हौस्मॅनिया : मध्यजीव महाकल्पातील, परंतु जीवाश्मरूपाने फक्त भारतात आढळणारी डिप्टेरिडेसी या नेचाच्या कुलातील एक प्रजाती. क्रिटेशसमधील (सुमारे १३ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) केंट येथील वोल्डन थरात या प्रजातीतील एका विलुप्त जातीचे (हौ. पेलेटिअरी) जीवाश्म आढळतात. हौस्मॅनियाच्या कित्येक जाती मध्यजीव महाकल्पात उत्तरेकडील प्रदेशात (ग्रीनलंडमध्ये) होत्या. मध्यजीव महाकल्पाच्या आरंभापासून हौस्मॅनिया च्या जाती उदयास येत होत्या. भारतात हौस्मॅनिया च्या पुढील तीन जाती आढळतात. त्यांपैकी हौ. इंडिका ही जाती जबलपूर-मालेत आणि हौ. बूकाई व हौ. डायकोटोमा या जाती राजमहाल टेकड्यांत जीवाश्मरूपाने आढळतात. र्हेटिक व लायासिक महायुगात डिप्टेरिडेसी कुलातील जातींचे वैपुल्य होते परंतु मध्यजीव महाकल्पाच्या अखेरीस त्यांची संख्या घटत गेली. हल्ली या कुलातील फक्त एकाच प्रजातीतील (डिप्टेरिस) पाच ते आठ जाती इंडोमलायात आढळतात. त्या प्रजातीचे व हौस्मॅनियाचे जवळचे संबंध आहेत. डिप्टेरिडेसी कुलातील जातीत सर्व बीजुककोश एकाच वेळी पक्व होतात त्यांच्या पुंजावर पुंजत्राण नसते, परंतु अनेक सशीर्ष केसांची गर्दी असते. हौस्मॅनियाच्या भूमिस्थित खोडापासून जमिनीवर उगवलेल्या व लांब देठांच्या पानांची पाती कमी-–जास्त प्रमाणात विभागलेली असतात. काही थोड्या मजबूत शिरा व त्यापासून निघालेल्या इतर लहान शिरा यांच्या जाळ्यामुळे ह्या प्रजातीतील जाती इतरांपासून ओळखता येतात.
डिप्टेरिडेसी कुलातील डिक्टिओफायलम या विलुप्त व जुरासिक (१३ ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील प्रजातीचा इतिहास हौस्मॅनिया- प्रमाणेच आहे. भारतात या प्रजातीचे जीवाश्म अद्याप आढळलेले नाहीत.
पहा : नेचे पुरावनस्पतिविज्ञान.
संदर्भ : 1. Neaverjon, E. Statigraphical Palaeontology, Oxford, 1962.
2. Surange, K. R. Indian Fossil Pteridophytes, New Delhi, 1966.
परांडेकर, शं. आ.
“