न्यू मेक्सिको : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी, अणुचाचण्यांमुळे महत्त्व आलेले नैर्ऋत्येकडील एक राज्य. क्षेत्रफळ ३,१५,११५ चौ. किमी. पैकी ६५८ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ११,५०,००० (१९७५ अंदाज), विस्तार ३१° २० उ. ते ३७° उ. व १०३° प. ते १०९°  प. यांदरम्यान. याच्या उत्तरेस कोलोरॅडो, पूर्वेस ओक्लाहोमा व टेक्सस, दक्षिणेस टेक्सस व मेक्सिको प्रजासत्ताकाची चीवावा व सनॉरा आणि पश्चिमेस ॲरिझोना ही राज्ये आहेत. याच्या वायव्य कोपऱ्यावर चार राज्यांच्या सीमा एकत्र येत असून, अशा प्रकारचे हे देशातील एकमेव राज्य आहे. सँता फे ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : उत्तुंग शिखरे, लहानमोठ्या पर्वतश्रेणी, सपाट माथ्याचे लहानमोठे सुटे डोंगर, पठारे, रुक्ष मरुभूमी, अत्यंत सपाट भूप्रदेश अशा विविध भूमिस्वरूपांनी समृद्ध असे हे राज्य आहे. याच्या उत्तर सीमेच्या मध्यापासून सामान्यतः दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे गेलेल्या खंडाच्या कण्यामुळे पश्चिमेकडे लहान व पूर्वेकडे मोठ्या नदीसंहती निर्माण झाल्या आहेत. वायव्येकडे २,५०० मी., आग्नेयीकडे १,२०० मी. व सरासरी १,५०० मी. उंचीच्या या राज्याचे सामान्य स्वरूप पठारी आहे. याच्या पूर्वेकडील एक तृतीयांश प्रदेशाचा उत्तरेकडील भाग म्हणजे, अमेरिकेच्या महासपाट भूमीचा एक भाग असून दक्षिणेकडील भाग हा ‘स्टेक्ट’ या वैराण पठाराची पश्चिम कड आहे. उत्तर मध्यभागात सँग्री द क्रिस्टो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉकी पर्वताच्या दक्षिणेकडील रांगा असून त्यांत वीलर (४,०११ मी.), ट्रूचस (३,९९३ मी.) यांसारखी उंच शिखरे आहेत. वायव्येस कोलोरॅडो पठाराचा रुक्ष परंतु खनिजसंपन्न भाग असून, सँग्री द क्रिस्टोच्या दक्षिणेस व पश्चिमेस विस्तीर्ण, उजाड, खोलगट प्रदेश, त्यात खार मैदाने, रेतीचे उंचवटे व मधूनमधून सँडीया, ऑर्गन, सान आंद्रे व सीडार इ. सुट्या डोंगररांगा व यांदरम्यान द्रोणीप्रदेश आणि नदीखोरी आहेत. राज्यात प्राचीन लाव्हा प्रवाहाचे अनेक अवशेष असून, आग्नेय भागात कार्ल्झबॅद येथे चुनखडीच्या प्रदेशातील जगप्रसिद्ध गुहांत आश्चर्यकारक आकाराचे प्रचंड ऊर्ध्वमुख व अधोमुख लवणस्तंभ तयार झालेले आहेत.

या खंडकण्याच्या पूर्वेकडील रीओ ग्रँड व पेकस (उत्तर–दक्षिण वाहणाऱ्या), कॅनेडियन (पूर्ववाहिनी) आणि सॅन वॉन व गिला या पश्चिमेकडील प्रमुख नद्या आहेत. त्यांना अनेक उपनद्या मिळतात. रीओ ग्रँड, पेकस, चामा, कॅनेडियन, सिमरोन, ब्लूवॉटर यांवर ओलितासाठी व जलविद्युत् निर्मितीसाठी धरणे बांधून प्रमुख जलाशय निर्माण केले आहेत. काही ठिकाणी भूमिगत पाण्याचा नियंत्रित उपयोग होऊ लागला आहे.

नद्यांच्या खोऱ्यांतून जलोढ मृदा, सापट प्रदेशात चराऊ कुरणांची प्रेअरी मृदा, इतरत्र डोंगराळ निकृष्ट मृदा, मरुभूमीत वाळू, जिप्सम, चुनखडी इत्यादींनी युक्त मृदा आणि काही ठिकाणी लाव्हायुक्त मृदा आहेत. मृत्संधारण ही राज्याची एक प्रमुख समस्या आहे.

