नृत्यसंगीत : या संज्ञेची फोड वास्तविक पाहता दोन तऱ्हांनी केली पाहिजे : नृत्यासाठी असलेले संगीत आणि नृत्याबरोबर असलेले संगीत. आधुनिक नृत्यात संगीतास नृत्यात्म प्रतिसाद देणे, ही क्रियाही कलात्मक दृष्ट्या इष्ट मानली गेली आहे. त्यामुळे संगीताचा येथे होणारा आविष्कार नृत्यास नियंत्रित करतो, अशी परिस्थिती निर्माण होत असते. नृत्याबरोबर असणारे संगीत नेहमीच नृत्यासाठी असते असे नाही, हा यातील मुद्दा होय. पारंपरिक दृष्ट्या नृत्यामधून मुद्रा, हस्त व शरीर यांच्या अभियनांतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना व विचार यांना प्रत्ययकारी करण्यासाठी संगीताचा वापर करण्यात येतो, अशी भूमिका मांडली जाते व त्या संदर्भात नृत्यसंगीत म्हणजे नृत्यासाठी असलेले संगीत असा अर्थ स्वीकारार्ह ठरतो.
नृत्यसंगीत कंठ्य व वाद्यसंगीत असू शकते आणि वाद्यांत प्रामुख्याने लयवाद्यांचा (आघातकारी वाद्यांचा भरणा अधिक) समावेश असतो. कारण कालमापन करून लय पुरविणे, हेच नृत्यसंगीताचे प्रधान उद्दिष्ट होय.
विविध नृत्यशैलींपैकी असंयुक्त मुद्रांमधील नामभेद |
||||
भरतनाट्यम् |
कथकळी |
मणिपुरी |
ओडिसी |
कथ्थक |
पताका |
त्रिपताका |
पताका |
ध्वज |
पताका |
अराल |
मुद्राख्य |
अंकुश |
ध्यान |
अराल |
त्रिशूल |
– |
त्रिशूल |
– |
त्रिशूल |
भ्रमर |
कटकम् |
भृंग |
– |
भ्रमर |
आलपद्म |
पल्लव |
आलपल्लव |
क्षिप्त |
आलपल्लव |
कटकामुख |
हंसास्य |
हंसास्य |
पुष्प |
कटकामुख |
पद्मकोश |
उर्णनाभ |
शार्दूलास्य |
– |
पद्मकोश |
शिखर |
वर्धमानक |
शिखर |
अरात्रिक |
शिखर |
आधारग्रंथ : नाट्यशास्त्र व अभिनयदर्पण |
हस्तलक्षणदीपिका |
गोविंद संगीत लीलाविलास |
अभिनय चंद्रिका |
नाट्यशास्त्रसंग्रह व अभिनयदर्पण |
ढोबळ मानाने पाहता नृत्यसंगीताचे तीन प्रकार मानता येतील :
(१) आदिम व लोक संस्कृतींतील नृत्यांबरोबर वापरले जाणारे संगीत. या संगीतास मुख्यत्वे लोकवाद्यांची साथ असते.
(२) शिष्ट वा नागर संस्कृतीतील पारंपरिक अभिजात नृत्यांबरोबररागदारी वा तत्कालस्फूर्त संगीताची साथ असते. नृत्याची बांधणी करण्यासाठी यात शास्त्रीय संगीतपरंपरेतील राग व ताल आणि साहित्यपरंपरेतील गीते यांचा उपयोग केला जातो.
(३) विविध वाद्ये, विषयानुरूप गीते आणि कथानकानुसार नृत्यसंगीतबाह्य हालचाली व ध्वनी यांचा उपयोग करून नृत्यनाट्यासारख्या संयोगी आविष्काराची घडण सिद्ध करण्यात येते. नृत्याला पोषक अशी ही संगीतरचना असते आणि भावनापरिपोषाबरोबरच आविष्कारार्थ एक मजबूत चौकट पुरविणे, हेही त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते.
