तरटी : (हिं, अर्दंडा, लॅ. कॅपॅरिस हॉरिडा कुल–कॅपॅरिडेसी) ही बहुवर्षायू ( अनेक वर्षे जगणारी) काटक वेल [⟶ महालता] भारतात (विशेषतः सह्याद्री घाटात) व सिंधमध्ये सामान्यपणे आढळते. गोविंदफळ व तिळवण यांच्या वरुण कुलातील [⟶ कॅपॅरिडेसी] असल्याने ही अनेक लक्षणांत त्यांच्याशी साम्य दर्शविते. कोवळ्या भागांवर लव आणि वाकडे उपपर्णी काटे असतात. पाने साधी, एकाआड एक, २·५–७·५ X २·५ सेंमी. लंबगोल असून टोकास लांब काटा आणि पृष्ठभाग चकचकीत असतो. फुले बगलेच्या वर एकटी किंवा ओळीने २–३ अशी नोव्हेंबर ते एप्रिलात येतात. ती प्रथम पांढरी व नंतर गुलाबी दिसतात. किंजधर (किंजपुटाखालील लांब दांडा) ३·५ सेंमी. मृदुफळ तांबूस पिंगट, गोलसर चौकोनी बिया अनेक इतर सामान्य लक्षणे कॅपॅरिडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. ही झाडे कुंपणास चांगली असतात. फळांचे व फुलांचे लोणचे करतात साल पोटदुखी व पटकी यांवर गुणकारी असते.