नेहरू पुरस्कार : भारत सरकारतर्फे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आंतरराष्ट्रीय सामंजस्यानिमित्त जवाहरलाल नेहरू पुरस्कार, असे त्याचे नामाभिधान असून आंतरराष्ट्रीय सामंजस्य, सदिच्छा व स्नेह यांच्या संवर्धनासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. पुरस्काराची रोख रक्कम रुपये एक लाख असून त्यासोबत पुरस्कारपत्रही देण्यात येते. त्याची कार्यवाही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद करते. पुरस्कारास योग्य व्यक्ती निवडण्याचे काम एका परीक्षक-मंडळाकडे असून त्यात सात सभासद असतात, त्यांपैकी भारताचे उपराष्ट्रपती हे या मंडळाचे अध्यक्ष असून वरील संस्थेचा सचिव हाच या मंडाळाचा सचिव असतो. उपराष्ट्रपतींव्यतिरिक्त सरन्यायाधीश, कोणत्याही राज्यातील एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, एक भारतीय विद्यापीठाचा कुलगुरू, मान्यवर भारतीय वृत्तपत्रसंघाचा एक प्रतिनिधी आणि सार्वजनिक जीवनातील दोन मान्यवर व्यक्ती मिळून हे परिक्षक मंडळ होते. उपराष्ट्रपती व सरन्यायाधीश हे कायमचे पदसिद्ध सभासद असतात.

हा पुरस्कार १९६४ पासून देण्यात येत असून विविध देशांतील पुढील व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे : ऊ थांट (ब्रह्मदेश–१९६५), मार्टिन ल्यूथर किंग, ज्यूनिअर (अमेरिका–१९६६), खान अब्दुल गफारखान (पाकिस्तान–१९६७), येहूदी मेन्युइन (अमेरिका–१९६८), मदर टेरीसा (स्पेन–१९६९), केनेथ कौंडा (झँबिया–१९७०), मार्शल टिटो (यूगोस्लाव्हिया–१९७१), आंद्रे मालरो (फ्रान्स–१९७२), ज्यूलिअस न्येरेरे (टांझानिया–१९७३), रॉऊल प्रेबिश (अर्जेंटिना–१९७४), जोनास सॉल्क (ग्रेट ब्रिटन–१९७५).

देशपांडे, सु. र.