भारतात प्राचीन नाटकात कंठ्य व वाद्यसंगीत आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ झाला होता. या सर्वांना त्या काळात सारखेच महत्त्व असावे, असे तत्संबंधीच्या तपशीलवार सूचनांवरून वाटते. बाराव्याशतकात सोमेश्वराने वाद्यवर्गीकरणात नृत्याबरोबर साथ देणारी वाद्ये असा एक निराळा वर्ग मानला आहे, त्यावरून नृत्यसंगीताचे स्वतंत्र महत्त्वही प्रस्थापित होते. या आविष्कारांत वीणा, बासरी, मंजिरा व आघातयुक्त चर्मवाद्ये वापरली जात.
रानडे, अशोक
संगीताचे विविध नृत्यपरंपरांतील स्थान: आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंत जसजशी सांस्कृतिक प्रगती होत गेली, तसतशी संगीताच्या स्वरूपातही प्रगती झाल्याचे दिसून येते. आदिम नृत्यांसाठीवापरले जाणारे संगीत नैसर्गिक ध्वनी, टाळ्या व आवेशयुक्त पदाघात यातून साकार झाले. त्यातून नर्तकाच्या भावनांची कमीजास्त तीव्रता व्यक्त केली जात असे. कालांतराने सांस्कृतिक भिन्नतांची दर्शक अशी जमातींची नृत्ये आणि समूहनृत्ये यांचा विकास झाला. लोकगीते, तसेच साधीसुधी तंतुवाद्ये, ढोल, बासरी व इतर परिणामसाधक लोकवाद्ये ही या नृत्यासंगीतास साथ देऊ लागली.
संगीताच्या आणि नृत्याच्या संस्कारित व सूक्ष्म छटांच्या विकसित तंत्राबरोबरच पारंपरिक आणि अभिजात नृत्ययुगाची सुरुवात झाली व शास्त्रोक्त संगीत आणि अभिजात नृत्य यांस पोषक ठरणारे एक नृत्यसंगीताचे शास्त्रच निर्माण झाले.
भिन्नभिन्न तंतुवाद्ये, सुषिरवाद्ये, आघातवाद्ये, धनुर्वादित वाद्ये व विशिष्ट परिणामसाधक वाद्ये ह्यांचा वापर सुरू झाला. ह्याचबरोबर शास्त्रोक्त संगीत तसेच वीणा, सारंगी, व्हायोलीन यांसारखी वाद्ये भारतातील विविध प्रदेशांतील अभिजात नृत्यांची साथ करू लागली. त्यांत कित्येक वेळा प्रादेशिक भाषांतील गीते वा संस्कृत गीतेही योजली गेली. ⇨ भरतनाट्यम् नृत्यपरंपरेतील शास्त्रोक्त संगीत गीतांतील शब्दांबरहुकूम असून कर्नाटक संगीतातील रागांवर आधारित असते. संगीताची योजना आधी करून नंतर नर्तक त्यावर विविध अभिनय,हस्तमुद्रा व शारीरिक हालचालींच्या अभिजात आकृतिबंधांचा साज चढवून त्यातील काव्यार्थ विशद करतो. सगीताच्या रचनाबंधांनी ‘आलारिपु’, ‘जतिस्वरम्’, ‘वर्णम्’, रागमालिका’, ‘पद्म’, ‘तिल्लाना’ यांसारखे नृत्यप्रकार नियंत्रित केले जातात. ⇨ कूचिपूडी नृत्य व ⇨ ओडिसी नृत्य ह्या नृत्यप्रकारांमध्येही वरीलप्रमाणेच संगीताचा वापर केला जातो. ⇨ कथकळी नृत्य, मोहिनीआट्टम इ. केरळीय नृत्यप्रकारांमधील संगीत हे त्या नृत्यांच्या कथाविषयांतील गाण्यांना पोषक असून, तेथील प्रादेशिक वाद्यांच्या साथीत बांधले जाते. नृत्यामधील हस्तमुद्रा, अभिनय, शरीराच्या हालचाली, पदन्यास इ. संगीताच्या स्वरूपाबरहुकूम योजिलेले असतात. या नृत्यप्रकारांतही संगीतास प्राधान्य असते व त्यातील भाव