न्येप्स, झोझेफ निसेफॉर : (७ मार्च १७६५–५ जुलै १८३३). फ्रेंच भौतिकीविज्ञ. ‘हीलिओग्राफी’ या ⇨छायाचित्रणातील तंत्राचे संशोधक. त्यांचा जन्म फ्रान्समधील शालों-स्यूर-सोन येथे झाला. १७८९ मध्ये ते अँजर्झ येथील ओरॅटोरियन कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. यानंतर फ्रेंच सैन्यातील अधिकारी म्हणून ते इटलीत गेले होते. १७९४ मध्ये ते फ्रान्समधील नीस येथे स्थायिक झाले व १७९५ मध्ये ते नीस विभागाचे प्रशासक झाले पण त्या पदाचा त्यांनी काही महिन्यांतच राजीनामा दिला. यानंतर त्यांनी क्लॉड या आपल्या थोरल्या बंधूंच्या मदतीने संशोधनास सुरुवात केली.
लायकोपोडियम चूर्ण या इंधनावर चालणारे ‘पायरिओलोफॉर’ हे अंतर्ज्वलन (ज्यातील सिलिंडरातच इंधन जाळून कार्यकारी द्रव्याला उष्णता दिली जाते असे) एंजिन दोघा भावांनी तयार केले व त्याचे एकस्व (पेटंट) मिळविले (१८०७) पण हे एंजिन प्रत्यक्ष वापरात आले नाही. नंतर त्यांनी पाणदट्ट्यासारखे एक उपकरण तयार केले आणि कृषिविषयक संशोधनही केले. १८१३ मध्ये निसेफॉर यांनी शिलामुद्रणाविषयीचे संशोधन सुरू केले. तसेच त्यांनी कॅमेऱ्याचे पटल, प्रकाशबंद पेटी व झडप यांसंबंधी संशोधन केले. सिल्व्हर क्लोराइडात बुडविलेल्या कागदावर नायट्रिक अम्लाच्यासाहाय्याने प्रतिमा स्थिर करण्याची पद्धत त्यांनी १८१६ मध्ये शोधून काढली. शिलामुद्रणात वापरण्यात येणाऱ्या प्रकाशसंवेदी अस्फाल्टाचा उपयोग करून प्रतिमा उमटविण्याची बिट्युमेन प्रक्रिया १८१७ मध्ये त्यांनी शोधून काढली. या पद्धतीने त्यांनी १८२१ मध्ये काचेवर आणि धातूवर (विशेषतः कथिलावर) प्रतिमा उमटविण्यात यश मिळविले. १८२२ मध्ये त्यांनी प्रथमच स्थिर सम (मूळ दृश्यासारखी) प्रतिमा तयार केली. ‘हीलिओग्राफी’ विषयी एकत्रितपणे अधिक संशोधन करण्याचा करार १८२९ साली न्येप्स व एल्. जे. दागेअर यांच्यामध्ये झाला. न्येप्स यांच्या मृत्यूनंतरही दागेअर यांनी हे संशोधन पुढे चालू ठेवले व शोधाचे योग्य श्रेयही न्येप्स यांना दिले. न्येप्स यांनी छायाचित्रणासंबंधी बरेच लेख लिहिले. ते सें-लू-द-व्होरम येथे मृत्यू पावले.
सूर्यवंशी, वि. ल.
“