ताकिन : समखुरीय गणाच्या गोकुलातील ब्यूडारॅकस वंशाचा प्राणी. या वंशात ब्यूडारॅकस टॅक्सिकलर ही एकच जाती आहे. कस्तुरी बैलाचा हा जवळचा नातेवाईक आहे. हे प्राणी भूतानमधील मिशमी टेकड्या आणि उ. ब्रह्मदेश येथील मूळचे राहणारे आहेत. द. चीनच्या कॅन्सू प्रदेशातही ते आढळतात. २,४००–४,२५० मी. उंचीवरील बांबू आणि ऱ्होडोडेंड्रॉन यांच्या गर्द जंगलात ते राहतात.
डोक्यासह याच्या शरीराची लांबी सु. १·२ मी. असते शेपूट आखूड, रुंद असून केसांखाली झाकलेले असते, त्याची लांबी १० सेंमी. असते खांद्यापाशी उंची ७६–१०७ सेंमी. असून प्रौढ प्राण्याचे वजन २३०–२७५ किग्रॅ. असते. हा प्राणी केसाळ, अवजड आणि दिसायला बेढब असतो. याची ठसठशीत लक्षणे म्हणजे फार मोठा बहिर्गोल चेहरा आणि अतिशय जाड मान ही होत. मुस्कट केसाळ असते. याचे पाय मजबूत पण आखूड असतात. नर आणि मादी या दोघांनाही शिंगे असतात व ती भरभक्कम असून सु. ६४ सेंमी. लांब असतात. त्यांच्या बुडांजवळ आडवे कंगोरे असतात. ताकिनांच्या लहान लहान टोळ्या असून एका टोळीत सु. आठ प्राणी असतात.
गडद तपकिरी रंगापासून तो सोनेरी पिवळ्या रंगापर्यंत सर्व प्रकारचे रंग ताकिनमध्ये आढळतात. खांदे स्पष्टपणे फिक्कट रंगाचे असतात. मिशमी ताकिनांचे प्रौढ नर सोनेरी पिवळ्या रंगाचे असतात, पण बाजू व पुठ्ठे यांवर हा रंग गडद तपकिरी किंवा काळ्या रंगात मिळून गेलेला असतो. पाठीवर एक काळा पट्टा असतो. लहान वयाचे नर तांबूस तपकिरी असून पुढच्या बाजूकडे हा रंग काळ्या रंगात मिसळून गेलेला असतो. वासरे काळ्या रंगाची असतात. माद्या नरांपेक्षा जास्त करड्या असून त्यांच्यात पिवळ्या रंगाचा मागमूसही नसतो. माद्या आणि लहान वयाचे नर यांच्या पाठीवरील पट्टा अस्पष्ट असतो.
उन्हाळ्यात वृक्ष–सीमेच्या (ज्या उंचीच्या पलीकडे वृक्ष वाढत नाहीत तिच्या) जवळ किंवा तिच्यावर ताकिनांचे मोठाले कळप गोळा होतात, पण हिवाळ्यात त्यांची लहान टोळ्यांत पांगापांग होऊन त्या कमी उंचीवरील गवताळ खोऱ्यात आश्रय घेतात. म्हातारे नर बहुधा एकेकटे असतात, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत माद्या आणि नर वारंवार एके ठिकाणी आढळतात. संकटाची चाहूल लागताच कळपातील काही ताकिन इतरांना सूचना देण्याकरिता खोकण्यासारखा आवाज काढतात आणि तो ऐकल्याबरोबर कळपातले सगळे प्राणी बचावाकरिता धावत जाऊन दाट झुडपात लपून बसतात. सबंध दिवस ते दाट झाडीत घालवितात आणि संध्याकाळी चरण्याकरिता बाहेर पडतात. उन्हाळ्यात ते गवत आणि इतर कोवळ्या वनस्पती खातात, परंतु हिवाळ्यात वाळुंज आणि बांबू यांचे कोंब व कोवळ्या फांद्या हे त्यांचे भक्ष्य होय.
नर आणि मादी यांचा समागम जुलै किंवा ऑगस्टमध्ये होतो व मार्च किंवा एप्रिलमध्ये मादीला एकच पिल्लू होते. तीन दिवसांतच ते आईबरोबर सगळीकडे हिंडूफिरू लागते. एक महिन्यानंतर मादी पिल्लाला अंगावर पाजण्याचे बंद करते.
डोंगराळ प्रदेशातील रहिवाशांना आणि चिनी लोकांना ताकिनांचे मांस फार आवडते म्हणून ते त्यांना जाळ्यात पकडतात किंवा कड्यावरून पाडून मारतात.
यार्दी,ह. व्यं.
“