प्रकट करण्याकरिता नृत्याचा वापर केला जातो. ही सर्व नृत्य दाक्षिणात्य असल्यामुळे कर्नाटक संगीतावर आधारित आहेत. ⇨ कथ्थक नृत्यपरंपरेतही संगीत हाच प्रमुख घटक आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील धृपद-धमार, होरी, ठुमरी, तराणा, भजन इ. प्रकारांवर हे संगीत आधारित आहे. त्यात शब्द, संगीत व हावभाव ह्यांची आंतरिक परस्परवीण घट्ट बांधलेली असते. संगीतरचना हा या नृत्याचा मूलघटक. त्यातूनच कथ्थक विकास पावते व संगीताचा अन्वयार्थ प्रकट करते. संगीत व गीत ह्यांचा अर्थ स्पष्ट करण्याकरिता कथ्थकमध्ये अभिनय, शारीरिक हालचाली व हस्तमुद्रा यांचा वापर केला जातो. कथ्थकमधील पदन्यास तंत्रदृष्ट्या खूपच प्रगत असून त्याला पखावज, तबला, नगारा इ. वाद्यांची साथ असते. नर्तक आपल्या पदन्यासांतून अत्यंत अवघड व गुंतागुंतीचे असे तालांचे रचनाबंध निर्माण करतो व त्याच वेळी ते वाद्यांच्या बोलांतूनही प्रकटकेले जातात. ⇨ मणिपुरी नृत्यातसुद्धा आधी संगीत व तदनंतर त्याचे नृत्याद्वारे विशदीकरण केले जाते. गीते तसेच बासरीसारखी वाद्ये, तंतुवाद्ये व ‘पुंग’ (मणिपुरी ढोल), मंजिरा इ. वाद्ये यांनी हे संगीत युक्त असते. मणिपुरी नृत्यातील संगीत व गीते कर्नाटक संगीतापेक्षा हिंदुस्थानी संगीताशी जास्त निगडित आहेत. पुंगचे वादनतंत्र हे मात्र कर्नाटक अथवा हिंदुस्थानी संगीतातील आघाती वाद्यांच्या वादनतंत्रापेक्षा अत्यंत भिन्न आहे. ⇨ बॅले व तत्सम आधुनिक नृत्यामध्ये मात्र बहुधा आधी नृत्य व मग संगीत असा क्रम असतो. या नृत्यांमध्ये संगीतदिग्दर्शकास शास्त्रोक्त, लोकसंगीत वा हलकेफुलके संगीत यांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य असते. तो एक वा अनेक आवाजांचा व गीतांचा उपयोग करतो, तसेच कोणतीही वाद्ये वापरू शकतो व म्हणूनच संगीतदिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेचा खरा कस येथे लागतो. वातावरणनिर्मिती हेच त्याचे साध्य असते.
घनवाद्यप्रकारातील विविध वाद्यांच्या साहाय्याने आशय, वातावरण व भाव यांस अनुरूप व प्रभावी असे परिणामसाधक संगीत बॅले नृत्य, सिनेनृत्य व आधुनिक नृत्य यांसाठी निर्माण करता येते. तद्वतच वाद्यवृंदाच्या साथीतील विशुद्ध ध्वनीसुद्धा आश्चर्यजनक परिणाम साधून जातात. पारंपरिक नृत्यांत वा लोकनृत्यांत उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने भारतीय वाद्यवृंदाच्या मर्यादा विशेषत्वाने जाणवतात. तथापि ह्या वाद्यवृंदास भारतीय विविध संगीतवाद्यांची तसेच परिणामसाधक वाद्यांची जोड लाभल्यास असा वाद्यवृंद खूप व्यापक अशा सर्जनशील संगीतनिर्मितीस प्रेरक ठरू शकेल व स्वतंत्र वाद्यवृंद्य म्हणून तसेच समूहनृत्यांसाठी, नृत्यनाट्यांसाठी, आधुनिक नृत्यांसाठी त्यास भरपूर वाव मिळेल.
शिराली, विष्णुदास (इं.) वडगावकर, सुरेंद्र (म.)
“