तडित् युद्धतंत्र : रेषानुसारी संरक्षण आघाडी (पहिल्या महायुद्धातील आघाडी रचनेनुसार) भेदण्याचे आक्रमक युद्धतंत्र. याचा इंग्रजी पर्याय ब्लिट्झक्रीग म्हणजे विद्युत् पातासारखे होणारे युद्ध असा आहे. जर्मनीने सप्टेंबर १९३९ मध्ये पोलंडवरील आक्रमणात या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता, म्हणून ‘बीके’ (BK) हा शब्द रूढ झाला. ज्या ठिकाणी कमजोर संरक्षक बळ असते अगर दोन सैन्यांच्या बगला परस्परांना लागून असतात, त्या ठिकाणी अचानक चिलखती सैन्याचा धडाका मारून फळी फोडणे व पाडलेल्या भगदाडातून शीघ्रतेने पाणलोंढ्याप्रमाणे पुढे घुसणे, तसेच पिछाडीवरील नियंत्रण, दळणवळण, रसदपुरवठा–केंद्रे व राखीव सैन्यतळ यांची विल्हेवाट लावणे व त्यांना कोंडीत पकडणे, असे या युद्धतंत्राचे स्वरूप असते. एकंदरीत शत्रूला हवालदिल करून गोंधळविणे आणि अगतिक करणे हा या तंत्राचा पाया असून आघात, गतिमानता, शीघ्र हालचाल व बलकेंद्रीकरण हा त्याचा आत्मा होय. वास्तविक यास चिलखती युद्धतंत्र म्हणणे वावगे होणार नाही.

(अ) सेनेचे प्रारंभीचे एकत्रीकरण (आ) शत्रुफळीचा भेद व आगेकूच (अ) (आ) आक्रमणाची चाल : (१) चिलखती दले—रणगाडे, (२) वाहनगामी पायदळ, (३) दाबसैन्य, (४) पायदळ, (५) शत्रुफळीतील कमजोर जागा, (६) लढाऊ व बाँबफेकी विमाने, (७) विमानांची उद्‌ध्वस्त केलेली पिछाडी, (८) शत्रु-आघाडीची फळी.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : पहिल्या महायुद्धाच्या वेळी रणगाडे व विमाने यांच्या उपयुक्ततेची चुणूक दिसून आली होती. तसेच फळीभेदनाचे फायदेही लक्षात आले होते परंतु त्यासाठी योग्य सामग्री नव्हती. १९१९–३९ च्या कालखंडात ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स या देशांत रणगाडे, चिलखती सेना व त्यांचा युद्धक्षेत्रीय वापर यांवर विचार झाला. ब्रिटनचा जनरल फुलर आणि लिडल हार्ट, विट्रिंगहॅम, फ्रान्सचा द गॉल, जर्मनीचा गूडेरिआन आणि रशियाचा तुकाचेव्हस्की इत्यादींनी या तंत्राविषयी विचारप्रणाली मांडली. स्पेनच्या यादवी युद्धात जर्मनी व रशियाने या तंत्राचा प्रथम वापर केला परंतु जनरल गुडेरिआन याच्या नेतृत्वाखाली मात्र या तंत्राला परिपक्वता आली.

ऐतिहासिक दृष्ट्या या तंत्राचा प्रथम वापर तेराव्या शतकात चंगीझखान व त्याचे वंशज यांनी करून काही यूरोपीय व पौर्वात्य राष्ट्रांना पराभूत केले होते. नेपोलियनच्या जेना (येना)–आउअरश्टेटच्या मोहिमेतही (१८०६) या तंत्राची झलक दिसते, तसेच शिवाजीच्या युद्धतंत्रातही काही प्रमाणावर तडित् युद्धतंत्राची लक्षणे आढळतात. शत्रूचा निःपात करणे हे या युद्धतंत्राचे उद्दिष्ट असल्यामुळे जी राष्ट्रे लहान असतात व ज्यांना झटपट तसेच थोड्या दिवसांतच युद्धाचा निर्णय लावावयाचा असतो, त्यांच्या दृष्टीने हे तंत्र सोयीस्कर ठरते.


