हेकरू : या माशांचा समावेश पर्सिफॉर्मीस गणाच्या सेरेनिडी कुलात एपिनिफेलस व मिक्टेरोपर्का या प्रजातींत होतो. त्यांना गोब्रा असे नावअसून ते रॉक पर्चेस व ग्राउपर या सर्वसामान्य नावानेही ओळखले जातात. हे मासे मुख्यतः खडकाळ सागरी किनाऱ्यावर व भारतात पूर्व सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. एपिनिफेलस प्रजातीत सु. १०० जाती आढळतात. त्यांपैकी महाराष्ट्रात आठ जाती आढळतात. या माशांच्या रंगांमध्ये खूपच विविधता आढळते. त्यामुळे त्यांचा उपयोग मत्स्यालयामध्ये ठेवण्यासाठी करतात. या माशाचे जबडे रुंद असतात. हे मासे उभयलिंगी असून सुरुवातीस ते मादीसारखे कार्य करतात आणि नंतर त्यांचे नरामध्ये रूपांतर होते.
क्वीन्सलँड ग्राउपर किंवा जायंट ग्राउपर (एपिनेफेलस लँसिओलेटस) ही जाती आकाराने मोठी असून तिचा आढळ इंडो-पॅसिफिक भागांत आहे. तिची लांबी सु. ३.६ मी.पर्यंत व वजन सु. ४५० किग्रॅ.पर्यंत असते.तिची लांबी सु. १.३ मी. झाल्यावर ती प्रजननक्षम होते. काही मोठ्याजाती झुंजीसाठी (स्पोर्टफिश म्हणून) प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झुंजी बडिशमीन व स्पिअरफिश या माशांसोबत लावतात. ते खादाड व मांसाहारीमासे असून मुंबई येथील तारापोरवाला मत्स्यालयामध्ये काटेरा शेवंडा( लॉब्स्टर) खाताना आढळले आहेत. ते काटक असून पकडल्यानंतर दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे हलाल करण्यासाठी (जिवंत प्राणी तत्काळ मारण्याची पद्धत) त्यांना मोठी मागणी असते. पूर्ण वाढ झालेले मासे राखाडी रंगाचे असून शरीरावर काळ्या राखाडी रंगाचे पट्टे असतात. त्यांच्या वरच्या तसेच खालच्या जबड्यात लहान सुळे असतात. शल्क( खवले) चक्रज असतात. त्यांचे पर पिवळसर रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. पृष्ठपक्षावर काटे असतात. अधरपक्षापेक्षा अंसपक्ष लांब असतात. गुदपक्ष व पुच्छपक्ष गोलाकार असतात. काही माशांच्यामांसामध्ये विषारी पदार्थ असतो आणि ते खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन सिग्वाटेरा हा आजार होतो.
स्पाइनीचीक ग्राउपर (ए. डायकँथस) ही जाती भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर आढळते. तिचा रंग तपकिरी-गुलाबी असून उदराकडील बाजू फिकट गुलाबी रंगाची असते. तिची लांबी सु. ४६ सेंमी. असते.
ए. बोनॅक ही जाती भारत ते चीनच्या सागरात आढळते. तिच्या शरीराचा रंग भडक पिवळा-तपकिरी वा निळसर असतो.
ए. सोनिरटी ही जाती आफ्रिका ते मलायाच्या (मलेशियाच्या) सागरात मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र व चेन्नईच्या सागरी किनाऱ्यावरहीती आढळते. या माशामध्ये पुढील भागावर निळ्या रंगाचे रेषांचे जाळे असते. बहुतेक परावर गडद तांबड्या रंगाचे ठिपके असतात. पुच्छ-पक्षावर निळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. त्याच्या शरीराची लांबीसु. ९१ सेंमी. असते.
