पत्रलेखन: प्रत्यक्षात बोलून जे काही एकमेकांना कळविता येत नाही, ते लिखित स्वरूपात कळविण्याचा लेखनप्रकार म्हणजे पत्रलेखन, असे स्थूलपणे म्हणता येईल. पत्राचा लेखक, पत्र ज्याला उद्देशून लिहिले जाते, तो त्याचा वाचक व पत्राचा मजकूर असे पत्रलेखनाचे तीन प्रमुख घटक मानता येतील. यांशिवाय पत्र ज्या रीतीने त्याच्या अभिप्रेत वाचकांपर्यंत पोहोचविले जाते (उदा., आधुनिक काळात जी प्रगत शासकीय टपालयंत्रणा आढळते, ती यंत्रणा), ती रीतीही पत्रलेखनात एक महत्त्वाची घटक ठरते. आलेली पत्रे व पाठविलेल्या पत्रांच्या स्थळप्रती जपून ठेवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती संभवतात. पत्रलेखन ज्यावर केले जाते, ती पाने कशी असावीत, यांसंबंधीही विविध संकेत रूढ झालेले आढळतात. आधुनिक पत्रलेखनात या सर्वच गोष्टींचा विचार करण्यात येतो.

  

पत्रलेखनाचा प्रमुख हेतू जे प्रत्यक्षात बोलून दाखविणे शक्य नसते, ते लिहून कळविणे हाच असला, तरी पुष्कळसा पत्रव्यवहार हा लिखित स्वरूपातच असणे आवश्यक मानले जाते. पहिल्या प्रकारात बहुतेक सर्व खाजगी पत्रलेखन व दुसऱ्या प्रकारात बहुतेक सर्व व्यावसायिक पत्रलेखन अंतर्भूत होते. खाजगी पत्रलेखन हे खाजगी संभाषणासारखे असून त्यातून विशिष्ट निमित्ताने केलेले अनौपचारीक व मनमोकळे निवेदन आढळते. पत्रलेखक व पत्रवाचक यांच्यात ज्या प्रकारचे संबंध असतील, त्यांवर या निवेदनाचा आशय व भाषाशैली अवलंबून असतात. खाजगी पत्रांतही औपचारिक प्रश्नोत्तरे संभवतातच पण त्यांतून व्यक्तिगत जवळीकच व्यक्त होते. व्यावसायिक पत्रलेखनाची व्याप्ती फार मोठी आहे. नोकरीसाठी अर्ज, शासकीय कार्यालयातून व खाजगी संस्थांतून केला जाणारा विविध प्रकारचा पत्रव्यवहार तसेच व्यापारी कंपन्या, छोटेमोठे दुकानदार, कारखानदार, बँका यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या घटकांचा पत्रव्यवहार या सर्वांचा अंतर्भांव व्यावसायिक किंवा सार्वजनिक पत्रलेखनात होतो. हे पत्रलेखन सामान्यतः औपचारिक स्वरूपाचे असते. त्यातील एक भाग हा प्रपत्ररूप असतो. त्याची लेखनपद्धती ठराविक प्रकारचीच असते. आधुनिक ⇨सचिवीय पद्धतीत पत्रलेखन अथवा मसुदालेखन यांना काटेकोर औपचारिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. खाजगी व व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांत ओळखपत्र, शिफारसपत्र, अधिकारपत्र, पोचपत्र इ. तसेच नोकरीसाठी करावयाचे अर्ज यांसारख्या अनेक बाबतींत विहित नमूने रूढ झालेले दिसून येतात [⟶मसुदालेखन व टिपणी].

  

पत्रलेखनाचा प्रकार इतरही काही उद्दिष्टांनी हाताळण्यात येतो. पत्ररूप कथाकादंबऱ्या, पत्ररूप वैचारिक लेखन, वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून जाहीरपणे प्रसिद्ध होणारी वाचकांची पत्रे व विशिष्ट व्यक्ती वा संस्थाना उद्देशून लिहिली जाणारी अनावृत पत्रे वा काल्पनिक पत्रे इ. प्रकारांतून पत्रलेखनाचे औपचारिक तंत्र वापरलेले असते. लेखक, कवी, कलावंत, राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांची खाजगी पत्रे संग्रहरूपाने प्रसिद्ध करण्यात येतात. त्यांचा उपयोग संबंधित अभ्यासकांना होतो. इतिहासकालीन पत्रव्यवहार हादेखील इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्वाचे साधन मानले जाते.

