ड्युरँड रेषा : अफगाणिस्तान व पाकिस्तान या राष्ट्रांची सरहद्द ज्या रेषेवर अधिष्ठित आहे, ती ड्युरँड रेषा होय. आंतरराष्ट्रीय विधीप्रमाणे ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा समजली जाते. अफगाणिस्तानचा बादशाह अब्दुर रहमान व हिंदुस्थान सरकारचे प्रतिनिधी सर मॉर्टिमर ड्युरँड यांच्या दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे ड्युरँड रेषा उभय सरकारांनी १३ नोव्हेंबर १८९३ रोजी संमत केली.
रशिया १८८० पासून मध्य आशियाच्या बाजूने हिंदुस्थानपर्यंत सत्ताविस्तार करीत आहे, असा संशय त्या वेळच्या हिंदुस्थान सरकारला वाटत होता त्यादृष्टीने रशियाला शह देण्याचा कार्यक्रम ब्रिटिश सरकारने हाती घेतला, सध्याच्या पाकिस्तानच्या पश्चिमेस व ड्युरँड रेषेच्या पूर्वेस पठाणी टोळ्यांचा प्रदेश आहे. या प्रदेशातील कुर्रम भाग ब्रिटिशांनी व्यापला व त्यात काही बोगदे बांधले. ब्रिटिशांच्या हालचाली पाहून परस्परातील राजकीय संबंध निश्चित करण्यासाठी आणि सरहद्दीचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचना अब्दुर रहमानने ब्रिटिश सरकारला केली. त्याप्रमाणे काबूल येथे २ ऑक्टोबर १८९३ रोजी अब्दुर रहमान व मॉर्टिमर ड्युरँड यांच्यामध्ये विचारविनिमय झाला. १३ नोव्हेंबर १८९३ च्या ठरावाप्रमाणे चित्रळ ते पेशावर आणि पेशावर ते इराण, अफगाणिस्तान व बलुचिस्तान यांच्या सरहद्दी ज्या ठिकाणी मिळतात तेथपर्यंत म्हणजे कोह-इ-मालीक सीआपर्यंत एक सीमारेषा ठरविण्यात आली. या रेषेला ड्युरँड रेषा म्हणण्याचा प्रघात पडला. या रेषेच्या पूर्व दिशेला असलेला चित्रळ, बाजौर, स्वात, बुनेर, दीर, चिलास, कुर्रम व नैर्ऋत्येकडील मुलूख यांवरील सर्व हक्क अब्दुर रहमान यांनी सोडून दिले. १८९५ या वर्षी १,६०० किमी. लांबीच्या सीमारेषेवर सरहद्दनिदर्शक खांब रोवण्यात आले. १९४७ पर्यंत म्हणजे हिंदुस्थानच्या फाळणीपर्यंत वरीलप्रमाणे परिस्थिती होती. १५ ऑगस्ट १९४७ नंतर वरील सर्व मुलूख पाकिस्तानकडे आला, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे.
ड्युरँड या रेषेमुळे फायदे कमी आणि तोटे जास्त, अशी टीका सुरू झाली. वांशिक, भौगोलिक व संरक्षणाचे मुद्दे लक्षात न घेता तर्कदुष्ट रीतीने ही रेषा आखली गेली, असे आक्षेप घेण्यात आले. या रेषेमुळे अफगाणिस्तानची व त्याबरोबर कित्येक पठाणी टोळ्यांचीदेखील विभागणी झाली आहे. आखणीचे काम ढिलाईने झाल्यामुळे व सरहद्दीचे खांब एकमेकांपासून फार दूरवर असल्यामुळे आपण अफगाणिस्तानच्या हद्दीत आहोत की टोळीवाल्यांच्या मुलखात आहोत, असा संभ्रम त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ड्युरँड रेषा अमान्य करून टोळीवाल्यांच्या प्रदेशावर आपले अधिराज्य आहे, असे अफगाण सरकारने जाहीर केले. हिंदुस्थानच्या फाळणीच्या कराराप्रमाणे टोळीवाल्यांच्या प्रदेशावर पाकिस्तानची अधिसत्ता असून ड्युरँड रेषा हीच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील आंतरराष्ट्रीय सरहद्द आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. ब्रिटिश सरकारनेही १९५० साली पाकिस्तानच्या म्हणण्यास पाठिंबा दिला. पठाण टोळीवाल्यांनी स्वतंत्र पख्तुनिस्तानची मागणी केली आहे. त्यामुळे ड्युरँड रेषा व पख्तुनिस्तान हा वादाचा विषय झाला आहे.
दीक्षित, हे. वि.