ग्रँट, युलिसीझ सिम्पसन :  (२७ एप्रिल १८२२—२३ जुलै १८८५). अमेरिकेचा अठरावा अध्यक्ष व कुशल सेनापती. ओहायओ संस्थानात पॉइंट प्लेझंट गावी जन्म. अमेरिकेच्या सैनिकी अकादेमीमध्ये शिक्षण. लष्करी अधिकारी म्हणून नोकरीचा आरंभ (१८४३), तथापि महाविद्यालयात गणिताचा अध्यापक होण्याची आकांक्षा. १८४६—४८ मध्ये मेक्सिकोविरुद्ध झालेल्या युद्धात प्रशंसनीय कामगिरी, शायलो येथील लढाईत (६-७ एप्रिल १८६२) भयंकर प्राणहानी होऊन संघराज्याच्या सैन्याला विजय मिळाला. त्यामुळे ग्रँटवर बरीच टीका झाली परंतु लिंकनने त्याला पाठिंबा दिला. व्हिक्स्‌बर्गजवळ ४ जुलै १८६३ या दिवशी त्याने राज्यसंघीय सैन्याचा जबरदस्त पराभव केला. नोव्हेंबर १८६३ मध्ये संघराज्याच्या सैन्याचा प्रमुख सेनापती झाला. १८६५ मध्ये त्याच्या नेतृत्वामुळे राज्यसंघीय सैन्याचा पुरा बीमोड झाला. १८६९ मध्ये त्याची अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली पण १८७७ मध्ये त्याने राष्ट्राध्यक्षपद सोडले. कारण तो सामान्य जनतेचा आवडता असला, तरी राजकारणी लोकांना अप्रिय होता. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष या दृष्टीने तो अपयशी ठरला. त्याचे उत्तरआयुष्य आर्थिक हलाखीत गेले. अखेर कर्करोगाने मौंट मॅक्‌ग्रेगोर येथे त्याचा मृत्यू झाला.

दीक्षित, हे. वि.