हेलमंड : (प्राचीन एतिमँडर) . अफगाणिस्तान व इराणमधून वाहणारी, अफगाणिस्तानातील सर्वांत लांब नदी. लांबी सु. १,१५० किमी. जल-वाहनक्षेत्र १,६०,००० चौ. किमी. पेक्षा जास्त. ही नदी अफगाणिस्तान-मध्ये हिंदुकुश पर्वताच्या को-ई-बाबा पर्वतरांगेत उगम पावते वनंतर हजाराजात या मध्यवर्ती प्रदेशामधून नैर्ऋत्येकडे वाहत जाते. अफगाणिस्तानच्या दक्षिण भागातील दक्ष-इ-मार्गो व रेगिस्तान या ओसाड प्रदेशांमधून वाहताना ती पश्चिम वाहिनी बनते. चाहार बोरिॲक शहरानंतर ती उत्तर वाहिनी होऊन अफगाणिस्तानात इराणच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन सरहद्दीवरील हामून-इ-हेलमंड (हामून) दलदलयुक्त सरोवरास मिळते. अर्घंदाब ही तिची प्रमुख उपनदी आहे. 

 

हेलमंड नदीमुळे अफगाणिस्तानातील रुक्ष प्रदेशाचे दश्त-इ-मार्गो व रेगिस्तान असे दोन भाग झाले आहेत. हेलमंड नदीखोरे प्राधिकरणाद्वारे जलसिंचन, पूरनियंत्रण, जलविद्युत्निर्मिती अशा बहुउद्देशीय योजनांतर्गत हिच्यावर कंदाहार वायव्येस १६१ किमी.वर कजाकाई येथे धरण बांधण्यात आले आहे. या कजाकाई धरणाची उंची १०० मी. व लांबी २७० मी. तसेच जलधारण क्षमता १,७१,५०,००,००० घ. मी. आहे. या प्रकल्पांतर्गत अर्घंदाब नदीवर ७० मी. उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. हेलमंड आणि अर्घंदाब नदीखोरे प्राधिकरणाद्वारे हेलमंड व अर्घंदाब नद्यांवरील धरणांच्या जलविद्युत् व जलसिंचन क्षेत्रात जास्तीत जास्त वाढ केली जात आहे. इराणमध्येही जलसिंचनाबाबत हिला महत्त्व आहे. 

 

इराण व अफगाणिस्तान यांदरम्यान १९७२ मध्ये झालेल्या करारान्वये अफगाणिस्तानला हेलमंड नदीतून, इराणसाठी २६ घ. मी. प्रति सेकंद या प्रमाणात पाणी सोडणे बंधनकारक आहे. क्वाला, गिरीष्क, रूदबर इ. हिच्या काठची प्रमुख शहरे आहेत. 

गाडे, ना. स.