ग्रीसी ग्राउपर (ए. टॉव्हिना) ही जाती भारत ते चीनच्या पूर्व सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळते. ती हुगळी नदीच्या सागरमुखाशी (नदी सागराला मिळते अशा ठिकाणी) हिवाळ्यात आढळते. तिचीलांबी ५०–७५ सेंमी. व वजन ६००–७०० ग्रॅ. असते. या माशाचे डोके पिवळसर तपकिरी रंगाचे असून त्यावर नारिंगी रंगाचे ठिपके असतात. शरीरावर काळसर रंगाचे ठिपके असतात. अधर (खालच्या) बाजूचारंग तपकिरी वा फिकट पांढरा असतो. त्याच्या शरीरावरील ठिपक्यांमुळेहे मासे बिबळ्यासारखे दिसतात. चेन्नईच्या मत्स्यालयामध्ये हा मासा२६ वर्षे जगल्याची नोंद आहे.
वेव्ही लाइन ग्राउपर (ए. अंड्युलोसस) ही जाती भारत ते चीनच्या सागरात तसेच चेन्नईच्या सागरी किनाऱ्यावर आढळते. तरुण मासे हिवाळ्यात किनाऱ्याजवळ आढळतात. त्यांच्या शरीराचा रंग पिवळसर हिरवा किंवा तपकिरी राखाडी असून उदराकडील बाजूस तो फिकटअसतो. शरीरावर निळसर व गडद तपकिरी रंगाच्या उभट रेषा असतात. त्याची लांबी सु. १२२ सेंमी. असते.
रेड ग्राउपर (ए. मोरिओ) ही जाती इतर ग्राउपरसारखीच, परंतु तिचापृष्ठपक्ष मोठा व काटेदार, अंसपक्ष मोठा व श्रोणिपक्ष लहान असतो.त्याचा रंग गडद लाल-तपकिरी, बाजूला गुलाबी असून शरीरावर पांढरे ठिपके व पट्टे असतात. हे मासे ४-६ वर्षांनी प्रजननक्षम होऊन त्याचेप्रथम मादीमध्ये रूपांतर होते. मादी जानेवारी–एप्रिल दरम्यान अंडीघालते. शुक्राणू व अंडाणूचे पाण्यात मीलन होते. ३० तासांनी अंडाचेफलन होऊन पिले जन्माला येतात. ७–१४ व्या वर्षी मादीचे नरामध्ये रूपांतर होते.
वॉरसॉ ग्राउपर (ए. निग्रिटस) ही मोठी अटलांटिक जाती ज्यू फिशम्हणून ओळखली जाते. या माशाचा रंग करडसर किंवा तपकिरी असूनदहा पृष्ठीय कंटक (काटे) असलेला तो एकमेव ग्राउपर आहे.
गोल्डन स्ट्राइप्ड ग्राउपर (ग्रामिस्टस सेक्सलिनिएटस) ही इंडो-पॅसिफिक जाती सु. २५ सेंमी. लांब असून तिचा रंग काळा व त्यावर पिवळेपट्टे असतात.
नासो ग्राउपर (ए. स्ट्रायटस) ही जाती सु. ९० सेंमी. लांब व वजनसु. २५ किग्रॅ.पर्यंत असते. तिच्या रंगांमध्ये विविधता असते. तिचा रंग पांढरा, गडद तपकिरी किंवा करडसर तपकिरी व त्यावर गडद खुणा असतात किंवा खुणा नसतात. ही जाती उथळ पाण्यात सु. ९० मी. खोलीपर्यंत आढळते. यामध्ये नर व मादी हे वेगवेगळे प्राणी असतात.इतर जातीच्या ग्राउपरप्रमाणे यामध्ये मादीचे नरामध्ये रूपांतर होत नाही.
हायफिन ग्राउपर (ए. मॅक्युलेटस) व ए. मलबारीकस या जाती महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आढळतात. ए. ब्लिकेरी ही जाती चेन्नईच्या सागरी किनाऱ्यावर आढळते. या जातींचा उपयोग खाद्यमत्स्य म्हणून करतात
पाटील, चंद्रकांत प. मगर, सुरेखा अ.
“