  

कोणत्याही खाजगी वा व्यावसायिक पत्राचे स्थूलमानाने पाच घटक असतात. (१) पत्रशीर्ष : पत्रलेखकाचे नाव, पत्ता व पत्राची तारीख हा तपशील सामान्यत: पत्राच्या वर उजव्या कोपऱ्यात लिहिण्याची पद्धत आहे. हाच मजकूर यापेक्षा वेगळ्या रीतीने कलात्मक छपाई करून अशी छापील पत्रशीर्षे वापरण्याची पद्धत रूढ आहे. पत्राच्या वरच्या टोकाला अगदी मधोमध सुभसूचक असा ‘श्री’ वा तत्सम निर्देश लिहिण्याची प्रथा आढळते (२) सुरुवातीचा मायना: खाजगी पत्रातील मायने हे पत्रलेखक-पत्रवाचक यांच्या कौटुंबिक नात्यांवर किंवा इतर प्रकारच्या संबंधावर अवलंबून असतात. पारंपरिक पत्रलेखनात आईवडिलांना तीर्थरूप, इतर वडीलधाऱ्यांना तीर्थस्वरूप, कनिष्ठ व्यक्तीस चिरंजीव, बरोबरीच्या मित्रमैत्रिणींना प्रिय असे संबोधून त्याखाली कृतानेक शिरसाष्टांग दंडवत किंवा नमस्कार, अनेक आशीर्वाद, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष यांसारखी अभिवादनपर वचने योजतात. आधुनिक पत्रलेखनात सामान्यतः ज्येष्ठांना सादर व समवयस्कांना व कनिष्ठांना सप्रेम नमस्कार एवढाच मायना पुरतो. तीर्थरूप व तीर्थस्वरूप ही आदरार्थी वचने मात्र आधुनिक पत्रलेखनात टिकून आहेत तथापि ‘प्रिय’ हेच संबोधन सर्रास वापरण्याची प्रथा बहुधा ‘डियर’ या इंग्रजी मायन्याच्या अनुकरणाने लोकप्रिय झालेली दिसते. 

व्यावसायिक पत्रांचे मायने औपचारिक असतात. ‘महोदय’- सारखा निर्देश त्यात पुरेसा असतो. मायना लिहिण्याच्या पूर्वी पुष्कळदा पत्राचा विषय आणि पूर्वकालीन पत्राचा संदर्भ एकाखाली एक देण्याची पद्धत आढळते (३) मसुदा : हा पत्राच्या मजकुराचा भाग असतो. सामान्यपणे सुस्पष्टता, समर्पकता, संपूर्णता, सविनयता, संक्षिप्तता, संभाषणात्मकता व समंजसपणा असे सप्त ‘स’ गुण पत्राच्या मजकुरात असावेत अशी अपेक्षा असते (४) समाप्तीचा मायना : पत्राचा मजकूर समाप्त झाल्यावर स्वतःची स्वाक्षरी करण्यापूर्वी  पत्रलेखकाला समाप्तीचा मायना लिहावा लागतो. आईवडिलांना व इतर वडीलधाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शेवट पुष्कळदा  ‘आपला आज्ञाधारक’ या वचनाने केला जातो. याशिवाय ‘आपला’, ‘आपलाच’, ‘तुझा’, ‘तुझाच’, ‘आपला स्नेहांकित’, ‘आपला स्नेहाकांक्षी’ असेही समाप्तिचे मायने वापरले जातात. व्यावसायिक पत्रलेखनात ‘आपला’, ‘आपला विश्वासू’ यांसारखे प्रयोग केले जातात (५) स्वाक्षरी : पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला खाली पत्रलेखकाची स्वाक्षरी असते. 

