हेमिमॉर्फाइट : हे जस्ताचे पांढरे, रंगहीन, फिकट हिरवे, निळेवा पिवळे खनिज असून जस्ताचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. त्याला कॅलॅमाइन, विद्युत् कॅलॅमाइन वा गॅल्मेई असेही म्हणतात. स्फटिक समचतुर्भुजी प्रसूच्याकार [→ स्फटिकविज्ञान] स्फटिक बहुधा वडी-सारखे व गटाने आढळतात. शिवाय ते स्तनाकार, झुंबराकार, संपुंजित व कणमय रूपांतही आढळते. ⇨ पाटन (110) स्पष्ट कठिनता ४.५–५ वि.गु. ३.४-३.५ चमक काचेसारखी रंग पांढरा, काही बाबतींतफिकट निळसर वा हिरवट छटा, शिवाय पिवळा ते उदी भंजन उप-शंखाभ पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी तीव्रपणे उत्ताप विद्युतीय [→ खनिजविज्ञान]. रा. सं. Zn4(Si2O7)(OH)2 H2O. हे जस्ताचे सजल सिलिकेट (जस्त ६७.५%) असून त्यात अल्प प्रमाणात ॲल्युमिनियम व लोखंड असू शकतात. ते बंद नळीत तापविल्यास पाणी मिळते. त्याच्या स्फटिकांचे समूह वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ते ⇨ स्मिथसोनाइटा हून वेगळे ओळखता येते.
हेमिमॉर्फाइट हे द्वितीयक (नंतरच्या प्रक्रियांनी बनलेले) खनिज असून जस्ताच्या निक्षेपांच्या ऑक्सिडीभूत भागात आढळते. स्मिथसोनाइट, स्फॅलेराइट, सेर्युसाइट, अँग्लिसाइट व गॅलेना ही याच्याबरोबर आढळणारी खनिजे होत. बेल्जियम, जर्मनी, रूमानिया, सार्डिनिया, कंबरलँड, इंग्लंड, अल्जीरिया, मेक्सिको व अमेरिका येथे ते आढळते. जस्ताचे धातुक म्हणून त्याचा उपयोग होतो. त्याच्या स्फटिकांच्या अर्धाकृती( हेमिमॉर्फिक) वैशिष्ट्यावरून त्याला हेमिमॉर्फाइट हे नाव दिले.
बरीदे, आरती ठाकूर, अ. ना.
“