खनिजे : हे राज्य खनिजसमृद्ध असून देशात याचा पोटॅश व युरेनियम यांच्या उत्पादनात पहिला आणि पर्लाइट, बेरिलियम व मँगॅनीज यांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. यांशिवाय तांबे, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, शिसे, जस्त, मॉलिब्डेनम ही खनिजे सापडतात.

हवामान : भूमिप्रकारांच्या विविधतेप्रमाणे येथे हवामानाचीही विविधता आढळते. दक्षिणेत हिवाळे सौम्य, तर उन्हाळे मरुप्रदेशीय व उष्ण आणि उत्तरेस हिवाळे कमी कडक व उन्हाळे अतिउंच पर्वतदऱ्यांखेरीज इतरत्र सुसह्य असतात. सरासरी तपमान १२° से. असते परंतु ४३° से. ते –२° से. पर्यंत चढउतार आढळतो. उंचीप्रमाणे तपमान कमी होते. रात्री ते एकदम उतरते. सरासरी पर्जन्यमान ३८ सेंमी. आहे. उंच पर्वतप्रदेशात १०० सेंमी., तर सखल भागात २० ते २५ सेंमी. असते. कधीकधी मेक्सिकोच्या आखाताकडून येणाऱ्या वादळांमुळे पेकस खोऱ्यापर्यंतच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस पडतो. साधारणपणे पूर्व भागात पाऊस जास्त, तर पश्चिम भागात कमी पडतो. प्रमुख वारे दक्षिण व पश्चिम बाजूंनी येतात. भरपूर सूर्यप्रकाशामुळे ‘सनशाइन स्टेट’ हे एक यथार्थ टोपणनाव या राज्याला मिळाले आहे.

वनस्पती व प्राणी : राज्याची सु. २५% भूमी वनाच्छादित असून उंचीप्रमाणे वनस्पतिप्रकार बदलतात. १,५०० मी. ते २,१०० मी. उंचीपर्यंत जुनिपर, पिनॉन, सेजब्रश, जळाऊ लाकूड व चराऊ कुरणे आढळतात. तेथून २,४०० मी.पर्यंत पाँडेरोझा पाइन हे इमारती लाकडाचे वृक्ष आढळतात. तेथून २,९०० मी.पर्यंत डग्लस फर, पांढरा फर, मेक्सिकन पांढरा पाइन, निळा स्प्रूस इ. वृक्षांपासून उत्कृष्ट लाकूड मिळते. त्याच्याही वरच्या प्रदेशात एंगलमन्स स्प्रूस व अल्पाइन फर या वनस्पती आहेत. सेजब्रश, मीस्किट, क्रिओसोट आणि युका या वनस्पतीही या राज्यात सर्वत्र आढळतात. येथील ग्रामा गवत गुरांचे खाद्य म्हणून फार उपयुक्त आहे. राज्यात एकूण सु. ३६ लाख हेक्टरांचे सात राष्ट्रीय वनविभाग आहेत.


