तमील : (१) फुलांसह फांदी, (२) फळ.

तामील : (हिं. सं. म. तमाल क. हर्दला इं. गँबोज ट्री लॅ. गार्सीनिया भोरेला कुल–गटिफेरी). सु. १०–२० मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष बांगला देश, खासी टेकड्या, उत्तर कारवार, मलबार, श्रीलंका, सयाम, मलाक्का इ. प्रदेशातील दाट जंगलात आढळतो. तो कोकम व आमली यांच्या वंशातील आणि ⇨ गटिफेरी अथवा कोकम कुलातील असल्याने त्यांचे याच्याशी अनेक शारीरिक लक्षणांत साम्य आहे. फांद्या पसरट व गुळगुळीत असून पाने कोकमासारखी पण थोडी मोठी असतात. स्त्री–पुष्पे एकाकी व पुं. पुष्पे २–५ च्या झुबक्यांनी पानांच्या बगलेत, नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. मृदुफळ लहान, गोलसर व तळाशी संवर्ताने वेढलेले बिया चार, पिंगट, लांबट व साधारण चपट्या असतात. खोडावर पाडलेल्या खाचांतून पिवळट व चिकट द्राव स्रवतो, तो गँबोज राळ आणि डिंक यांचे मिश्रण असते. तो विलायती आमलीतून मिळणाऱ्या गँबोजसारखा असून रंगरोगणे, अन्न, मलमे इत्यादींत व प्रदीपक (दिव्यात वापरण्याकरिता) म्हणून वापरला जातो. तसेच हा तीव्र रेचक आणि कृमीनाशक असून जलशोथ (पाणी साचून आलेली सूज), अनार्तव (विटाळ बंद होणे), बद्धकोष्ठता यांवर उपयुक्त आहे फीतकृमिनाशक औषधात तो वापरतात. लचकणे, खरचटणे व सूज यांवर लावतात. याला ‘रेवाचिनी’ असेही म्हणतात. याचे लाकूड कठीण असून त्यापासून पेट्या, कपाटे वगैरे बनवितात. बियांतील मेद साबणात वापरतात तसेच त्याचा तुपाऐवजीही उपयोग करतात.

हळदी : (ओंट लॅ. गार्सीनिया स्पायकॅटा, प्रकार मायक्रँथा). या नावाचा मध्यम आकाराचा एक सयामी सदापर्णी वृक्ष तामीलच्या वंशातील असून त्याचा प्रसार भारतात कोकण, घाट व कारवारची जंगले ह्यांत बराच आहे. शारीरिक लक्षणे साधारणपणे तामीलसारखी लाकूड कठीण पण चिंबण्याची शक्यता जास्त असते.

पहा : आमली (विलायती) कोकम गटिफेरी.

महाजन, मु. का.