हेराक्लायटस : (इ. स. पू. सु. ५३६–४७०). एक प्राचीनग्रीक विचारवंत. त्याच्या ग्रंथाच्या तुटक भागाव्यतिरिक्त त्याच्या जीवनाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याचा जन्म आशिया मायनरमधील ॲनातोलियातील इफेसस नामक नगरात, राजकुळात झाला. कुलपंरपरेनुसार त्याच्याकडे प्रमुखपद चालत आले परंतु त्या पदा-भोवती त्याला न पटणाऱ्या धार्मिक समजुतींचे आणि विधिवैकल्यांचे जाळे असल्याकारणाने त्याने ते पद न स्वीकारता आपल्या भावास देऊन टाकले. हेराक्लायटसची धर्मविषयक काही वचने सुप्रसिद्ध आहेत. उदा., ‘दगडाच्या भिंतीशी संभाषण करावे त्याप्रमाणे हे लोक पाषाणाच्या मूर्तीची प्रार्थना करतात. वंदनीय देव किंवा लोकोतर पुरुष कसे असतात, हे यांना कळतच नाही. तसेच, हे लोक बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त आपल्या अंगावर शिंपडून आत्मशुद्धी करण्याचा नाहक प्रयत्न करतात. चिखलाच्या डबक्यात उतरलेल्या माणसाने आपले पाय तिथल्या पाण्याने धुवावेत अशातलाच हा प्रकार आहे. अशा मनुष्यास कोणीही वेड्यातच काढील’ इत्यादी. 

 

हेराक्लायटसने एकांतवासात जीवन कंठले. जनसामान्यांविषयी तसेच ग्रीक पूर्वसूरींविषयीही त्याला मनस्वी तिरस्कार वाटत असे. स्वतःच स्वतःला प्रश्न विचारून त्याने ज्ञान मिळवले, असे म्हटले जाते. त्याला जे सत्य आकलन झाले, ते दुसऱ्या कुणासही कळले नाही असा त्याचा दावा होता. डायोझिनीझच्या म्हणण्याप्रमाणे हेराक्लायटसने ऑन नेचर(निसर्गाविषयी) नावाचा सलग ग्रंथ लिहिला होता व त्याचे तीन भागकेले होते. विश्वाविषयी, राजनीतीविषयी व धर्मशास्त्राविषयी मात्र त्याचे विचार सॉक्रेटीसपूर्व अन्य विचारवंतांप्रमाणे त्रुटित स्वरूपात व इतरांनीउद्धृत केलेल्या स्वरूपातच उपलब्ध आहेत. त्याची लेखनशैली त्रोटक, सूत्रमय, आशयगर्भ, मर्मभेदक आहे. 

 

विश्वाच्या मुळाशी एक स्थिर, नित्य, अविनाशी, सर्वव्यापी द्रव्य असून, त्यामधून विविध पदार्थ प्रकटतात, असे मत आधीच्या थेलीझ (इ. स.पू. सहावे शतक) इ. मायलीशियन तत्त्ववेत्त्यांनी मांडले होते. याच्या उलट, विश्वात स्थिर, नित्य, अपरिवर्तनीय अशी कोणतीच वस्तू नाही, असे हेराक्लायटसचे प्रतिपादन आहे. जगात सारे काही सातत्याने बदलत असते, सरितेप्रमाणे वाहत असते, हा ‘अखंड परिवर्तना ‘चा सिद्धांत त्याने मांडला. उदा., नदीच्या पात्रात आपण दोनदा उतरू शकत नाही कारण क्षणाक्षणाला ताजे पाणी धावत येते आणि आपल्या पायास स्पर्श करून पुढे निघून जाते. 

 

विश्वामध्ये सर्वत्र गतिमानता, परिवर्तन, परस्परविरोधी प्रवृत्तींचा संघर्ष भरलेला आहे आणि विरोधी प्रक्रियांच्या जुळणीमुळेच वस्तुजातामध्ये ‘अनेकत्वातही एकत्व’ नांदत असते. सृष्टीचा समतोल, साम्यावस्था, एकतानता ही अंतर्गत संघर्षातूनच प्रकट होतात. संघर्षातच सृष्टीचे रहस्य दडलेले आहे. ‘संघर्ष हाच सर्वांचा पिता आणि अधिपती आहे’, असे हेराक्लायटस म्हणतो. 