म्यूल डीअर, हरिण, एल्क, गिरिसिंह, बॉबकॅट, कायॉट, नॅक रॅबिट, काळे अस्वल, ससे, खारी या वन्य प्राण्यांशिवाय स्कंक, रॅकून, करडा खोकड, बीव्हर, चिचुंद्री हे फरधारी प्राणी आहेत. बाहेरून आणवलेल्या बार्बरी मेंढ्या डोंगराळ भागात आहेत. महोका, टर्की, ग्राऊज व लावा हे स्थानिक आणि कबूतर, होला, बदक, हंस हे स्थलांतरित पक्षी ३०० जातींच्या पक्ष्यांत प्रमुख आहेत. ट्राउट व इतर माशांची संवर्धन केंद्रे आहेत. खडखड्या साप (रॅटल साप), कोळी हे धोकादायक प्राणीही आहेत. प्राणी व पक्षी यांसाठी दहा लाख हेक्टरांहून अधिक जमीन राखून ठेवली आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : मेक्सिको आखातकिनाऱ्याला तारू फुटल्यावर व त्यातून बचावल्यावर मेक्सिकोकडे पायी निघालेल्या काबेथा दे व्हाका व इतर तीन स्पॅनिशांना या भूभागाचे १५३६ मध्ये पहिले दर्शन घडले. इकडे या उत्तरेकडच्या संपन्न शहरांबद्दलच्या हकीकती ऐकून १५३९ मध्ये आलेला नंतरचा गोरा प्रवासी फ्राई मार्कोस दे नीसा हा फॅन्सिस्कन पाद्री होय. त्याने राज्याच्या वायव्येतील झून्यी इंडियनांची वस्ती दुरूनच पाहिली. त्याच्या वर्णनावरून १५४०–४२ सालात कोरोनादो याने इकडे सेबोलाची सात सुवर्णनगरे व क्विव्हिरा देश शोधण्याची मोहीम काढली पण इंडियन आदिवासींच्या खेड्यांखेरीज त्याला काही न आढळल्याने नंतर ४० वर्षे इकडे कोणी फिरकले नाही. १५९८ मध्ये ह्‌वान दे ओन्याटे हा अधिकारी ४०० वसाहतकरी व सैनिक घेऊन रीओ ग्रँड नदीखोऱ्यातून या मुलुखात आला व रीओ ग्रँड आणि चामा यांच्या संगमावर त्याने आजच्या एस्पॅन्योलानजीक एक गाव वसवले. थोड्या वर्षांनी सँता फे येथे वसलेले दुसरे गाव १६१० मध्ये राजधानी झाले, तीच राजधानी आजही आहे. स्पॅनिश पाद्री आणि सैनिक यांच्या वागणुकीविरुद्ध प्वेब्लो इंडियनांनी बंड केले व इतर जमातींशी संधान बांधून १२ वर्षे स्वातंत्र्य भोगले. १६९२ साली राज्यपाल व्हार्गासने इंडियनांचे बंड मोडले व नंतर १०० वर्षे किरकोळ उठाव वगळता स्पॅनिश सत्ता निर्वेध चालू राहिली. १८२१ मध्ये मेक्सिकोने स्पेनपासून स्वातंत्र्य मिळविले आणि व्यापारात स्पेनचा एकाधिकार संपुष्टात आल्यामुळे, इतके दिवस मज्जाव असलेल्या अमेरिकन व्यापाऱ्यांना मेक्सिकोचा मार्ग खुला झाला. मिसूरीतून मालाच्या गाड्यांचा पहिला तांडा सँता फे येथे येऊन पोहोचला व तेव्हापासून ‘सँता फे वाट’ एक महत्त्वाची व्यापारवाहिनी झाली. १८४१ साली टेक्ससकडून झालेले आक्रमण तत्काळ परतविण्यात आले पण १८४६–१८४८ च्या मेक्सिकन युद्धात पहिल्याच वर्षी सेनापती कार्नीने सँता फे काबीज केले. १८४८ च्या ग्वादालूपे ईदाल्गोच्या तहान्वये न्यू मेस्किको प्रांत अमेरिकेत समाविष्ट झाला. तो १८५० मध्ये प्रदेश म्हणून संघटित झाला, तेव्हा त्याच्या हद्दीत ॲरिझोनाखेरीज कोलोरॅडोचाही काही भाग होता. १८५३ च्या गॅड्झडेन खेरदीने मेक्सिकोकडून एक कोटी डॉलरांना घेतलेला दक्षिणेकडचा १,१७,९३६ चौ. किमी. मुलूख या प्रदेशाला मिळाला. इकडे मोठ्या प्रमाणावर मळे करण्याची शक्यता नसल्याने गुलामगिरीची पद्धत नव्हती, त्यामुळे हा प्रदेश यादवी युद्धापासून अलिप्त राहिला तरीही न्यू मेक्सिकोचे ५ ते ६ हजार लोक त्या युद्धात उत्तरेच्या बाजूने लढण्यास गेले. टेक्ससमधील सेनापती सिब्लीची बंडखोर सेना १८६२ मध्ये न्यू मेक्सिकोत घुसली पण तिला खूप प्राणहानीनिशी परतावे लागले व मग त्या बाजूने पुन्हा हल्ला झाला नाही. तथापि नॅव्हाहो, कोमँची, यूट व अपॅची या भटक्या लढाऊ इंडियन जमातींनी मात्र धाडी घालून काही वर्षे मुलूख त्रस्त केला. जेव्हा किट कार्सनने नॅव्हाहोंचा पराभव केला आणि १८८७ मध्ये अपॅची नेता जेराँइमो कैद झाला, तेव्हाच इंडियनांचे युद्ध संपले. १८७० मध्ये ‘लिंकन परगणा युद्धे’ म्हणून गुरांच्या कळपवाल्यांतील स्थानिक लढाया, तसेच गुराखी आणि मेंढपाळ यांच्यातील चकमकी काही काळ चालल्या. १८७८ साली लोहमार्गाच्या आगमनाबरोबरच भांडवलाचा, इंग्लिशभाषिक स्थलांतरितांचा आणि खाणी खणणारांचाही ओघ इकडे वळला आणि आधुनिक शहरे वसू लागली. राज्यदर्जा मिळविण्याच्या दीर्घ प्रयत्नांना १९१२ मध्ये यश आले. स्पॅनिश-अमेरिकन युद्धात तसेच पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत या राज्याचे पुष्कळ लोक अमेरिकेच्या सैन्यात दाखल झाले होते. १९१२ मधील संविधान ७३ वेळा दुरुस्त झाले आहे. प्रौढ सार्वत्रिक गुप्त मतदानाने ४२ सीनेटर चार वर्षांसाठी आणि ७० प्रतिनिधी दोन वर्षांसाठी समांकी वर्षी निवडले जातात. कारभारासाठी राज्याचे ३२ परगणे केलेले आहेत. देशाच्या संसदेवर या राज्याचे २ सीनेटर व २ प्रतिनिधी जातात. राज्यपाल आणि त्याचे प्रमुख अधिकारी चार वर्षांसाठी निवडलेले असतात. प्रत्येक परगण्याचा कारभार निवडलेल्या अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तीन आयुक्तांचे मंडळ पाहते. मोठ्या शहरांना काही नियंत्रणे सांभाळून बरीच स्वायत्तता असते. ११ न्यायविभागांसाठी २० न्यायाधीश सहा वर्षांसाठी निवडले जातात. तेच बालगुन्हेगार न्यायालयांचे काम पाहतात.

