ड्रायोपिथेकस : जीवाश्मी (शिळारूप अवशेषांच्या रूपातील) कपींचा हा एक वंश आहे. ड्रायोपिथेकस पूर्व अथवा मध्य मायोसीन काळापासून प्लायोसीन काळापर्यंत म्हणजे ५० लक्ष ते दोन कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळापर्यंत यूरोप व आफ्रिका या खंडात आणि भारतात अस्तित्वात होते. प्राचीन कपींची रचना कशी होती हे ड्रायोपिथेकसावरून ध्यानात येते. चिंपँझी, गोरिला व ओरँगउटान यांचे ते पूर्वज होते.
ड्रायोपिथेकस वंशाच्या सात जाती आहेत यातच प्रोकॉन्सूल, शिवपिथेकस व केनियापिथेकस या जीवाश्म–जातींचा समावेश होतो. यांतील काही जाती ठेंगू चिंपँझीपेक्षा काहीशा लहान होत्या, तर इतर काही गोरिलांएवढ्या होत्या. ड्रायोपिथेकसाची एकच कवटी सापडलेली आहे. ती विशेष मजबूत नसून तिच्यातील मस्तिष्ककोश (ज्यात मेंदू असतो असा कवटीचा भाग) कमी–अधिक वाटोळा आहे. कपाळ आणि जबडे फारसे पुढे आलेले नाहीत. भ्रूकटक (भुवईचा उंचवटा) नव्हते. यांचे दात हल्लीच्या जिवंत कपींपेक्षा काही बाबतींत निराळे होते. यांना हातांनी लोंबकळता येत नव्हते किंवा चालता येत नव्हते. मेंदूच्या घडणीवरून ड्रायोपिथेकस कपीसारखा नसून माकडासारखा असावा असे दिसते.
पहा : मानवसदृश कपि.
कर्वे. ज. नी.
“