बालगंधर्व : (२६ जून १८८८-१५ जुलै १९६७). मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक नट. पूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस. १९०६ ते १९५५ या पन्नास वर्षांच्या कालखंडात स्त्रीभूमिका आणि नंतर पुरुष भूमिकाही करून बालगंधर्वांनी रसिकांना संतुष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. जन्म पुणे येथे. वडिलांचे पूर्ण नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस व आईचे नाव अन्नपूर्णाबाई असून पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्याशी बालगंधर्वाचा विवाह १९०७ साली झाला होता. त्यांना पाच अपत्ये झाली. पुढे लक्ष्मीबाईच्या निधनानंतर (१९४०) बालगंधर्वानी प्रसिद्ध गायिका गोहरबाईशी नोंदणीपद्धतीने १९५२ (?) च्या सुमारास विवाह केला. गोहरबाईशी त्यांचा परिचय १९३७ मध्येच झाला होता. नारायणरावांचे शिक्षण इंग्रजी दुसऱ्या इयत्तेपर्यंतच झाले. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा व गंधर्वतुल्य आवाज, या देणग्या  त्यांना जन्मतःच लाभल्या होत्या. १८९८ साली लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले त्यावेळी, ‘हा तर बालगंधर्व आहे’ असे सहजस्फूर्त उद्‌गार त्यांनी काढले, असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव  ‘बालगंधर्व’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या अंगातील उपजत गुणांचे चीज व्हायचे असेल, तर त्यांनी नटाचा व्यवसाय करावा असे त्यांच्या काही निकटवर्तियांना वाटत होते. किर्लोस्कर नाटक मंडळी ही त्या काळातली अग्रेसरसंगीत नाट्यसंस्था होती. तिचे संस्थापक ⇨ अण्णासाहेब किर्लोस्कर आणि तिला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन बसविणारे गायक नट ⇨ भाऊसाहेब कोल्हटकर यांनी निर्माण केलेली थोर परंपरा महाराष्ट्राच्या परिचयाची होती. लोकमान्य टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा आशीर्वाद घेऊन, १९०५ सालच्या गुरुद्वादशीला बालगंधर्वानी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. १९०६ सालच्या सुरुवातीला बालगंधर्वांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकातील शकुंतलेची भूमिका केली. ती पाहून ‘भाऊराव कोल्हटकर यांच्याबरोबर अस्तंगत झालेले किर्लोस्कर नाटक मंडळीचे सौभाग्य आज तिला परत लाभले’, असे तत्कालीन नाट्यरसिकांना वाटले. त्यावेळी नारायण दत्तात्रेय तथा नानासाहेब जोगळेकर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे अध्वयू होते.

बालगंधर्वांचे सुंदर आणि सात्त्विक दर्शन, त्यांच्या अभिनयातील सहजता आणि गायनातली मधुरता यांमुळे किर्लोस्कर नाटक मंडळीच्या रंगमंदिरात भाऊराव कोल्हटकरांच्या काळासारखी गर्दी जमू लागली. १९११ साली ⇨कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या मानापमान नाटकात बालगंधर्वांनी भामिनीची भूमिका केली. तेव्हापासून एक प्रतिभावंत नट म्हणून त्यांची ख्याती पसरू लागली. मानापमानाचे संगीतदिग्दर्शन गोविंदराव टेंबे [⟶ गोविंद सदाशिव टेंबे] यांनी केले होते. बालगंधर्वाच्या कंठातून त्यांची अवर्णनीय   माधुरी रसिकांनी आकंठ प्राशन केली. आजही हे नाटक ‘गंधर्वगायना’ साठी प्रसिद्ध आहे.


किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणेश गोविंद बोडस [⟶ गणपतराव बोडस] आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ५ जुलै १९१३ रोजी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. टेंबे आणि बोडस हे पुढे भागीदारीतूम निवृत्त झाल्यामुळे १९१९ अखेर बालगंधर्व हे गंधर्व नाटक मंडळीचे एकटे मालक झाले आणि बारा वर्षे त्यांनी मराठी रंगभूमीवर आपले अधिराज्य गाजविले. बोलपटांच्या उदयामुळे १९३३ सालापासून नाटकांच्या उत्पन्नाला ओहोटी लागली. म्हणून १९३५ साली व्यवसायांतर करून, सुप्रसिद्ध ⇨ प्रभात फिल्म कंपनीच्या ⇨ व्ही. शांताराम दिग्दर्शित धर्मात्मा बोलपटात बालगंधर्वांनी संत एकनाथाची भूमिका केली पण चित्रपटसृष्टीत त्यांचे मन न रमल्यामुळे १९३६ साली ते पुन्हा रंगभूमीकडे परतले. १९३९ सालापासून मानापमान नाटकातील धैर्यधर आणि मृच्छकटिक नाटकातील चारुदत्त या पुरुषभूमिका बालगंधर्वांनी केल्या, तरी त्यांच्या स्त्रीभूमिका पाहण्यासाठीच गर्दी जमत असे. ४ जून १९५५ रोजी त्यांनी केलेली एकच प्याला नाटकातील सिंधूची भूमिका ही त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील शेवटची भूमिका. त्यानंतर ते नाटयव्यवसायातून निवृत्त झाले. वस्तुतः बालगंधर्व हे संगीत नट होते परंतु त्यांनी शास्त्रीय संगीतातही प्रगती केली होती. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या बैठका होत. शिवाय ते भजनी संगीतही उत्तमप्रकारे गात. त्यांची भजने फार लोकप्रिय होती. ही भजने आणि बैठका यांतून त्यांचे गाणे लोकांना ऐकावला मिळत असे त्यामुळे नाटकांच्या तिकिटविक्रीवर त्याचा परिणाम होई. म्हणून नाटक मंडळीच्या व्यवस्थापकांच्या त्यांच्यावर रोष असे.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल आणि सौभद्र या नाटकांतील शकुंतला आणि सुभद्रा, ⇨ गोविंद बल्लाळ देवल यांच्या मृच्छकटिक, शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांतील अनुक्रमे वसंतसेना, शारदा आणि रेवती, ⇨ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या मूकनायक नाटकातील सरोजिनी, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या मानापमान, विद्याहरण आणि स्वयंवर या नाटकांतील अनुक्रमे भामिनी, देवयानी व रुक्मिणी आणि ⇨ राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला नाटकांतील सिंधू या बालगंधर्वाच्या अत्यंत लोकप्रिय स्त्रीभूमिका होत्या. या नाटकांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक अभिमानास्पद असे पर्व घडविले. त्या कार्यातील फार मोठा वाटा बालगंधर्वांचा आहे. शाकुंतल नाटकातील ‘मना तळमळसी’, सौभद्र नाटकातील ‘किती सांगू तुला’, ‘पुष्पपराग सुगंधित’ आणि ‘पांडु नृपति’, मूकनायक नाटकातील ‘उगिच का कांता’, मानापमान नाटकातील ‘नयने लाजवीत’आणि ‘खरा तो प्रेमा’, विद्याहरण नाटकातील ‘आता राग देई मना’ आणि ‘मधुकर वन वन’, स्वयंवर नाटकातील ‘स्वकुल तारक’, ‘मम सुखाची ठेव’, ‘नरवर कृष्णासमान’व ‘करिन यदुमनी’ आणि एकच प्याला नाटकातील, ‘मानस का बधिरावे’ व ‘सत्य वदे वचनाला’, अशी बालगंधर्वांची अनेक अत्यंत लोकप्रिय पदे होती. ही पदेच लोकप्रिय झाली असे नव्हे, तर मराठी रंगभूमीवर बालगंधर्वांनी अभिनयाला अनुकूल अशी एक गायनपरंपरा निर्माण केली.

गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या श्रेष्ठ नाटककारांकडून तसेच गोविंदराव टेंबे व गणपतराव बोडस या नटश्रेष्ठांकडूनही बालगंधर्वांना अभिनयाचे शिक्षण मिळाले. बालगंधर्वांच्या ज्या प्रमुख भूमिकांचा वर उल्लेख केला, त्या एकच ठशाच्या नसून भिन्नभिन्न प्रकृतीच्या आहेत. त्यांच्या मनसक्रिया ढोबळ नसून सूक्ष्म आहेत. तद्रूपता हा बालगंधर्वांच्या अभिनयाचा गुणविशेष होता.त्यामुळे आपण प्रत्यक्ष सुभद्रा, रुक्मिणी सिंधूच पाहत आहोत, किंबहुना सुभद्रा, रुक्मिणी किंवा सिंधू या अशाच असल्या पाहिजेत, असे प्रेक्षकांना वाटत असे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयात मूर्तिमंत प्रकट झाल्यामुळे, ही पुरुषाने केलेली स्त्रीभूमिका आहे, याचा प्रेक्षकांना विसर पडत असे. सौंदर्यदृष्टी हा बालगंधर्वाचा आणखी एक गुणविशेष होता. त्यांच्या वेशभूषेचे आणि केशभूषेचे त्या काळातील महिलांनीसुद्धा अनुकरण करावे, इतकी ती आकर्षक असे.


संगीताचा उपयोग त्यांनी नाटकांतील रसाचा उत्कर्ष साधण्यासाठी केला. रसाला विघातक किंवा रसाची अपकर्ष होईल, अशी एकसुद्धा हरकत त्यांच्या गळ्यातून निघत नसे. शास्त्राची बूज राखून रसानुकूल कसे गावे, याचे शिक्षण त्यांना सुप्रसिद्ध गायक ⇨भास्करबुवा बखले यांच्याकडून मिळाले होते. हिंदुस्थानी संगीतातील खानदानी चिजांवर रचिलेली नाट्यगीते गाऊन बालगंधर्वानी समाजात उच्च संगीताची अभिरुची निर्माण केली आणि त्यावेळेपावेतो दिवाणखान्यात ताटकळत बसलेले संगीताचे स्वर माजघरापर्यंत पोहोचविले. ख्याल, ठुंमरी, गझल, दादरा आणि भक्तिगीते ते सारख्याच कौशल्याने गात असत. स्वरसप्तकांपैकी कोणताही स्वर मूर्तिमंत स्वरुपात बालगंधर्वांच्या गळ्यातून इतक्या सहजतेने प्रकट होत असे की त्याचा आनंद घेण्यासाठी ⇨ अल्लादियाखाँ साहेबांसारखे गानमहर्षीही नेहमी उत्सुक असत. स्वयंवर नाटकातील ‘स्वकुल तारक सुता’ या पदात कोमल निषादावरून षड्जाला जाताना निषादाला हेलकावे देऊन षड्जावर ते कायम होत. अशा एका वेळी तो स्वरविलास ऐकून अल्लादियाखाँ यांनी उठून दाद दिली आणि आपल्याही असा षड्ज लावता येणार नाही, असे जाहीरपणे कबूल केले.

मराठी रंगभूमीवर त्यांची असामान्य निष्ठा होती. रंगभूमीवर भूमिका करून त्यांनी विपुल संपत्ती मिळविली आणि रंगभूमीला समृद्ध करण्यासाठीच ती सर्व खर्च केली. कुठल्याही व्यवसायात आवश्यक असणारा काटेकोरपणा वा दक्षता त्यांच्यात नसल्यामुळे ह्या अत्यंत लोकप्रिय आणि श्रेष्ठ दर्जाच्या कलावंताला १९२१ साली दीडलाख रुपयांचे कर्ज झाले. ते सव्याज फेडण्यासाठी १९२७ अखेरपर्यंत सतत कष्ट करून, सावकारांना पावणेतीन लाख रुपये द्यावे लागले. ज्यावेळी त्या कर्जाची वाच्यता झाली, त्यावेळी मुंबईतील त्यांच्या हितचिंतकांनी दीड लाख रुपयांची देणगी जमविली परंतु ती स्वीकारण्याचे बालगंधर्वांनी नाकारले.