आर्थिक स्थिती  : राज्याची अर्थव्यवस्था त्याच्या नियंत्रणाबाहेरील बऱ्याच गोष्टींच्या आधीन असल्यामुळे, ती जगातील विकसनशील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेसारखीच आहे. कच्च्या मालाची निर्यात आणि संघराज्याच्या येथे होणाऱ्या खर्चाची अनिश्चितता यांमुळे बाहेरच्या मागण्यांप्रमाणे तिचे स्वरूपही बदलत राहते. न्यू मेक्सिको हे सापेक्षतः गरीबच राज्य आहे. दरडोई उत्पन्नात १९७० मध्ये देशातील सर्व राज्यांत या राज्याचा चव्वेचाळिसावा क्रमांक होता.


कृषी : राज्याचे कृषिउत्पन्न सावकाशीने वाढत आहे. स्पेनच्या आणि मेक्सिकोच्या अंमलाखाली असताना न्यू मेक्सिको (न्वेव्हो मेजिको) स्वावलंबी होते. तेथे रीओ ग्रँडच्या जलोढ मैदानात घेवडे, मका, कापूस व भोपळे पिकत असत. रुक्ष भागात मेंढ्यांचे संवर्धन चांगले होई त्यामुळे विसाव्या शतकापर्यंत हा व्यवसाय महत्त्वाचा होता. येथे अँग्लोंनी टेक्ससमधून गुरे पाळण्याचा व्यवसाय आणला आणि आता कृषिउत्पादनाच्या विक्रीचा निम्म्याहून अधिक भाग गोमांसविक्रीचा असतो. कापूस हे रोखीच्या पिकांत पहिले, तर वाळलेले गवत दुसरे पीक आहे. राज्याच्या पूर्व भागात गहू व जोंधळा ही जिरायती पिके होतात  तथापि पावसाच्या अनिश्चित स्परूपामुळे ही शेती धोकादायक ठरते. घेवडे, पावटे, भाजीपाला व फळे यांचेही काही उत्पन्न मिळत असून येथील मिरची प्रसिद्ध आहे. पिकांखालील एकूण जमिनीपैकी सु. ४,५२,००० हे. म्हणजे निम्मी जमीन ओलिताखाली असून, अशा भागातच प्रमुख पिके मिळतात. येथे पशुपालनालाही विस्तीर्ण आणि चराऊ कुरणांमुळे मोठे महत्त्व आहे. १९७५ मध्ये १७,२०,००० गुरांपैकी ३१,००० दुभत्या गाई  ५,७५,००० मेंढ्या व ६६,००० डुकरे होती. कोंबड्या व बदकेही लक्षावधी होती.

