नुस्रती: (?—१६८४). विजापूर येथील दुसरा अली आदिलशहा (कार. १६५६—७२) याच्या दरबारातील प्रसिद्ध उर्दू कवी. नुस्त्रतीचे मूळ नाव मुहंमद नुस्रत होते. ‘नुस्रती’ हे त्याचे टोपणनाव. गारसाँ द तासी याने तो ब्राह्मण होता, असे म्हटले आहे पण ते खरे दिसत नाही. त्याचे घराणे आदिलशाही राज्यात शिपाईगिरी करणारे होते. त्याच्या वडिलांनी त्याच्या विद्याभ्यासाची चांगली काळजी घेतली असावी असे दिसते. तो युवराज अली आदिलशहाचा सहचर होता. त्याने आदिशाहीतील मुहंमद, अली व शिकंदर या तीनही बादशहांची कारकीर्द पाहिली. त्याचा वध विजापूर येथे हिजरी वर्ष १०८५ मध्ये झाला.

त्याचे तीन काव्यग्रंथ उपलब्ध आहेत. त्याचे पहिले प्रेमकाव्य गुल्शनेइश्क हे  सु. ४,००० पद्यांचे असून त्यात मनोहर व मधुमालती यांची प्रेमकथा वर्णिली आहे. त्यातील वर्णने, कल्पनाविलास, अलंकारप्राचुर्य ही श्रेष्ठ प्रतीची आहेत. तत्कालीन मराठी साहित्यात आढळणाऱ्या वर्णनांप्रमाणे त्यातील विवाहविधी व पक्वान्नप्रकारांचे वर्णनही लक्षणीय आहे. मराठी भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने नुस्रतीने उपयोजिलेले शब्दभांडार महानुभाव वाङ्‌मयात आढळते. त्याचा अलीनामा (हि. १०७६, संपा. ए. एम्. सिद्दिकी, हैदराबाद, १९५९) हा ६,००० पद्ये असलेला ग्रंथ वरील साहित्यगुणांखेरीज युद्धवर्णन, निसर्गशोभा, सह्याद्रीतील कोटकिल्ले, शिवाजीचे व्यक्तिमत्त्व, मराठ्यांचे शौर्यवीर्यगुण इ. दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यात दुसरा अली आदिलशहा याचे जीवन चित्रित केलेले आहे. ‘रज्मिया मस्नवी’ (युद्धपर खंडकाव्य) म्हणून हा ग्रंथ सर्वच उर्दू साहित्यात अपूर्व आहे, असे हक यांनी जे म्हटले ते यथार्थ आहे. तारीखे-इस्कंदरी  हा त्याचा लघुग्रंथ आता हिंदीत प्रकाशित झाला आहे. तो इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. संस्कृत साहित्यातून अमीर खुसरौ याने उचललेल्या आख्यायिकेच्या तंत्राचा नुस्रतीने उर्दूत अवलंब केला. ही प्रथा नंतर दक्खिनी साहित्यात रूढ झाली. विजापूर येथील हाशमी याने ती आपल्या यूसुफ जुलैखा या मस्नवीत स्वीकारली आहे. तिला उर्दू साहित्यिक ‘अबयाते-सिलसिला’ असे नाव देतात.

हा प्रकार फार्सी भाषेत महाकवी हाफिज याने हाताळला होता. नुस्रीने तो उर्दूत (दक्खिनी हिंदीत) आणला. हाशमीने ‘तो व ती’ यांच्या संवादाच्या १३–१४ गझला लिहिल्या आहेत.

चौहान, देवीसिंग