ताब्रीझ : इराणमधील चौथ्या क्रमांकाचे शहर व आझरबैजान प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,६५,००० (१९७३ अंदाज). ताब्रीझ ताल्खे नदीवर कूह–ए–सहांद पर्वताच्या उत्तर पायथ्याशी समुद्रसपाटीपासून सु. १,३६७ मी. उंचीवर, तेहरानच्या वायव्येस ५२८ किमी. व उर्मिया सरोवरापासून ६४ किमी. वर बसले आहे. रशियन सरहद्दीपासून १२० किमी. वरील या शहराचे हवामान खंडीय असून गरम झऱ्यांनी (टॅपरिझ–उष्णता लागून उसळी घेणारे यावरून ताब्रीझ) वेढलेले हे शहर भूकंप पट्ट्यात येते.
तिसऱ्या शतकात ताब्रीझ आर्मेनियनांचे वसतिस्थान असावे, त्याचे टॉरिस असे प्राचीन नावही आढळते. भूकंपाने नष्टप्राय होऊनही ते ७९१ मध्ये पुनश्च उभारण्यात आले. असे भूकंप ताब्रीझने वारंवार (८५८, १०४१, १७२१, १७८०) अनुभवले. सु. १०२९ मध्ये गझ तुर्कांनी ते बळकावले. १०५४ मध्ये सेल्जुकांनी त्याला आझरबैजान प्रांताची राजधानी बनविले. १२९५ मध्ये मंगोल सम्राट ईलखान गाझानखानाने ताब्रीझ आपल्या विस्तीर्ण साम्राज्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र केले. त्याच्या कारकीर्दीत शहराभोवती नवे तट, अन्नछत्रे, सार्वजनिक इमारती, महाविद्यालये, ग्रंथालये बांधण्यात आली. १३९२ मध्ये ताब्रीझ तैमूरलंगने बळकावले. पुढे शाह अब्बास (१६१८), नादीरशाह (१७३०) ह्यांच्या अंमलाखालीही ते होते. अशा प्रकारे उन्नती–अवनतींच्या चक्रामधून ताब्रीझ फिरत असले, तरी सतराव्या शतकात ते मोठे व्यापारकेंद्र म्हणून भरभराटले. तुर्कस्तान, रशिया, मध्य आशिया आणि हिंदुस्थान यांच्याशी त्याचा व्यापार चाले. विसाव्या शतकारंभी इराणच्या राष्ट्रवादी चळवळीचे केंद्र म्हणून ताब्रीझने सिंहाचा वाटा उचलला.
शहरातील सर्वाधिक लक्ष वेधणाऱ्या जुन्या इमारती म्हणजे ब्लू मॉस्क (मसजिद–इ–काबुद, १४६५–६६) आणि बालेकिल्ला. मशीद निळ्या फरशांनी मढविलेली असून अतिशय प्रेक्षणिय आहे. बालेकिल्ला (सु. १३२२) त्याचा साधेपणा, आकार व वीटबांधकाम यांबद्दल प्रसिद्ध आहे. ताब्रीझ तेहरानशी व रशियाशी लोहमार्गांनी जोडलेले असून तेथे एक विमानतळही आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आधुनिकतेच्या वळणामुळे झालेल्या द्रुतप्रगतीत लोहमार्ग स्थानक व ताब्रीझ विद्यापीठ यांच्या नवीन इमारती मोडतात. चर्मोद्योग व कापडउद्योग यांचे केंद्र म्हणून ताब्रीझ प्रसिद्ध असले, तरी त्याची अधिक ख्याती झाली ती तेथील हस्तोद्योगांमुळे–विशेषतः गालिचे व रग यांचे निर्मितिकेंद्र म्हणून. शहरात सुती व ऊनी कापडगिरण्या, पीठगिरण्या, साबण, आगकाड्या व मद्यार्क यांचे कारखाने आहेत. सुकी फळे व गालिचे यांची ताब्रीझ मोठी व्यापारपेठ आहे. मंगोल ईलखानाच्या कारकिर्दीत रंगीत लघुचित्रे काढण्याचा चित्रकला–प्रकार याच शहरात विकसित झाला. म्हणून ताब्रीझ संप्रदाय ह्या नावाने येथील चित्रशैली सुविख्यात आहे.
गद्रे, वि. रा.