खाणकाम : राज्यदर्जा मिळण्यापूर्वीच्या काळात खाणउद्योगामुळे पुष्कळ वसाहतकरी व बाहेरचे भांडवलदार न्यू मेक्सिकोकडे आकर्षित झाले. सोने व चांदी यांच्या खाणी एकोणिसाव्या शतकात सुरू झाल्या आणि १९१५ मध्ये त्यांचे उत्पन्न सर्वाधिक झाले. त्यानंतर ते कमीकमी झाले आहे. मात्र तांब्याच्या खाणींचे महत्त्व टिकून आहे. कोळशाच्या खाणींवर इतर इंधनांच्या वाढत्या उपयोगाचा विपरीत परिणाम झाला होता परंतु १९६०–७० या दरम्यान सुधारलेल्या तंत्रज्ञानामुळे त्यांना पुन्हा महत्त्व आले. देशातील ८५% पोटॅश या राज्यात मिळते आणि १९५० मध्ये युरेनियमच्या साठ्यांचा शोध लागल्याने त्याच्या उत्पादनात हे राज्य देशात अग्रेसर राहिले आहे. लोखंड, शिसे, जस्त, मँगॅनीज व मॉलिब्डेनम यांच्याही खाणी आहेत  तथापि राज्याच्या खाणउत्पादनाचा ६५% भाग खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचा आहे. १९५० मध्ये खनिज तेल सापडले असून चॅव्हिस व एडी ही तेलक्षेत्रे महत्त्वाची आहेत. १९७४ मध्ये दरमहा सरासरी १९ हजार लोक खाणकामात होते. निर्मितिउद्योग प्रथम ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनापुरतेच मर्यादित होते  परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांत वेगाने वाढ झाली आहे. अन्नप्रक्रिया, खनिज तेलशुद्धीकरण, धातुशुद्धीकरण, बांधकामसाहित्य व लोहमार्गनिगा हे प्रमुख निर्मितिउद्योग आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्याची भरभराट होऊन त्याला एक विशेष महत्त्व आले. लष्करी ठाणी, क्षेपणास्त्रांची चाचणी मैदाने व अण्वस्त्रांचे कारखाने या भागात निघाले. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळाली.

संयुक्त संस्थानांच्या अंतराळ संशोधनात या राज्याचा मोठा संबंध येतो. राज्याचे भौगोलिक स्थान, वाळवंटी निमओसाड प्रदेश, कोरडे हवामान, निरभ्र आकाश व तुरळक लोकवस्ती या गोष्टी अणुशक्तीच्या संदर्भात प्रयोग करण्यास आणि अंतराळ संशोधनास उपयुक्त आहेत. व्हाइट सँड्स येथे क्षेपणास्त्र संशोधन केंद्र, होल्मन येथे लष्करी विमानतळ, अल्बुकर्क येथे अणुशक्तिकेंद्र व सँडीया येथे अण्वस्त्रांचे कारखाने हे प्रमुख प्रकल्प आहेत. मध्यवर्ती सरकारची सु. एक हजार लष्करी व संशोधन केंद्रे या राज्यात आहेत. त्यामुळे येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली असून सैनिकी साहित्य, इलेक्ट्रॉनिकी व अचूक यंत्रे इत्यादींचे खाजगी कारखाने निघाले. उद्योगधंद्यांच्या मर्यादित विकासामुळे कामगारसंघटनांचा जोर कधी वाढला नाही आणि त्या फक्त खाणकाम, तेलशुद्धीकरण व धातुशुद्धीकरण या उद्योगांपुरत्याच मर्यादित  राहिल्या. १९७४ मध्ये बिगर शेती कामगार सरासरी दरमहा ३,५९,००० २९,१०० निर्मितिउद्योगांत व १,०२,२०० सरकारी नोकरीत होते. १९६८ मध्ये घाऊक आणि किरकोळ व्यापाराने अर्थव्यवस्थेचा २१%  व सेवांनी १८% भाग व्यापलेला होता.

