हेमपुष्पिका : (पिवळी चमेली हिं. पीली चमेली, पीतमालती क. हसरुमल्लिगे सं. सुवर्णजुठिका, हेमपुष्पिका बं. स्वर्णजुई ते. पच्छे अदाविमल्ले त. सेम्मल्लिगाई म. पोनमल्लिका इं. यलो जॅस्मिन, इटालियन जॅस्मिन, यलो नेपाल जॅस्मिन लॅ.जॅस्मिनम ह्युमाइल कुल-ओलिएसी) . ह्या सरळ, कठिण, शाखायुक्त व सदापर्णी बहुवर्षायू झुडपाप्रमाणे वाढणाऱ्या मोठ्या वेलीचा प्रसार श्रीलंका व भारतात (सह्याद्री, निलगिरी, पळणी, मलबार व त्रावणकोर मधल्या टेकड्यांवर सु. १,५५० मी.पर्यंत व वायव्य हिमालयात) सर्वत्र असून शोभेकरिता बागेतूनही लावतात. हिचे झुडूपसु. ३ मी. वाढते. तसेच वेल लांब फांद्यांनी जवळच्या आधारावर चढत जाते. ती बागेत मांडवावर किंवा कमानी व भिंतींवर चढवितात. फांद्या हिरव्या व कोनांमध्ये विभागलेल्या असतात. पाने एकाआड एक, २.५–७.५ सेंमी. व पिसांसारखी पर्णिका (१३ ⇨ ६ मिमी.) ३–७, अंडाकृती ते भाल्यासारख्या आकाराच्या व चिवट असतात. अंतिम पर्णिका इतरांपेक्षा मोठी व टोकदार असते. फुले द्विलिंगी, पिवळी, नलिकाकार व मंद सुवासिक असून जुलै-ऑगस्टमध्ये २?४ च्या झुबक्यांनी येतात. फुलांमध्ये ५ रुंद पाकळ्या असतात. परागण कीटकांमार्फत होते. मृदुफळ काळे व ८ मिमी. व्यासाचे असून त्यात जांभळा रस असतो. 

 

हेमपुष्पिका (जॅस्मिनम ह्युमाइल) : पानांफुलांसहित फांदी.
 

हेमपुष्पिका वनस्पतीच्या फुलांपासून सुवासिक तेल काढून त्याचा उपयोग सुगंधी द्रव्यात करतात फुले स्तंभक असून हृदय व आतड्यांना शक्तिवर्धक असतात. मुळांपासून पिवळा रंजक अर्क तयार करतात. मुळांचा रस नायट्यावर लावण्यास उपयुक्त असतो. तसेच खोड कापल्यावर त्यातून पाझरणारा दुधासारखा रस अनुकर्ण ग्रंथी नाडीव्रण आणिगुदमार्ग नाडीव्रण यांच्या रोगट अस्तर भित्ती नष्ट करण्यास उपयुक्तआहे.

 

पहा : ओलिएसी जाई. 

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.

 

हेमपुष्पिका (जॅस्मिनम ह्युमाइल)
हेमपुष्पिका (जॅस्मिनम ह्युमाइल)