तडित् युद्धसेनासंघटना : आक्रमण व संरक्षण विचारप्रणाली ही प्रत्येक राष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेवर अवलंबून असते. तिला अनुसरूनच चिलखती सेनेची व इतर दलांची संघटना केली जाते. साधारणतः सेनासंघटनेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते : टेहळणीसाठी व धडाक्यासाठी टेहळणी गाड्या आणि रणगाडे यांची दले असतात. तसेच शत्रूची मोर्चेबंदी फोडण्यासाठी स्वयंचलित आघात तोफखाना रणगाड्यालगत ठेवावा लागतो. सहाय्यक रणांगणी व मध्यम तोफखाना शत्रुफळीवर तसेच पिछाडीवर गोळामारीसाठी आवश्यक असतो. संरक्षणासाठी चिलखतभेदी व विमानविरोधी तोफा सेनेबरोबर कूच करतात. सेना कूच करताना व धडाका देत असताना वायुसंरक्षणासाठी, बाँब टाकण्यासाठी व आकाशातून गोळीमार करून शत्रूवर दबाव आणण्यासाठी लढाऊ विमाने डोक्यावर भ्रमण करीत असतात. तसेच सेनेसोबत सुरुंग काढणे व पूल बांधणे इ. कामांसाठी अभियंता–दलेही असतात. दलादलांतील सहकार्य व आज्ञा देणे–घेणे यांसाठी रेडिओ संदेश–दळण–वळण व्यवस्था असते. रसद, पेट्रोल व दारूगोळा इ. पुरविण्यासाठीही रसद पुरविणारी दले पाठोपाठ कूच करतात. सर्व सेनादले वाहनगामी असावीच लागतात. पायदळ, रणगाडे व वायुसेना यांचा संघटितरित्या उपयोग केला तरच ते तंत्र लाभदायक ठरते.

सेनासंघटनांचा वापर : या युद्धतंत्रात सेनासंघटनांचा वापर पुढीलप्रमाणे करण्यात येतो : (१) पायदळ जर हल्ल्याचा प्रारंभ करणार असेल, तर पायदळाबरोबर राहून रणगाडे व इतर दलांना पायदळाच्या इच्छेप्रमाणे साहाय्य देणे आवश्यक असते (२) फळी भेदणे, पुढे घुसणे, पिछाडीस जाऊन कारवाया करणे यांसाठी सर्व दले एकत्रित करण्यात येतात (३) पायदळ व तोफखाना यांच्या साह्याने शत्रुआघाडीस खिंडारे पाडल्यावर चिलखती गाड्या व रणगाडे त्याच्यापुढे नेऊन परिस्थितीचा फायदा घ्यावा लागतो (४) प्रथम एकत्रित दलांकरवी शत्रुफळी फोडणे व नंतर त्या भगदाडातून (भारी रणगाडा सेनेने) पुढे घुसून भगदाड मोठे करणे आणि जादा सेनेला हालचालीसाठी मोठे क्षेत्र उपलब्ध करून देणे, तसेच पिछाडीवर दूरवर जाऊन शत्रूची कोंडी करणे आवश्यक ठरते. यासाठी १९४२ साली रशियाने स्वतंत्र रणगाडासेना उभ्या केल्या होत्या. अलीकडे रणसामग्रीत प्रक्षेपणास्त्रे व अण्वास्त्रे यांचा अंतर्भाव झाल्यामुळे, १९४५ पूर्वीच्या सेनासंघटना व रणतंत्र यांच्यात बरेच बदल झाले आहेत.

तडित् युद्धतंत्राचे रणक्षेत्र विमानांचे प्रकार : (१) लढाऊ विमाने, (२) टेहळणी विमाने, (३) बाँबफेकी विमाने, (४) झेप विमाने. (अ) हल्लाक्षेत्र, (आ) बाँबहल्ल्याचे क्षेत्र, (इ) विमानसहायक क्षेत्र, (ई) दूरगामी विमान गस्त, (उ) बगल संरक्षण, (ऊ) दूरगामी टेहळणी, (ए) निकट विमान साहाय्य, (ऐ) आक्रमक रणगाडा-दले व साहाय्यक विमाने.

