प्रवेशक : हा शब्द इंग्रजीतल ‘प्रोलॉग’ या शब्दाचा पर्याय म्हणून मराठीत आलेला आहे. नाटक, काव्य वा व्याख्यान इ. वाङ्‌मयकृतींतील प्रारंभीचा प्रस्तावरूप भाग म्हणजे ‘प्रवेशक’ मात्र आता केवळ नाट्याकृतीच्या प्रारंभिक भागापुरतीच ती संज्ञा मर्यादित झालेली दिसते. प्राचीन ग्रीक, तसेच संस्कृत, इंग्रजी व मराठी नाटकांतून प्रवेशकाचा वापर केल्याचे दिसून येते.

रंगमंचावर प्रत्यक्ष नाट्याप्रयोगाला प्रारंभ होण्यापूर्वी नाटकाचे प्रयोजन, नाट्यालेखक, नाटकातील मध्यवर्ती कल्पना यासंबंधी प्रारंभिक निवेदन करणे, हे प्रवेशकाचे कार्य असे. ग्रीक नाट्यामध्ये काही पात्रे मुख्य नाट्यवस्तूपासून अलग राहून घडणाऱ्या घटनांवर भाष्य करीत असतात. त्यास ‘कोरस’ म्हणतात. युरिपिडीझने नाट्याच्या आरंभी एखादी कविता किंवा भाषण योजून नाट्यवस्तू स्पष्ट करण्याची, तीवर भाष्य करण्याची प्रथा पाडली. त्याला ‘प्रोलॉग’ म्हणतात. ‘कोरस-प्रोलॉग’ चा असा उपयोग इंग्लंडमध्ये एलिझाबेथ राणीच्या काळातील नाटककार व शेक्सपिअर यांनी केला आहे. किंग हेन्री द फिथ वा रोमिओ अँड ज्यूलिएट यांसारख्या नाटकांतून शेक्सपिअरने प्रवेशकाला स्थान दिल्याचे आढळते. प्रवेशकापेक्षा समारोपाची (एपिलॉग) योजना करण्याकडे त्याचे विशेष लक्ष होते.

संस्कृत नाटकातील प्रवेशक (आणि ‘विष्कंभक’) म्हणजे अमुख्य पात्रांनी सादर केलेले, कथावस्तूतील आवश्यक पण रंगमंचावर प्रत्यक्ष दाखविण्यास योग्य नसलेल्या घटनांचे निवेदनदृश्य.

अशा निवेदनदृश्याची जरूरी संस्कृत नाटकांत अनेक कारणांसाठी भासते. अंकामध्ये मुख्यतः प्रमुख पात्रांची क्रिया-भाषणे असावीत, एका दिवसात घडणाऱ्या घटनाच योजाव्यात, रसभावांच्या अनुभूतीवर भर असावा, अशी भरताची धारणा आहे. त्यामुळे गौण पात्रांच्या हालचाली व भाषणे (‘परिजनकथा’), नीरस तसेच औचित्यभंग होऊ नये म्हणून किंवा इतर अडचणींमुळे रंगमंचावर दाखविता न येण्याजोगी युद्धासारखी दृश्ये इ. गोष्टी कथावस्तूला आवश्यक असतील, तर त्या अंकाला जोडलेल्या स्वतंत्र दृश्याने आणि केवळ निवेदनानेच योजाव्या लागतात.

अंकामध्ये एकाच दिवसातील घटना असल्या, तरी काही वेळेस घटनास्थल बदलते परंतु अंक तोडून वेगवेगळे प्रवेश लिहिण्याची पद्धती संस्कृत नाटकांत नसल्यामुळे, प्रवेशक अंकच्छेद करून, अंकान्तरानुसारी, म्हणजे दोन अंकांच्या मध्ये येतो (नाट्यशास्त्र १८·२३, २६, ३३, ५६). ज्यावेळेस नाट्यवस्तूची पार्श्वभूमी आरंभीच सांगणे आवश्यक असते, त्यावेळेस ‘विष्कंभक’ योजण्याची सूचना भरताने केली आहे (नाट्यशास्त्र १८·५४ १९·१११). प्रवेशक-विष्कंभक ही अशा रीतीने निवेदनरूप जोडणी-दृश्ये असतात.

प्रवेशक-विष्कंभकातील तांत्रिक भेद असा : विष्कंभकात एक किंवा अधिक मध्यम दर्जाची पात्रे, भाषा संस्कृत, योजना अंकारंभी, पहिल्या अंकापूर्वीदेखील तर प्रवेशकात एक किंवा अनेक खालच्या दर्जाची पात्रे (दासी, परिजन इ.), भाषा प्राकृत, योजना दोन अंकांच्या मध्ये, म्हणजे पहिला अंक सोडून पुढील कोणत्याही अंकाच्या आरंभी.

नंतरच्या शास्त्रचर्चेत प्रवेशक-विष्कंभकाचे मूळ कार्य राहिले नाही. तांत्रिक भेद कायम ठेवून, दोन्हींचा उपयोग गत किंवा आगामी घटनांचे निवेदन असा होऊ लागला. शास्त्रकारांनी प्रवेशक-विष्कंभकाच्या मिश्रणाने (मध्यम आणि नीच पात्रे, संस्कृत व प्राकृत भाषा) ‘मिश्रविष्कंभक’ म्हणून आणखी एक प्रकार केला आहे.

मराठी नाट्यसृष्टीकडे दृष्टिक्षेप केल्यास संस्कृत नाट्यतंत्रानुसार लिहिण्यात आलेल्या आरंभीच्या नाटकांतून नटी-सूत्रधार यांच्या संवादातून प्रवेशकाची योजना दिसून येते. विष्णुदास भावे ह्यांच्या नाट्यरचनेतून विदूषक-सूत्रधार यांच्यातील विनोदपर संवाद आढळतो. विघ्नहर्ता श्रीगणेश व ब्रह्मकुमारी सरस्वती ह्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी म्हणावयाचे स्तवन गाऊन झाल्यानंतर, प्रत्यक्ष नाटकास सुरुवात करताना सूत्रधाराने संबंधित नाटकात कोणता भाग सादर होणार आहे व आरंभीचा प्रसंग कशा स्वरूपाचा आहे, याचे पद्यमय वर्णन करावयाचे व त्यानंतर पात्रांनी येऊन आपले भाषण करावयाचे, असा तत्कालीन प्रघात दिसतो. मराठी नाटकातील प्रवेशकाचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.

वऱ्हाडपांडे, व. कृ. भट, गो. के.