गंधर्व नाटक मंडळीचे मालक या नात्याने बालगंधर्वाची वागणूक अत्यंत दिलदारपणाची होती. शक्य तितक्या चांगल्या कलावंतांचा संग्रह त्यांनी केला होता. दिल्लीतील मध्यवर्ती संगीत नाटक अकादमीने ज्यांचा पुढे गौरव केला, ते गणपतराव बोडस (नट),⇨ अहमदजान थिरकवा (तबलावादक), कादिर बक्ष (सारंगीवादक) आणि ⇨ मास्तर कृष्णराव (संगीत दिग्दर्शक), जगन्नाथबुवा पंढरपूरकर, पं. विनायकबुवा पटवर्धन व गंगाधरपंत लोंढे यांसारख्या श्रेष्ठ कलवंतांच्या आयुष्यातील अनेक वर्षे गंधर्व नाटकमंडळीतच व्यतीत झाली. 

बालगंधर्व हे मनाचे उदार, आग्रही आणि दुराग्रहीही होते. उत्तम जेवण, उत्तम कपडे आणि भारी प्रतीची कनोजी अत्तरे त्यांना विशेष प्रिय होती. कुटुंबप्रमुख या नात्याने ते प्रेमळ असून मुलांच्या बाबतीत फार हळव्या मनाचे होते.

बालगंधर्व हे १९२९ सालच्या मराठी नाट्यसंमेलनाचे आणि १९४४ साली मुंबईत झालेल्या नाट्यशताब्दि-महोत्सवाचे अध्यक्ष होते. १९५५ साली अभिनयाचे राष्ट्रपतिपदक देऊन संगीत नाटक अकादमीने व १९६४ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हे मानचिन्ह देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.

मानसिक आणि शारीरिक दृष्टीने जीवनाच्या शेवटच्या पर्वात त्यांना फार क्लेश झाले. १९५२ साली त्यांच्या एका पायात अधूपणा निर्माण होऊन अखेर त्यांचे दोन्ही पाय पंगू झाले. एका जागेवरून त्यांना अखेरच्या काळात उचलून ठेवावे लागत असले, तरी बालगंधर्व प्रसन्न मनाने गात होते आणि त्यांचे गाणे ऐकायला गर्दी जमतच होती. ९ एप्रिल १९६७ रोजी मानसिक ग्लानीमुळे त्यांची शुद्ध हरपली. त्याच अवस्थेत असताना त्यांचे निधन झाले. पुण्यातील महानगरपालिकेने बालगंधर्व रंगमंदिर बांधून त्यांचा यथोचित गौरव केला. प्रस्तुत रंगमंदिराच्या वास्तूचा शिलान्यास बालगंधर्वांच्याच हस्ते ८ ऑक्टोबर १९६२ साली झाला होता व रंगमंदिराची वास्तुशांत बालगंधर्वाच्या जन्मदिनी म्हणजे २६ जून १९७३ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी झाली. याचप्रसंगी पुणे महानगरपालिकेने बालगंधर्वांच्या गौरवार्थ नमन नटवरा ही सचित्र पुस्तिका प्रसिद्ध केली

 संदर्भ : १. खेडेकर, पद्मा आणि खेडेकर, दुर्गाराम, पडद्यामागील बालगंधर्व, पुणे, १९६८.

             २. देसाई, व. शां बालगंधर्व : व्यक्ति आणि कला, पुणे १९५९.

             ३. देसाई, व. शां. मखमलीचा पडदा, पुणे, १९६२,

 देसाई, व. शां.