आक्रमणपद्धती व प्रकार : या तंत्राच्या रणक्षेत्रीय व युद्धश्रेत्रीय अशा दोन संलग्न आणि परस्परसंबंधित पायऱ्या आहेत. धडाका नेमका कोठे, कसा व केव्हा होईल हे शत्रूला उमजू नये म्हणून चलन, हालचाल यांस महत्त्व असते. सर्व कारवाया विलक्षण वेगाने व अखंडित झाल्या पाहिजेत. यासाठी अनपेक्षित समस्येवर मात करू शकणारे चलाख व चटकन निर्णय घेण्याची क्षमता असलेले अधिकारी आवश्यक असतात. गतिमानता व केंद्रीकरण यांमुळे सेनासंख्येची कमतरता भरून निघते. आघात दलांची शक्ती इच्छित स्थानी लावणे व तिचे विभाजन घडू न देणे, अशी रणकुशलता आवश्यक असते. वेगाने धडाका बसल्यामुळे आघाडीत पडलेल्या खिंडारांना भरून काढण्यासाठी शत्रूला राखीव बळ वापरणे जमत नाही. प्रारंभी लढाऊ व झेप घेणाऱ्या विमानांकडून आणि लांब पल्ल्याच्या तोफांकडून शत्रुफळीवर बाँब व गोळामार केला जातो. कारवाई चालू असतानाच शत्रूला भिडणाऱ्या सेना कूच करीत असतात. विमाने संरक्षण देतात. टेहळणी दलाकडून कमजोर स्थाने माहीत झाल्यामुळे त्यांवर रणगाडे व स्वयंचलित तोफा तुटून पडतात. शत्रुफळीत खिंडारे पडली, की त्यांतून सेना पुढे घुसते. शत्रुची पिछाडीवरील महत्त्वाच्या स्थानांची विल्हेवाट लावली जाते. शत्रूला ‘उलट बगल’ लढाई–म्हणजे तोंड फिरवून सामना–देणे जमत नाही. त्याची कोंडी होऊन तो निर्बल बनतो. चिलखती रणगाडे पुढे पुढे जाऊन शत्रूच्या पिछाडीवर फार खोलवर पकड बसवितात. पाठोपाठ वाहनगामी पायदळ सैन्य येते. ते उरलेसुरले शत्रुसैनिक, मोर्चे व विरोधक यांचा नायनाट करते. तसेच पुढे गेलेल्या चिलखती सैन्याची पिछाडी निर्धास्त व निर्विघ्न करून रसदपुरवठा व दळणवळण चालू ठेवते. या सर्व कारवायांत आक्रमक सैन्याच्या बगला असुरक्षित वाटल्या, तरी त्या सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनगामी तोफखाना व विमाने उपलब्ध होतात. शत्रूही गोंधळला असल्यामुळे तो संरक्षणात गुंतलेला असतो. त्यामुळे तो आक्रमक कारवाया करण्यास असमर्थ ठरतो. शत्रूच्या पिछाडीवर छत्रीधारी सैन्य उड्या टाकून आगेकूच करणाऱ्या सैन्याचे मार्ग, संगम केंद्रे, पूल इ. ताब्यात घेते. दुसऱ्या महायुद्धात एक किमी. खिंडार पाडण्यासाठी जर्मनांनी १०० रणगाडे वापरल्याचे, तर रशियाने २३०–३०० तोफा व ७० रणगाडे यांचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात. यावरून धडाकाबळाचा अंदाज लागतो. दूरगामी प्रकाराप्रमाणे शत्रूच्या पिछाडीस ३०० किमी. आत जाऊन शत्रूची मोठ्या प्रमाणावर पकड केली जाते. यालाच दूरगामी पकड वा चिमटा कारवाई म्हणतात. अशा प्रकारच्या कारवायांत जनरल गुडेरिआन वगैरेंनी, जुलै ते ऑक्टोबर १९४१ या कालात स्मोलेन्स्क, व्ह्याझमा, ऊमन्य वगैरे युद्धक्षेत्रात लाखो रशियन सैनिकांना युद्धबंदी केले. रशियाच्या चुईकॉव्हा, झूकॉव्ह या सेनापतींनी जर्मन–६० व्या आर्मीची कोंडी केली व अडीच लक्ष जर्मन युद्धकैदी केले.


यूगोस्लाव्हियासारख्या डोंगरी प्रदेशात जर्मनांनी तडित् युद्धतंत्राचा अवलंब करून आक्रमण केले होते. त्यांत छोटे रणगाडे व छत्रीधारी सैन्य इत्यादींनी उत्तम कामगिरी केली.

