होवा राजवाडा, तानानारीव.

तानानारीव : (अँतनॅनरीव्हो). आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील मॅलॅगॅसी (मादागास्कर) प्रजासत्ताकाची व त्याच्या तानानारीव प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,८१,५१२ (१९७१). मादागास्करच्या पूर्व किनाऱ्यापासून १४५ किमी. आत, बेटाच्या मध्यभागी १,४३१ मी. उंचीवर हे शहर बसले आहे. येथील हवा उष्ण असून मे ते सप्टेंबर हवा चांगली असते पण ऑक्टोबर-एप्रिल काळात उन्हाळा असतो आणि पाऊसही त्याच काळात पडतो.

हे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीचे केंद्र आहे. इवातो व आरीव्हूनीमानू हे येथील विमानतळ आहेत. खाद्यतेले, चर्मोद्योग, पदार्थांची डबाबंदी, छपाई, रेल्वे कारखाने, तंबाखू व खाद्यपदार्थ प्रक्रिया, कापड इ. उद्योग येथे चालतात. शहराच्या सर्वोच्च भागात ‘शाही’ बाग व इमेरिना राजांनी बांधलेले प्रेक्षणीय राजवाडे असून त्यांत चांगले वस्तुसंग्रह आहेत. येथे अनोसी हे पवित्र सरोवर, फोर्ट व्हायरॉन आणि अनेक प्रेक्षणीय कॅथीड्रल आहेत. हे शैक्षणिक केंद्र असून १९६१ मध्ये येथे वाङ्‌मय व विज्ञान शाखांचे विद्यापीठ स्थापन झाले, त्यात १९७२ मध्ये ५,६६८ विद्यार्थी होते. तसेच येथे वैद्यक व कायदा अभ्यासाच्या संस्था, वेधशाळा व संशोधन संस्था आहेत. येथील लोकांत फ्रेंच, चिनी व भारतीय लोकांची संख्या लक्षणीय आहे.

डिसूझा, आ. रे.