ह्‌वांग हो : (यलो रिव्हर – पीत नदी) . चीनमधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी ४,६४० किमी. जलवाहनक्षेत्र ७,५०,०००चौ. किमी. या नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून येणाऱ्या लोएस गाळामुळे पाण्याचा रंग पिवळसर दिसतो. त्यामुळे तिला ‘यलो रिव्हर(पीत नदी) असे म्हणतात.

ह्‌वांग हो नदी चीनच्या सिंघाई प्रांतात, तिबेट पठाराच्या पूर्व भागात, बायेन-का-ला पर्वतात सस.पासून ४,६०० मी.पेक्षा जास्त उंचीवर उगमपावते. उगमानंतर ही नदी चीनच्या सिंघाईसह सात प्रांत व दोन स्वायत्त विभागांतून वाहत जाऊन पूर्वेस पीत समुद्राच्या चिहली आखातास (बोहाई) मिळते. ह्वांग हो च्या प्रवाहाचे (१) पहिला टप्पा, (२) दुसरा टप्पा, (३) तिसरा टप्पा असे तीन भाग केले जातात.

या नदीच्या उगमापासून लानजो शहरापर्यंतच्या नदीप्रवाहाचापहिल्या टप्प्यात समावेश केला जातो. या टप्प्यातील नदीप्रवाहाची लांबी सु. १,१६७ किमी. व जलवाहनक्षेत्र सु. १,२४,३२० चौ. किमी. आहे. ह्वांग होद्वारे उगमाजवळच प्रवाहमार्गात चा लिंग व ओ लिंग ही दोन सरोवरे एकमेकांस जोडली जातात. या टप्प्यात उगमानंतर ही नदी स्थूलमानाने पश्चिम-पूर्व दिशेने वाहते. आम्ने माचिन पर्वतउताराच्या बाजूने खोल दऱ्या, घळया यांमधून वाहत ही नदी तिबेट पठारावरून खाली लानजो शहरापर्यंत येते. घळयांमधून वाहताना ही नदी प्रति किमी. सु. २ मी. पेक्षा जास्त या प्रमाणात खाली येते. या टप्प्यात हिच्या प्रवाहमार्गात सु. २० घळया असून त्यांपैकी लाँगयांग, जिशी, ल्योजिआ, बॅपॅन, क्विंगटाँग या प्रसिद्ध आहेत. जलविद्युत्निर्मितीच्या दृष्टीने या टप्प्यास विशेष महत्त्व आहे.

लानजो ते जंगजोपर्यंतच्या सु. २,८९७ किमी.पेक्षा जास्त लांबीच्या प्रवाहमार्गाचा व सु. ५,९५,६९८ चौ. किमी. जलवाहनक्षेत्राचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जातो. हा भाग ‘ग्रेट नॉर्थ बेंड’ म्हणून ओळखला जातो. या टप्प्यात ह्वांग हो लानजो पासून ईशान्येकडे सु. ८८५किमी. उत्तर निंगशिआ व पश्चिम ऑरडॉस मैदानी प्रदेशांमधून वाहते. या दरम्यान ती चीनच्या भिंतीस ओलांडते. तद्नंतर ही पूर्वेकडे वळून सु. ८०५ किमी. मैदानी प्रदेशातून वाहते. या ठिकाणी हिच्या प्रवाहास अनेक फाटे फुटतात. या मैदानी प्रदेशात ती प्रती किमी. १५ सेंमी.पेक्षाही कमी प्रमाणात खाली येते. तद्नंतर ही नदी इनर मंगोलियातील हूहेहोटजवळ दक्षिणेकडे वळून तसेच चीनच्या भिंतीस ओलांडते व शान्सी, शेन्सी या दोन प्रांताच्या सरहद्दीवरून सु. ७१६ किमी. वाहते. येथे तिला शान्सी व शेन्सी या प्रांतांतून येणाऱ्या अनुक्रमे फेन हो व वे हो या नद्या मिळतात. वे नदीसंगमानंतर ह्वांग हो सु. ४८३ किमी.टॉनगुन व सॅनमॅक्सिया या पर्वतांतील दुर्गम घळयांतून आणि सॅनमन याप्रसिद्ध घळईतून वाहत चीनच्या उत्तर मैदानी प्रदेशात जंग जो शहरापर्यंत येते. येथे ती सरासरी प्रति किमी. ३० सेंमी.पेक्षा जास्त या प्रमाणातखाली येते.

या टप्प्यात ह्वांग हो लोएस पठारी प्रदेशातून वाहते. या पठारावरील खडक ठिसूळ असून लोएस थरांची खोली ४९–६१ मी. दरम्यान, तर काही ठिकाणी १५२ मी.पेक्षा जास्त आहे. येथे अशा प्रकारच्याठिसूळ संचयनामुळे नदीपात्रात खनन होऊन खोल दऱ्या तयार झालेल्याआहेत. परिणामी येथून मोठ्या प्रमाणात गाळाचे वहन होते.