 

परिवर्तनात्मक प्रक्रियेमुळे ‘अनेकत्वातही एकत्व’ कसे नांदू शकते याचे, हेराक्लायटसच्या मते, ‘अग्नी’ हे एक अप्रतिम प्रतीक आहे.अग्नी म्हणजे अविरत चालणारी ज्वलनाची क्रिया होय. या ज्वलनक्रियेत कोणतेही द्रव्य स्थिर राहत नाही. एकीकडे इंधनाचा स्वाहाकार होतो, तर दुसरीकडे बाष्पधूमांचे वमन होते. अग्नी नेहमी गिळंकृत केलेल्या वस्तूंची समप्रमाणात फेड करीत असतो. तेवणाऱ्या दीपज्योतीमधले द्रव्य सारखे बदलत असते तथापि तिची ज्वलनक्रिया काही एका ठरावीक प्रमाणातच घडत असल्याकारणाने ती ज्योती स्थिरावल्यासारखी भासते. साऱ्या विश्वातदेखील हेच घडत असते. हे विश्वच मुळी अग्निस्वरूप असून मूळच्या अग्नीमधून सृष्ट पदार्थ प्रकटतात आणि सृष्ट पदार्थांचे अग्नीमध्ये रूपांतर होते. बाजारपेठेत ज्याप्रमाणे अन्य चिजा विकून सोने मिळविता येते आणि सोन्याच्या बदली दुसऱ्या वस्तू खरेदी करता येतात, त्याप्रमाणे सृष्टीच्या व्यवहारात वस्तूंची अखंड देवाणघेवाण चाललेली असते. अग्नीपासून द्रवपदार्थ आणि प्रस्तरादी घनपदार्थ निपजतात. तद्वत उलट क्रमाने घनपदार्थ वितळून जल, बाष्प, वायू, प्राण, तेज आदी वस्तू उत्पन्न होतात. अशा प्रकारे सृष्टीच्या रहाटीमध्ये एक अधोगामी आणि दुसरा ऊर्ध्वगामी असे दोन मार्ग दृग्गोचर होतात. अर्थात हे दोन्ही मार्ग परस्परसंलग्न आणि अविभाज्य असून ते एकाच व्यापक प्रक्रियेत सामावलेले असतात, अशी हेराक्लायटसची शिकवण होती. 

 

त्याच्या मते, हे विश्व अनादी आणि अनंत असून ते कधीच नष्ट होत नाही. सृष्टी ही परिवर्तनशील असली तरी नाशवंत नाही. युगान्तकाळी अग्निप्रलय होऊन सगळी सृष्टी नामशेष होते, हा सिद्धांत हेराक्लायटसने मुळीच मांडला नाही. 

 

त्याच्या कल्पनेप्रमाणे, मानवी जीवनातील नीतिनियम सृष्टिव्यापारातल्या निसर्गनियमांशी संलग्न असतात. सृष्टीच्या व्यापारात नियम, मर्यादा, प्रमाण यांस अतोनात महत्त्व आहे. सूर्यदेखील आपल्या मर्यादांचे अतिक्रमण करणार नाही. त्याने जर तसे केले तर न्यायदेवतेच्या दासी त्याला काट्यावर घेतील. परिवर्तनाच्या प्रक्रियेत वस्तूंची देवाणघेवाण सदैव समप्रमाणातच होत असते. सृष्टीच्या ‘अखंड परिवर्तना ‘त कोणतेही द्रव्य स्थिर राहत नसले, तरी नियमाचा अंमल मात्र अबाधित असतो. त्यामुळेच तर सृष्टीमध्ये गतिमानतेतही साम्यावस्था, भिन्नतेतही एकात्मता, संघर्षातही समतोल, विरोधाभासातही विरोधातीतत्व प्रतीत होते. 

