामे होऊ शकतात. उदा., करमणूक, ज्ञानसंपादन व वृद्धी, विचारांची विविधता, संस्कृतीची निर्मिती आणि उत्स्फूर्त भावनावेगांवर नियंत्रण.
पहा : कान गंध जीभ डोळा तंत्रिका तंत्र त्वचा प्राणि संदेशवहन मेंदू रुचि संवेदना तंत्र स्पर्शज्ञान.
संदर्भ : 1. Barlow, H. B. Mollon, J. D. The Senses, 1982.
2. Barnard, C. Illman, J. The Body Machine, 1981.
3. Blake, R. Sekuler, R. Perception, 2006.
4. Iggo, A. Ed. Somatosensory system, 1973.
5. Levine, M. W. Sensation and Perception, 2000.
6. Willentz, J. S. The Senses of Man, 1968.
श्रोत्री, दि. शं.
“