परिणामकारक पत्रलेखन करणे, ही एक कला मानली जाते. पत्रलेखनासाठी वापरण्याचा कागद वा छापील पत्रशीर्षे, टपाल खात्याकडून उपलब्ध होणारी कार्डे अंतर्देशीय पत्रे व पाकीटे यांतून योग्य त्या प्रकाराची करावयाची निवड, पत्रलेखनातील हस्ताक्षर, भाषाशैली, मसुद्यातील परिच्छेदयोजना, पत्र हस्ताक्षरात लिहावयाचे की टंकलिखित करून घ्यावयाचे याचा विवेक व पत्रावर पत्ता लिहिण्याची पद्धती यांसारख्या अनेक दृष्टींनी परिणामकारक पत्रलेखनाचा विचार करण्यात येतो. या सर्व अंगोपांगांचा काटेकोर विचार करणारे पत्रलेखनाचे एक शास्त्रच जणू आधुनिक काळात उदयास आले आहे. तथापि या तथाकथित शास्त्राचा उपयोग व्यावसायिक पत्रलेखनास जितका आहे, तितका तो खाजगी पत्रलेखनास नाही. शिवाय चांगल्या व प्रभावी पत्रलेखनाच्या कल्पना कालमानानुसार सतत बदलत गेलेल्या दिसतात. याशिवाय पत्रलेखन हे अखेरपक्षी व्यक्तिगत लेखन असल्याने त्यात पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सर्वच बाबतींत उमटणे स्वाभाविक असते. विशेषतः खाजगी पत्रलेखनातून पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन अपरिहार्यपणे घडते व ते घडावे अशीच अपेक्षाही असते. व्यावसायिक पत्रलेखन हे प्राधान्याने औपचारिक असल्याने, त्यात ठराविक तोच तोपणा सर्वच बाबतींत जाणवतो. तरीही काही व्यावसायिक पत्रलेखन हेही पत्र लिहिणाऱ्या संस्थेच्या वा संस्थाचालकांच्या विशिष्ट दृष्टिकोनाचा प्रभाव जाणवून देतात. प्रकाशित खाजगी पत्रव्यवहारही सर्वांना वाचनीय व उद्‌बोधक ठरतो. तोही व्यक्तिविशिष्ट अशा त्यातील गुणवत्तेमुळेच. 

जाधव रा. ग.


इतिहासकालीन मराठी पत्रलेखन: भारतात मुसलमानी अमलात कागदाची उपलब्धता वाढल्याने विशेषतराजकीय स्वरूपाचा पत्रव्यवहारही मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यातूनच पत्रलेखनाचे तांत्रिक संकेतही निर्माण झाले. पण बडोद्याच्या गायकवाड ओरिएंटल ग्रंथमालेत प्रसिद्ध झालेल्या लेखपद्धति (१९२५) या पुस्तकात मुसलमानपूर्व काळातील पत्रलेखनासंबंधी विवेचन आढळते. वि. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शक १८३२ च्या (इ. स. १९१०) अहवालात लेखनप्रशस्ति नावाचे एक प्रकरण (ग्रंथ) प्रकाशित केले. ते प्रकरण बहुधा मुळात असलेल्या प्रकरणास विद्यमान भाषेचे रूप देऊन लिहिले आहे. त्यात मुसलमानी व मराठी अमलात प्रचलित असलेल्या ७८ प्रकारच्या पत्रांची विवरणासह सूची दिलेली आहे. तथापि प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक प्रकारची पत्रे सापडतात. उदा., फर्मान, निशान, मनशूर, महजरनामा, कबालेपत्र, बेहडा, शुद्धिपत्र, दोषपत्र, देहझाडा इत्यादी. हे प्रकार म्हणजे शासकीय व इतर प्रपत्रांचेच विविध नमुने होत.

पत्रे लिहिताना अनेक पत्रांच्या बाबतीत कागदाला चार घड्या पाडून त्यांपैकी चार, साडेतीन, तीन, अडीच अगर दोन घड्यांवर पत्रलेखक पत्राची पहिली ओळ लिहीत. काही वेळा या पहिल्या ओळीच्या आरंभी दकार, अर्धदकार, दोन उभ्या दंडांसह दकार अथवा छकार लिहून मग मजकुरास प्रारंभ करीत. पत्रग्राहकाच्या दर्जाप्रमाणे पत्राच्या डोक्यावर, डाव्या अंगास मध्येच अथवा पत्रसमाप्तीनंतर पत्रलेखक आपला शिक्का उठवीत. याशिवाय एक किंवा अधिक वळणाचे उदा., ‘बहुत लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा’ ‘लेखनालंकार’ ‘बहुत काय लिहिणे’ अशा स्वरूपाचे शेरेही नमूद होत. पूर्वी पत्रलेखक सहसा पत्रावर स्वाक्षरी करीत नसत. अत्यंत महत्त्वाच्या पत्रावर कधीकधी ते स्वतःच्या हाताने आरंभी किंवा शेवटी शेरे लिहीत अथवा पत्राच्या डोक्यावर लिहिलेल्या ‘श्री’ या अक्षराजवळ आपल्या कुलदेवतेचे नाव नमूद करीत. फक्त महजरनाम्यावर उपस्थितांपैकी साक्षर व्यक्ती स्वतःच्या हस्ताक्षरात आपली नावे लिहीत.

