होपवेल : उत्तर अमेरिकेच्या पूर्व-मध्य भागातील एक प्राचीन इंडियन संस्कृती. ती इ. स. पू. सु. २०० ते इ. स. ५०० दरम्यान ऊर्जितावस्थेत होती. ती प्रामुख्याने ओहायओ राज्यात प्रथम उजेडातआली पण तिचा विस्तार विस्कॉन्सिन, मिशिगन, इंडियाना, इलिनॉय, आयोवा, कॅनझस, पेन्सिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्क या राज्यांतूनही झालेला आढळतो. ओहायओ राज्यातील रॉस कौंटीमधील ‘होप ‘वेल फार्मवरूनया संस्कृतीचे नामकरण झाले कारण त्या ठिकाणी प्रथम या संस्कृतीचे अवशेष आढळले. या संस्कृतीच्या लोकांची घरे नदीनाल्यांच्या काठी असून ते मका, कडधान्ये व भोपळे यांची पिके घेत तथापि त्यांचेशिकार, मच्छीमारी व जंगलातून फळे, बिया, कंदमुळे गोळा करण्याचे उद्योग चालू होते. या भागात सापडलेल्या विविध वस्तू, मुख्यत्वे मृत्पात्रे, अलंकृत पाषाणशिल्पे आणि धातुकाम यांवरून कामाची विभागणी तत्कालीन मजुरांत केलेली असावी. त्यांनी बांधलेल्या २.४ – १२.२ मी. उंचीच्या मातीच्या गढींवरून संरक्षणासाठी ही व्यवस्था असावी किंवा दफनभूमीचे हे ढिगारे असावेत वा एखाद्या मंदिराचा-वास्तूचा पायाअसावा, असे वाटते. गढींभोवती मातीच्या भिंतींची तटबंदी होती. त्या ढिगाऱ्यांखाली असलेल्या थडग्यात मानवी सांगाड्यांबरोबरच तांब्याचे दागिने, दगडी कुर्‍हाडी, चितारलेली मृत्पात्रे इ. अवशेष सापडले. हीमृत्पात्रे रंगविलेली, अलंकृत, आकृत्या कोरलेली अशी उत्तम प्रकारची होती. पक्षी, मासे व अन्य प्राण्यांच्या चकचकीत आकृत्या दगडात कोरलेल्या आढळल्या. त्यांचे धातुकाम उच्च दर्जाचे होते, तांब्याच्या पत्र्यांचा विशेषत्वाने ते वापर करीत. यांशिवाय चांदी, लोह आणि प्रसंगोपात्त सोन्याचाही ते अलंकार व भांड्यांसाठी वापर करीत. येथे अभ्रकाचेही पत्रे आढळले. येथील लोकांचा व्यापारही भरभराटीस आलेला असावा, असे तत्कालीन व्यापारी मार्गांच्या (रॉकी मौंटन्स आणि गल्फ ऑफ मेक्सिकोचा किनारा) खुणांवरून आढळते. शिवाय अनेक दूरवरच्या प्रदेशांत होपवेल संस्कृतीच्या वस्तू आढळतात. इ. स. चौथ्या शतकात हळूहळू या संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला. या संस्कृतीतील दर्जेदार वस्तू आणि त्यांची संख्या घटली आणि एकवटलेली ही वस्ती असंघटित झाली. मका या धान्याचे उत्पादन, मृत्पात्रे बनविण्याचे कौशल्य, मृत व्यक्तींची वैशिष्ट्यपूर्ण दफने व धातुकामाच्या कलेतील प्रगती ही या संस्कृतीचीकाही वैशिष्ट्ये होत. 

देव, शां. भा.