वाहतूक व संदेशवहन : राज्यात १९७३ मध्ये ३,३१८ किमी. लांबीचे लोहमार्ग व १९७४ मध्ये १,११,७८८ किमी. लांबीच्या सडका होत्या. त्यांपैकी २०,१६९ किमी. राज्याच्या अखत्यारीत होत्या. सप्टेंबर १९७५ मध्ये १३४ विमानतळ होते. १९७१ मध्ये येथे १९ दैनिके व २४ साप्ताहिके होती. ७७ रेडिओ केंद्रे, ८ व्यापारी व शैक्षणिक दूरदर्शन केंद्रे होती.

लोकवसमाजजीवन : पहिल्या स्पॅनिश वसाहती मध्य रीओ ग्रँड आणि तिच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांत होत्या.स्पॅनिशभाषिक लोक अद्यापही राज्याच्या उत्तर-मध्य भागात जास्त प्रमाणात आहेत. अमेरिकेने हा राज्यप्रदेश जिंकून घेईपर्यंत न्यू मेक्सिको हा स्वावलंबी, कृषिप्रधान, छोट्याछोट्या खेड्यांतून राहणाऱ्या लोकांचा प्रदेश होता.

यादवी युद्धानंतर विस्तृत चराऊ राने पूर्वेकडे उदयास आली.पाण्याची उपलब्धी हीच त्यांची विस्तारमर्यादा असे. १८७९ मध्ये लोहमार्गांची सोय झाल्याने प्रॉटेस्टंट अँग्लो शेतकऱ्यांचे लोंढे इकडे येऊ लागले. त्यांचे पुष्कळदा अल्बुकर्क व सँता फे येथील स्पँनिश अमेरिकन कॅथलिकांशी पटत नसे. वायव्य कोपऱ्यात कोलोरॅडोतील मॉर्मन येऊन राहिले. वारंवार पडणाऱ्या अवर्षणांमुळे बेरच शेतकरी नुकसानीत आले,मात्र दुर्जल कृषिपद्धत वापरणारे काही लोक टिकून राहिले तथापि आज ओलितावरील शेती हीच सर्वांत महत्त्वाची कृषिपद्धती आहे.


लोक मुख्यतः अँग्लो, स्पॅनिश–अमेरिकन व इंडियन, थोडेसे निग्रो व काही पौर्वात्य आहेत. मूळच्या स्पॅनिश वसाहतकऱ्यांनी इंडियनांशी विवाहसंबंध केले.त्यांच्या वंशजांस स्पॅनिश–अमेरिकन किंवा हिस्पॅनो म्हणतात. १९४०पर्यंत स्पॅनिश–अमेरिकन बहुसंख्य होतेपरंतु १९७० मध्ये ते २५% पेक्षा थोडे जास्त होते.दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजीभाषिक अँग्लो मोठ्या संख्येने या राज्यात आल्यामुळे छोट्या शेतीप्रधान खेड्यांतील स्पॅनिशभाषिक रहिवाशांनी आपली गावे सोडून देऊन शहरांकडे अथवा कॅलिफोर्नियाकडे धाव घेतली,कित्येक गावे यामुळे ओस पडली. नैर्ऋत्य भागात स्थिरावलेल्या अँग्लो खाणकऱ्यांचेही मध्यभागातील लोकांशी साम्य नव्हते. इंडियनांची संख्या १९४० मध्ये ३४,५१० होती, ती १९७० मध्ये सु. ७०,००० झाली.राज्याच्या वायव्य कोपऱ्यातील इंडियनांचा राखीव प्रदेश ॲरिझोनातही पसरलेला असून, जवळचे गॅलप हे अमेरिकन इंडियनांची राजधानी समजले जाते. यूट, हिकरीया व मेस्कालेरो अपाची यांचेही राखीव प्रदेश आहेत आणि १९६८ मध्ये २०,००० हून जास्त प्वेब्लो इंडियन १९ वेगवेगळ्या प्रदेशांत राहत होते. इंडियन आपली परंपरागत पुष्कळ वैशिष्ट्ये राखून असतात. ते मेंढ्या पाळतात व पुष्कळसे हस्तकलाउद्योग करतात. अलीकडे मात्र कमी उत्पन्न, अयोग्य घरे, अनारोग्य आणि शिक्षणाची कमी संधी यांमुळे ते बंडखोर वृत्तीचे होऊ लागले असून, मोठ्या संख्येने आपल्या राखीव प्रदेशांकडून शहरांकडे धाव घेऊ लागले आहेत.