जंग जो ते नदीमुखापर्यंतच्या सु. ७०० किमी. लांबीच्या या नदीच्या प्रवाहाचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होतो. या टप्प्यात ह्वांग हो काइफंग शहरापासून ईशान्य दिशेने वाहत जाऊन पीत समुद्राच्या चिहली आखातास मिळते. या टप्प्यात ही सरासरी प्रति किमी. ८ सेंमी. खाली येते. या प्रवाहमार्गात गाळाचे संचयन जास्त होते. नदीमुखाशी सु. ८० किमी. लांब व ५,४३५ चौ. किमी. पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. ही नदी प्रवाहाबरोबर प्रति घ. मी. पाण्यात ३४ किगॅ्र. या प्रमाणात गाळाचे वहन करते आणि दरवर्षी सु. १.५२ महापद्म टन गाळ समुद्रात आणून टाकते.

व्हाइट, ब्लॅक, स्टार, डॅक्सिया, तोयू, झुली, क्विंगशुई, जुए, वुडिंग, फेन हो, वे हो, क्विन, डॅवेन, कुओ या हिच्या उपनद्या आहेत. प्रवाहमानाच्या बाबतीत ही वार्षिक सरासरी सु. १७७० घ.मी. प्रति सेकंद या प्रमाणात समुद्रात पाणी आणून टाकते. पावसाळ्यात ह्वांग हो कमाल प्रति सेकंद २,२०९ घ.मी. व कोरड्या ऋतूत किमान प्रति सेकंद ६२३ ते ७९३ घ.मी. या प्रमाणात पाण्याचे वहन करते.

ह्‌वांग हो च्या त्रिभुज प्रदेशात जमिनीच्या उताराचे प्रमाण फारचकमी असल्याने हा प्रदेश अतिसपाट झालेला आहे. तसेच नदीपात्रात गाळाचे संचयन होऊन पात्र उथळ झालेले आहे. यामुळे अनेक ठिकाणी ही नदी किनाऱ्याच्या प्रदेशापेक्षा उंचीवरून वाहते. मोसमी पावसाच्या कालावधीत ह्वांग हो च्या पुराचे पाणी नदीपात्रात न सामावल्याने सभोवतालच्या प्रदेशात पसरते व विस्तृत क्षेत्र पुराच्या पाण्याखाली येते. यास्तव नदीपात्राच्या किनाऱ्यावर बांध बांधले आहेत. ह्वांग हो च्यापुरांमुळे चीनला अनेकदा गंभीर पूरसमस्यांना सामोरे जावे लागते. पुरामुळे ह्वांग हो आपला प्रवाहमार्ग अनेकदा बदलत राहते. त्यामुळे मोठा अनर्थ होतो. ह्वांग हो सध्या समुद्रास जेथे मिळते, त्याच्या दक्षिणेस (शँटुंग द्वीपकल्पाच्या दक्षिणेस) पूर्वी समुद्रास मिळत होती. ह्वांग हो च्या पुरामुळे व प्रवाहमार्ग बदलण्यामुळे चीनला अनेकदा जीवित व वित्त हानीस सामोरे जावे लागले होते. म्हणून या नदीस ‘चीनचे अश्रूअसे संबोधतात.

ह्‌वांग हो च्या लोअर बेसिनमधील मैदानी प्रदेशास औद्योगिक व कृषी दृष्ट्या महत्त्व आहे. येथे मका, गहू, तांदूळ, भाजीपाला, कापूसइ. उत्पादन होते.

ह्‌वांग हो च्या पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी पूरनियंत्रण, जलसिंचन व विद्युत्निर्मिती यांकरिता १९५० च्या मध्यापासून तिच्या टप्प्यां-नुसार बहुउद्देशीय योजना नियोजित केली आहे. सॅनमन घळईवर, जंगजोनजीक धरण बांधले आहे. याची उंची ९० मी. असून याने २,३४९चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. याची जलधारणक्षमता ३६ महापद्मघ.मी. आहे. याशिवाय या नदीवर अनेक लहान-मोठी धरणे बांधली असून यामध्ये सॅनसेनगाँग धरण (१९६६), सिंगटाँग गॉर्ज धरण (१९६८), ल्योजिआ धरण (१९७४), यांगुसिआ धरण (१९७५), तिॲनक्विओ धरण (१९७७), बॅपॅनसिआ धरण (१९८०), लाँगयांगसिआ धरण (१९९२), लिजिआ धरण (१९९७), दा गॉर्ज जलविद्युत्शक्ती उत्पादन केंद्र (१९९८), ली गॉर्ज जलविद्युत्शक्ती उत्पादन केंद्र (१९९९), वँजीआझाई धरण (१९९९), लॅसिवा धरण (२०१०), सिओलँग्डी धरण (२०११) ही प्रमुख धरणे आहेत. ग्रँड कालव्याद्वारे ही नदी यांगत्सी नदीशी जोडली असून त्याचा उपयोग जलवाहतुकी-साठी होतो.

रशियन प्रवासी निकोलाय म्यिकाय्लव्हिच प्रसहेव्हॅल्स्की याने या नदीचे समन्वेषण १८७९ व १८८४ मध्ये केले होते. चिनी व रशियन शास्त्रज्ञ १९७० पासून या नदीचा अभ्यास करीत आहेत. लानजो, बाओतो, शीआन, तीय्ॲन, लोयांग, काइफेंग, जंगजो, यिनच्वान, लुंग-मन इ. या नदीकाठची प्रमुख शहरे आहेत.

गाडे, ना. स.