तलैंग : ब्रम्हदेशातील एक जमात. हे स्वतःला मॉन म्हणतात, तर यूरोपीय त्यांचा पेग्युअन असा उल्लेख करतात. १९६० मध्ये ब्रम्हदेशात त्यांची संख्या ३,५०,००० व थायलंडमध्ये ६५,००० होती. काही विद्वानांच्या मते, मॉन पश्चिम चीनमधून ब्रम्हदेशात आले असावेत व त्यांच्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडला असावा. इतरांच्या मते मॉन तेलंगणातून आले व म्हणून त्यांचे ब्रम्हदेशात तलैंग असे नाव झाले असावे. तलैंगांची लिपी दक्षिण भारतीय भाषांच्या लिपींशी मिळतीजुळती आहे. मॉन लोकांचा सर्वांत प्राचीन शिलालेख थायलंडमध्ये लॉपबुरी येथील एका खांबावर सापडला, त्यावरील लिपी पाचव्या शतकातील लिपीशी मिळतीजुळती आहे, असे विद्वानांचे मत आहे. अकराव्या शतकात मॉन साम्राज्य पेगूत स्थिर झाले होते. अकराशे ते सोळाशेच्या दरम्यान मॉन व ब्रम्ही लोक यांच्यात बऱ्याच चळवळी झाल्या. सोळाव्या शतकातील ब्रम्हदेश व थायलंडमधील युद्धांमुळे मॉन लोकांची अपरिमित हानी झाली. या काळात त्यांना वेठबिगारीने काम करावे लागले व त्यांची शेती उद्ध्वस्त झाली.
मुटाटकर, रामचंद्र