संघराज्याचा या राज्यातील संरक्षणविषयक खर्च आणि तेल व इतर खनिजांचा शोध यांमुळे १९५०–६०या दशकात लोकसंख्या सु. ४०% वाढली मात्र संघराज्याच्या या खर्चातील कपात व खाणकामाच्या बेसुमार वाढीस आलेली मंदी यांमुळे १९६०–७०या दशकात लोकसंख्यावाढीचा हा वेग ७% पर्यंत खाली आला.राज्यात सु. चार लाख रोमन कॅथलिक व सु. तीन लाख प्रॉटेस्टंट आहेत.१९७०मध्येराज्यातजन्मलेले गोरे लोक ९,०१,७४० व परदेशात जन्मलेले गोरे २१,५१२ होते. ७०%लोकशहरांत राहणारे होते व लोकवस्तीची सरासरी घनता दर चौ. किमी.ला फक्त ३·४ होती.

शिक्षण : राज्याची भाषा इंग्रजी असून १९३० पूर्वी बहुसंख्य लोक स्पॅनिशभाषिक होते. १९४५ नंतर ते ३०% राहिले. १८९१ मध्ये सार्वजनिक शाळा सुरू झाल्या. राज्यदर्जा मिळाल्यानंतर शैक्षणिक सुधारणा मुख्यतः नागरी केंद्रांत वेगाने झाल्या. वरील लहान शहरांतील व ग्रामीण भागातील शाळा मागासलेल्या राहिल्या. या भागातहिस्पॅनो बहुसंख्य असल्यामुळे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. पूर्वभागातील हिस्पॅनो अल्पसंख्याकांबाबतचा भेदभाव १९५० पासून दूर झाला, तरी प्रत्यक्षात तो शिल्लक आहेच. १९७४ मध्ये ८८ शाळा विभागांतील सार्वजनिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत २,७८,९३६ विद्यार्थी होते. खाजगी व धार्मिक संस्थांच्या शाळांमध्ये १३,१०९ विद्यार्थी होते. १९७५–७६ मध्ये पाच विद्यापीठे, एक खाणकाम आणि तंत्रज्ञान शाळा यांत ४०,२८० विद्यार्थी होते. खाजगी महाविद्यालये, विद्यापीठांच्या शाखा इ. शैक्षणिक संस्था आहेत.

आरोग्य व समाजकल्याण : एक सुधारगृह, रुग्णालये, प्रशिक्षण शाळा, मुलांसाठी एक औद्योगिक शाळा, मुलींसाठी कल्याणगृह अपंग मुलांसाठी रुग्णालय,अंध व बधिरांसाठी शाळा,खाणकामगारांचे रुग्णालय इ. शासकीय संस्था आहेत. समाजकल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत.ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा बरीचशी समाधानकारक आहे. १९७५ मध्ये १२,५६६ लोकांस विकलांगता साहाय्य१२,६२६ लोकांस वार्धक्य साहाय्य ४१७  अंधांसाहाय्य व ६१,९५३ कुटुंबास अवलंबी मुलांसाठी साहाय्य मिळत होते.१९७५ मध्ये राज्यात ५३ रुग्णालये व ६,७१३ खाटा होत्या.

