ढोमा : या माशाचा समावेश स्किईनिडी मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव स्किईना ग्लॉकस (जॉनीयस डुसुमेरी) असून स्किईनिडी कुलातील ओटोलिथस आर्जेंटियस व ओ. रुबर या जातीही ढोमा या नावानेच ओळखल्या जातात. हे मासे मुख्यतः उथळ पाण्यात आढळतात व ते कर्कश आवाज काढू शकतात. ढोमा मासा विशेषकरून मुंबई किनाऱ्यावर अगदी सर्रास आढळतो. तेथे आढळणारे ढोमा मासे मोठे असतात व विक्रीला येणाऱ्या माशाचे सरासरी वजन ६८० ग्रॅ. असते. त्याचे शरीर करडे, पाठीवर हिरवट व खालून रुपेरी रंगाचे असते. त्याच्या उभ्या परांच्या कडा करड्या असतात. त्याचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे तो फार लोकप्रिय आहे परंतु त्याचे पोषणमूल्य काहीसे कमी असते. १९७५-७६ मध्ये महाराष्ट्रात २३,४१० टन ढोमा पकडण्यात आला, त्यापैकी मुंबई किनाऱ्यावर १७,८३६ टन पकडला गेला.
जमदाडे, ज. वि.
“