पत्र लिहिताना अतिशय पू्ज्य किंवा महत्त्वाच्या व्यक्तीचा निर्देश करावयाचा झाल्यास तो पत्रात न करता तेथे मोकळी जागा सोडीत व त्याचे नाव पत्राच्या आरंभीच्या कोऱ्या जागेत लिहीत. कधीकधी पत्राच्या वर आरंभी आलेली अशी नावे एकाधिक असल्यास कोणते नाव कुठे घ्यावयाचे, हे संदर्भाने ठरविण्याचा संकेत होता. पत्र सामान्यतः ज्यास लिहावयाचे, त्याचे नाव प्रथम घालून नंतर पत्रलेखकाचे नाव घालण्यात येते.

त्याकाळी राजकीय पत्रव्यवहार कित्येक प्रसंगी शत्रूच्या हातात सापडण्याचा संभव असे, म्हणून मूळ पत्रात ते पत्र कोणी कोणास पाठविले ते लिहीत नसत. पत्राच्या लिफाफ्यावर ज्याला ते पत्र पाठवावयाचे त्याचे नाव घालीत आणि लिफाफ्यावर लावलेल्या पट्टीवर ज्याच्या कडून ते पत्र आले आहे तो आपले नाव किंवा अधिकार असल्यास स्वतःचा शिक्का उठवी. पत्रलेखक विनंती, अर्ज, आज्ञा इ. शब्द लिहून पत्राच्या आशयाचे स्वरूप सूचित करीत असे, पत्रलेखक व पत्रवाचक यांच्या परस्पर अधिकारानुरूप नमस्कार, आशीर्वाद, दंडवत हे शब्द योजिले जात. त्याचप्रमाणे राजमान्य, राजश्री, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, सौभाग्यवती, गंगाजलनिर्मल इ. शब्दांनी पत्रवाचकांचा निर्देश करीत. पोष्य, विद्यार्थी इ. शब्द लिहून पत्रलेखक आपला दर्जा सुचवीत असे. ब्राह्मणाला ब्राह्मणाशिवाय इतर कोणत्याही जातीच्या मनुष्याने पत्र लिहिताना निरपवाद दंडवत हा शब्द लिहावयाचा असे. जुन्या कागदपत्रांत वारंवार येणाऱ्या कित्येक शब्दांचे (सु. २००) व काही प्रसंगी विशेषनामांचेही संक्षेप केलेले आढळतात. त्या संक्षेपांचे अर्थ सवयीने समजू लागतात. उदा., पा (म्हणजे परगणे, परवानगी, पाखाडी,

पाटील, पातशाही, पायली, पाहिजे इ.) किंवा मु॥ (म्हणजे मुहंमद) अथवा वि॥ (म्हणजे वीरेश्वर, विश्वनाथ).

पत्रलेखन पद्धतीवर फार्सीमध्ये इन्शा-इ-माधोराम, इन्शा-इ-हरकरन, इन्शा-ई-हर मअनी. इ. पुस्तके आहेत. जुन्या मराठी ऐतिहासिक सामग्रीत पत्रमायन्यांचे संग्रह सापडतात, पण त्यांना स्वतंत्र नावे नाहीत व त्यांपैकी फारच थोडे प्रकाशित झाले असावे.

वर दिलेले वर्णन सामान्यतः पत्रव्यवहारासंबंधी आहे. हिशेबी कागदपत्र कसे लिहीत, हा एक स्वतंत्र विषय आहे. तो मेस्तक नावाच्या विविध प्रकरणग्रंथात सविस्तर वर्णिलेला आहे. तक्ते, मायने, हिशेबलेखनाची पद्धत इ. अर्थानीही ‘मेस्तक शब्द रूढ आहे.

संदर्भ : १. जोशी, आ. बा. चांदोरकर, आबा, संपा. श्रीशिवशाहीचा लेखनालंकार, पुणे, १९३३.

    २. मेहेंदळे, खंडेराव चिंतामण, संपा. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३४ (चैत्र–भाद्रपद),पुणे, १९१२.

  

खरे, ग. ह.