सांस्कृतिक जीवन:पहिले स्पॅनिश–अमेरिकनवनंतर आलेले आणि आता वरचढ झालेले अँग्लो यांमधील सांस्कृतिक तेढ ही न्यू मेक्सिकोची प्रमुख समस्या आहे. या दोन गटांमध्ये पुष्कळदा अविश्वास, वैमनस्य, पूर्वग्रह आणि भेदभाव असतो. १९६७ मधील एका हिस्पॅनो गटाचे पुन्हा वर्चस्व प्रस्थापिण्याचे प्रयत्न म्हणजे, त्यांच्या ऱ्हास होणाऱ्या सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक दर्जांबाबतच्या वैफल्याचे परिणाम होते.त्यासाठी जमिनीची मागणी हे प्रतीक होते. १९४९ पासून वंश, वर्ण, धर्म, मूळचे राष्ट्रीयत्व यांसाठी रोजगार नाकारणे व १९५५ पासून सार्वजनिक ठिकाणी वंशभेद, वर्णभेद पाळणे यांस कायद्याने बंदी आहे.कायद्याच्यादृष्टीने हिस्पॅनोंचा दर्जा समानत्वाचा असला, तरी व्यवहारात हिस्पॅनो हा आपल्याच भूमीत दुय्यम प्रतीचा नागरिक ठरला आहे. त्यांचे उत्पन्न अँग्लोंच्या उत्पन्नाच्या निम्म्यापेक्षा थोडेसेच अधिक असून शिक्षण पुष्कळदा कमी असते आणि व्यवसायांतही त्यांचे प्रतिनिधित्व कमीच असते. हलक्या प्रतीच्या घरांत राहणाऱ्या स्पॅनिश-अमेरिकनांचे येथील शेकडा प्रमाण अँग्लोंच्या शेकडो प्रमाणापेक्षा तर जास्त असतेच परंतु ते राज्यातील थोड्याशा काळ्या लोकांच्यापेक्षाही जास्त असते.


लेखक व वास्तुशिल्पी यांच्यावर न्यू मेक्सिकोच्या इंडियन व स्पॅनिश वारशांचा या अँग्लोंच्या प्रभावाचा ठसा उमटलेला आहे. गुराखी आणि खाणकरी यांचे आगमन व सरहद्द प्रदेशातील एकोणिसाव्या शतकातील चकमकी हे अनेक सांस्कृतिक कलाविषय झाले. चित्रकारांना येथील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदृश्यांचा मोह पडला. वेगवेगळ्या क्षेत्रांतील कलाकारांना आकर्षित करून ताउस येथे प्रथमच महत्त्वाची कलाकेंद्रे निर्माण झाली. आता अल्बुकर्क व सँता फे येथेही त्याच तोडीची केंद्रे झाली आहेत. राज्यातील उच्च शिक्षणसंस्थांची ग्रंथालये आणि त्यांची कला, संगीत, नृत्य-नाट्य यांच्या शाखा यांनी सांस्कृतिक ज्ञानाचा प्रसार केला. सँता फेच्या ऑपेरा असोसिएशनचे (१९५६) यश संगीताच्या जाणकारीचे गमक आहे.

स्थानिक इंडियन उच्च दर्जाची व मातीची सुंदर भांडी बनवितात. प्रत्येक खेड्याचे ओळखू येणारे वेगळे नक्षीकाम असते. येथील नॅव्हाहो ब्लँकेटे जगप्रसिद्ध आहेत. सध्या पुष्कळ इंडियन बटणे, मणी, टाचण्या, रिंगा, कंठ्या (माळा), कर्णफुले व पट्टे तयार करतात. ते मुख्यतः वाढत्या संख्येच्या पर्यटकांना विकतात. इंडियन नृत्ये संरक्षिली जात असून त्यांसाठी गॅलप येथे प्रतिवर्षी खूप गर्दी होते. रोमन कॅथलिक पेनिटंट गटाने स्पॅनिश लोककला राखली आहे. तसेच आधुनिक संगीत व कला यांचा प्रभाव असूनही ग्रामीण भागात मध्ययुगीन स्पॅनिश संगीत व कला यांचे जतन केले आहे. राज्यातील संग्रहालयांतून पुराणवस्तू, जुन्या लोककला इत्यादींचे संग्रह केले जातात. ताउस येथील किट कार्सन होम आणि वस्तुसंग्रहालय तसेच सँता फे येथील नव्हाहोंच्या संस्कारकलांचे संग्रहालय प्रसिद्ध आहे.

पर्यटन : वैशिष्ट्यपूर्ण इंडियन आणि हिस्पॅनो संस्कृतींमुळे असंख्य पर्यटकांचा ओध या राज्याकडे सारखा वाहतच राहिला आहे. राज्य व राष्ट्रीय उद्याने, ताउस येथील औषधी झरे, कार्ल्झबॅद येथील गुहा, स्मारके, ऐतिहासिक स्थळे, शिकार, मासेमारी, बर्फावरील घसरण्याचे खेळ आणि इंडियनांचे उत्सव–समारंभ ही पर्यटकांची महत्त्वाची आकर्षणे आहेत.

ओक, शा. नि. भागवत, अ. वि.