नैषधीयचरित : अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एका महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे कालानुक्रमे अखेरचे आणि विस्ताराने त्या सर्वांत मोठे. नैषधचरित, नैषधकाव्यनैषध अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते. ⇨ श्रीहर्ष नावाच्या कवीने ते रचिले. प्रत्यक्ष ह्या महाकाव्यात आढळणाऱ्या उल्लेखांवरून, तसेच जैन ग्रंथकार राजशेखर सूरी (चौदावे शतक) ह्याच्या प्रबंधकोशनामक ग्रंथात आलेल्या श्रीहर्षविषयक माहितीवरून असे दिसते, की श्रीहर्षाच्या पित्याचे नाव श्रीहीर आणि आईचे नाव मामल्लदेवी असे होते कनौजच्या विजयचंद्र आणि जयचंद्र (जयचंद राठोड) ह्या राजांच्या आश्रयास श्रीहर्ष हा होता सन्मानचिन्ह म्हणून राजसभेत त्याला दोन तांबूलांचा आणि आसनाचा मान होता. उपर्युक्त दोन राजांच्या कारकीर्दीचा काळ लक्षात घेऊन श्रीहर्षाचा काळ बाराव्या शतकाचा उत्तरार्ध असा सामान्यतः मानला जातो.

ह्या महाकाव्याची कथा महाभारतातील नलोपाख्यानावर आधारलेली आहे. हे नलोपाख्यान लहानसेच (२०० हून कमी श्लोकांचे) असेल, तरी नैषधीयचरितासारखे २२ सर्गांचे आणि २,८०० हून अधिक श्लोकांचे महाकाव्य श्रीहर्षाने त्यातून उभे केले आहे. ह्या संदर्भात आणखी एक लक्षणीय बाब अशी, की महाभारतांतर्गत नलोपाख्यानातील सर्व कथानक ह्या महाकाव्यात आलेले नाहीच. नलदमयंतीचे स्वयंवर आणि कलीचे नलाच्या राजधानीत आगमन येथपर्यंतचाच कथाभाग ह्या महाकाव्यात आलेला आहे. त्यावरून हे महाकाव्य अपूर्ण राहिले असावे, असे एक मत आहे. नैषधीयचरित ह्या शीर्षकावरून श्रीहर्षाला समग्र नलकथा ह्या महाकाव्यात आणावयाची होती, असे दिसते. नलकथेच्या उत्तरभागाची पार्श्वभूमीही उपलब्ध महाकाव्यात श्रीहर्षाने निर्माण करून ठेवलेली दिसते. नैषधीयचरिताच्या सतराव्या सर्गात नलदमयंतीची ताटातूट घडवून आणण्याची प्रतिज्ञा कली करतो, त्याअर्थी ह्या प्रतिज्ञेची पूर्तता कली कशी करतो हे उत्तरभागात दाखविण्याचा श्रीहर्षाचा संकल्प असणार, असे वाटते. तथापि ह्या महाकाव्याचा उत्तरभाग आजतागायत उपलब्ध झालेला नाही. नैषधीयचरिताचा एक प्राचीन टीकाकार चांडुपंडित ह्याने १२९७ मध्ये रचिलेली टीकाही फक्त २२ सर्गांपर्यंतची आहे. ह्या आणि अशाच अन्य प्रमाणांवरून हे महाकाव्य २२ सर्गांन्तीच पूर्ण झाले असे मानणारा पक्षही आहेच.

नलोपाख्यानातील कथेचा आराखडा श्रीहर्षाने कायम ठेविलेला आहे परंतु काही नव्या प्रसंगांची त्याने केलेली निर्मिती, विस्तृत वर्णने आदींनी हे महाकाव्य विस्तारत गेले आहे. नलाचा मृगयाविहार, हंसाचे ग्रहण, मुक्ती आणि संदेशवहन, दमयंतीचा पूर्वानुराग, विवाहपूर्व विरहव्याकुल दशा, स्वयंवर, कलीबरोबर देवांचे तात्त्विक वाग्‌युद्ध इ. अनेक प्रसंग विस्तारपूर्वक रंगविलेले आहेत. शंभरांहून अधिक श्लोकांचा एक संपूर्ण सर्ग (सातवा) दमयंतीच्या आपादमस्तक सौंदर्यवर्णनाला वाहिलेला आहे, तसेच दमयंतीच्या स्वयंवरवर्णनासाठी सु. ५०० श्लोक कवीने योजिलेले आहेत. २२१ श्लोकांच्या सतराव्या सर्गातील सु. २१० श्लोक अद्वैतवेदान्ताची थोरवी गाण्यासाठी रचिलेले आहेत, ह्यावरून काव्यविस्ताराची आणि त्यात आणलेल्या अवांतर विषयांची कल्पना येऊ शकेल.

भाषेचे व वृत्तांचे प्रभुत्व, काव्यरचनेच्या आणि अलंकरणाच्या अंगांची दिमाखदार योजना, श्लेष-यमकांच्या चमत्कृती असे काव्यरचनेच्या तंत्राशी निगडीत असलेले गुण श्रीहर्षाच्या ठायी आहेत. कल्पनाशक्तीही त्याच्यापाशी आहे. तथापि हे सर्व पांडित्याने प्रकट करण्याचा त्याचा सोस अनावर आहे. काही वेळा औचित्यभंगाचा दोषही त्याच्याकडून घडलेला आहे. सातव्या सर्गात दमयंतीच्या देहाचे आणि अंगप्रत्यंगांचे वर्णन नल स्वतःच करतो, हे उदाहरण ह्या संदर्भात देण्यासारखे आहे. श्लेषाचा तर श्रीहर्षाने अतिरेकच केलेला आहे. स्वयंवरप्रसंगी प्रत्येक देवाचे आणि स्वतःचेही वर्णन नल दमयंतीपुढे विस्तारपूर्वक करीत असतो, त्यासाठी योजिलेले श्लोक द्वयर्थी आहेत. एक अर्थ देवप्रशस्तीचा दुसरा नलाच्या स्वीय मनोगताचा. ह्या सर्व श्लोकांच्या अखेरीस जो समारोपाचा श्लोक आहे त्याचे पाच अर्थ होतात. श्रीहर्षाची विनोदबुद्धी मात्र लक्षणीयपणे व्यक्त झालेली आहे. दमयंतीच्या स्वयंवरप्रसंगी सुंदर, चतुर नलाला पाहिल्यानंतर वरुण, यम, अग्नी व इंद्र ह्या चार देवांची काय अवस्था झाली ते वर्णन करताना तसेच दमयंतीने नाकारलेल्या राजांच्या वर्णनात ह्या विनोदबुद्धीचा प्रत्यय श्रीहर्ष देऊन जातो. सतराव्या सर्गात चार्वाकाने देवधर्म, सदाचार, व्रतवैकल्ये आदींच्या केलेल्या उपहासातून बुद्धिनिष्ठ विनोद आढळतो. काही सुंदर, चमकदार सुभाषितेही ह्या महाकाव्यात आहेत. असे असले, तरी हे काव्य श्रीहर्षानेच त्यासंबंधी म्हटल्याप्रमाणे, विद्वज्जन्यभोग्य आहे. ते तसे असले, तरी काव्य म्हणून दुय्यम दर्जाचे आहे. संस्कृत काव्याच्या ऱ्हासकाळातील व पंडिती युगातील सारे विशेष–आणि दोषही–ह्या महाकाव्यात एकवटलेले आहेत.

संदर्भ : Jani, A. N. A Critical Study of Sri Harsa’s Naisadhiyacaritam, Baroda, 1957.

भट, गो. के.