संरक्षण पद्धती : तडित् युद्धतंत्रीय आक्रमणापासून संरक्षण करणे कसे शक्य आहे, हे दुसऱ्या महायुद्धातील व अरब–इझ्राइल युद्धामधील (ऑक्टोबर १९७३) संरक्षण पद्धतीवरून दिसून येते. स्थायी तटबंदी उदा., फ्रान्सची मॅजिनो, पोलंडची वेस्टरप्लाट, बेल्जियमचे इबन एमिल किल्ले, वगैरेंचा भेद करण्यात अगर त्यांस वळसा घालून त्या निरुपयोगी करण्यात जर्मन चिलखती आणि छत्रीधारी सैन्य सहज यशस्वी झाले. आक्रमणाचा लोंढा थांबविणे व त्याचे विभंजन करणे यांसाठी एकापाठोपाठ एक अशा संरक्षणफळ्या उभ्या केल्या गेल्या. मोक्याच्या जागी, विमान वा रणगाडा विरोधक मोर्चे, सुरुंगक्षेत्रे, काटेरी कुंपणे यांची स्थाने प्रस्थापित करावी लागली. नद्यांचा व कालव्यांचा उपयोगही मोठ्या प्रमाणावर केला गेला. रशियाने तोफखाना, रणभेदी तोफखाना, सुरुंग यांचे प्रचंड मोर्चे जवळजवळ प्रस्थापित केले. मोर्च्याच्या मधील पोकळीत रणगाडे वगैरे सापडले, की त्यांचा नायनाट करण्यात येई व ताबडतोब राखीव फौजांकडून जर्मन सेनेवर प्रतिहल्ले केले जात. सुरुवातीस जरी फळीस खिंडार पडले, तरीसुद्धा लढा देणे चालू ठेवले, तर रणगाडे व साहाय्यक पायदळ आणि तोफखाना यांचा संबंध तोडून त्यांना वेगळे पाडता येते. वेगळे झाल्यावर रणगाडे असहाय बनतात व त्यांचा नायनाट करणे शक्य होते. पुढे गेलेल्या चिलखती सेनेचा रसद व दारूगोळा पुरवठा गनिमी सेनेकडून बंद पाडण्यास रशियाला बरेच यश आले. राखीव फौजा व सामग्री यांचा पुरवठा जर योग्य वेळी करता आला, तर संरक्षणक्षमता वाढते. याबाबतीत रशियाने उत्तम धडा घालून दिला. संरक्षणाच्या फळ्या निर्बल करण्यात जर्मनांची अत्यंत हानी झाली. यादृष्टीने मॉस्को, स्टालिनग्राड व लेनिनग्राड येथील लढाया अभ्यसनीय आहेत.

दुसऱ्या महायुद्धातील तडित् युद्धाचे समीक्षण वनिष्कर्ष: या युद्धाच्या प्रारंभीच्या दोन वर्षातील युद्ध जर्मनीने तडित् युद्धतंत्राप्रमाणे लढून सैनिकी विजय मिळविले. बाकीच्या तीन वर्षांत जर्मनी, रशिया व इतर दोस्तराष्ट्रे यांच्या सेनांनी निव्वळ तडित् युद्धतंत्र न वापरता पहिल्या महायुद्धाप्रमाणे युद्धक्षेत्रीय मोर्चे कूच करण्यापूर्वी तोफांचा भडिमार करून संरक्षणरचना उभारली आणि आक्रमणासाठी रणगाडे वापरले. सेनापतींना तडित् युद्धाची तत्त्वे प्रारंभी न समजल्यामुळे दोस्तांना व रशियाला संरक्षणात अपयश येऊन भयंकर हानी सोसावी लागली परंतु पुढे सराव झाल्यामुळे त्यांनी जर्मनीला संरक्षणभूमिका घेण्यास भाग पाडून तिचा पराभव केला. दोस्तांना व रशियाला रणसामग्री तसेच रणांगणावर सैन्याचा पुरवठा सतत आणि अव्याहतपणे करता आल्यामुळे जर्मनीला अनेक आघाड्यांवर लढा देणे व संरक्षण करणे अशक्य झाले. तडित् युद्धतंत्र यशस्वी होण्यासाठी आकाशात लढाऊ वर्चस्व तसेच रणगाडे वगैरेंच्या हालचालींसाठी अनुकूल भौगोलिक रणक्षेत्रीय दळणवळणाचे रस्ते वगैरे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे संरक्षण किंवा आक्रमण यासाठी राखीव फौजा जय्यत ठेवणे अगत्याचे असून कारवाया यशस्वी होण्यासाठी धाडसी, प्रसंगावधानी व आलेल्या संधीचा लाभ घेणारे आणि शीघ्र निर्णय घेऊ शकणारे अधिकारी व सेनापती लागतात. जर्मनीचे रोमेल, गूडेरिआन, मान्‌स्टाईन वगैरे व रशियाचे झूकॉव्ह, ब्रिटनचे ऑकिन्‌लेक, ओ कॉनर, कनिंगहॅम व अमेरिकेचे पॅटन या सेनापतींचे नेतृत्व या दृष्टीने लक्षणीय आहे.

संदर्भ : Montgomery,  B. L. 4 Concise History of Warfare, London, 1972.

दीक्षित, हे. वि.