 

हेराक्लायटसने विश्वचालकशक्ती किंवा ईश्वर मानला असला, तरी त्याचे त्याने मानलेले स्वरूप रूढ ईश्वरकल्पनेपेक्षा वेगळे आहे. हा वादळाचा देव आहे. तो सतत चालू असलेल्या संघर्षाच्या, द्वंद्वाच्या माध्यमातून जीवनव्यवहार चालू ठेवतो. ही ईश्वरी शक्ती साऱ्या वस्तुजातातून प्रकट झाली आहे. दिवस-रात्र, हिवाळा-उन्हाळा, युद्ध-शांतता, तृप्ती-भूक या साऱ्यांतून ती प्रकट होते. तिला आपण वेगवेगळी नावे देतो, पण ईश्वरी शक्ती एक आहे असे हेराक्लायटसचे सांगणे होते. विश्वव्यापक ईश्वर द्वंद्वातीत असून त्याच्या नजरेत चांगले आणि वाईट दोन्ही अभिन्नच असतात, असे तो मानीत असे. 

 

हेराक्लायटसच्या मते, विश्वात्मक ईश्वरी तत्त्व विवेकसंपन्न आहे, यात शंकाच नाही. ही विवेकसंपन्नता मनुष्य-स्वभावातही स्फुलिंगवत् वास करते. मनुष्याचा आत्मा मुळात अग्निमय असतो. आत्म्याचे मूळ अग्निमय, दिव्य, प्रखर, विवेकसंपन्न स्वरूप कायम राखण्याची मनुष्याने दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी प्रखर तत्त्वनिष्ठा अनुसरली पाहिजे आणि संकुचित व सुखलोलुप प्रवृतींचा अव्हेर केला पाहिजे. जे सगळ्यांना समान आहे, त्यालाच माणसाने बिलगून राहिले पाहिजे. सैनिक ज्याप्रमाणे नगराच्या तटबंदीचे प्राणपणाने रक्षण करतात, त्याचप्रमाणे नागरिकांनी कायद्याची जपणूक केली पाहिजे, अशी त्याची धारणा होती. 

 

हेराक्लायटसचे तत्त्वज्ञान अत्यंत प्रभावशाली ठरले. ‘अखंड परि-वर्तना’च्या त्याच्या सिध्दान्ताने समकालिनांचे लक्ष वेधून घेतले. त्याला विरोध करण्यासाठी पार्मेनिडीझ (इ. स. पू. सहाव-पाचवे शतक) याने चिरंतन स्थिरतेचा सिध्दान्त प्रतिपादन केला. या दोन परस्परव्या-घाती सिध्दान्ताची सांगड कशी घालावी, या यक्षप्रश्नाने नंतरच्या ग्रीक तत्त्ववेत्त्यांना अस्वस्थ करून टाकले. 

 

हेराक्लायटसने जे विवेकसंपन्नतेचे नीतिशास्त्र पुरस्कारिले, तेच ⇨सॉक्रेटीस (इ. स. पू. सु. ४७०–३९९) याने सविस्तर प्रतिपादनकेले. हेलेनिझमच्या कालखंडातले स्टोइक तत्त्ववेत्ते, मध्ययुगातले ज्यू आणि ख्रिश्चन विचारवंत, त्याचप्रमाणे आधुनिक कालखंडातलेहेगेल (१७७०–१८३१), ⇨ कार्ल मार्क्स (१८१८–१८८३), ⇨ नीत्शे (१८४४–१९००), ⇨ आंरी बेर्गसाँ (१८५९–१९४१) यांच्यासारखे अग्रगण्य तत्त्वज्ञ हेराक्लायटसच्या शिकवणीने प्रभावित झालेले होते, अशी इतिहासाची साक्ष आहे. 

 

पहा : ग्रीक तत्त्वज्ञान. 

 

संदर्भ : 1. Allen, Reginald E. Ed., Greek Philosophy : Thales to Aristotle, New York, 1966.

           2. Copleston, F., A History of Philosophy, Vol. I, Londan, 1956.

          3. Kirk, G. S. Heracleitus, The Cosmic Fragments, Cambrigde, 1954. 

केळशीकर, शं. हि.