नीबलुङ्‌गलीड: जर्मनांचे राष्ट्रीय महाकाव्य. त्याचा उपलब्ध असलेला सर्वांत जुना पाठ सु. १२०० चा आहे. ३९ सर्गांच्या ह्या महाकाव्याचा कर्ता कोण, हे आजही अज्ञातच आहे तथापि तो ऑस्ट्रियन होता आणि हे महाकाव्य ऑस्ट्रियातच रचिले गेले, असे दिसते.

बर्गंडियन राजा ग्यूंटर ह्याची बहीण क्रीमहिल्ड हिने आपल्या पतीच्या–नेदर्लंड्सचा राजपुत्र सीगफ्रीड ह्याच्या–वधाचा घेतलेला सूड हा ह्या महाकाव्याचा विषय. ‘नीबलुङ्‌गलीड’ म्हणजे नीबलुङ्‌गलीड गान. ‘नीबलुङ्‌ग’ हा शब्द ह्या महाकाव्याच्या पूर्वार्धात ‘नेदर्लंड्स व तेथील लोक’ ह्या अर्थाने व  उत्तरार्धात ‘बर्गंडियन’ अशा अर्थाने वापरला गेल्याचे दिसून येते. महाकाव्याची कथा थोडक्यात अशी : क्रीमहिल्डशी विवाह करण्याच्या हेतूने सीगफ्रीड ग्यूंटरच्या वर्म्झ येथील दरबारी येतो. एक युद्धकुशल, सामर्थ्यवान वीरपुरुष म्हणून त्याची ख्याती असते. विशेष म्हणजे एका ड्रॅगनला ठार मारून त्याच्या रक्तात न्हाल्यामुळे त्याचे सारे शरीर अभेद्य झालेले असते परंतु त्या वेळी त्याच्या पाठीवर एका झाडाचे पान गळून पडल्यामुळे तेवढा भाग कोरा राहतो आणि तोच त्याचे मर्मस्थान ठरतो. तेथे आघात केल्यासच तो मरू शकतो. आपल्या सामर्थ्यावर त्याने बराचसा सुवर्णसंचयही प्राप्त करून ठेवलेला असतो.

ग्यूंटरच्या दरबारी येताच सीगफ्रीड त्याला लढण्याचे आव्हान देतो. मला क्रीमहिल्ड देऊन टाक नाही तर आव्हान स्वीकार, असा त्याचा आक्रमक पवित्रा असतो परंतु हे वादळ शमते आणि ग्यूंटरची व सीगफ्रीडची मैत्री होते. बर्गंडियनांच्या वतीने डेन आणि सॅक्सन लोकांशी सीगफ्रीड लढतो. कालांतराने आय्‌झेन्स्टाइन बेटाची सामर्थ्यसंपन्न आणि क्रीडापटू राणी ब्रूनहिल्ड हिला प्राप्त करून घेण्याची इच्छा ग्यूंटरला होते. तथापि आपल्याशी विवाह करू इच्छिणाऱ्याने आपल्या इतकीच अचाट ताकदीची कामे करून दाखविली पाहिजेत, अशी ब्रूनहिल्डची अट असते आणि ह्या कसोटीस न उतरणाऱ्याला देहान्त शासन देण्याची तिची रीत असते. ह्यातून मार्ग काढण्यासाठी ग्यूंटर सीगफ्रीडची मदत घेतो. सीगफ्रीड ग्यूंटरसह ब्रूनहिल्डच्या भेटीस जातो परंतु नेदर्लंड्सचा राजपुत्र, ही आपली खरी ओळख लपवून आपण ग्यूंटरचा एक आश्रित (व्हॅसल) असल्याचे तो येथे भासवतो. सीगफ्रीडकडे जादूचे एक जाकीट असते. ते अंगावर घालताच तो अदृश्य होऊ शकतो. ह्या जाकीटाच्या साहाय्याने अदृश्य होऊन ग्यूंटरने कसोटीसाठी करावयाची सारी कृत्ये स्वतः सीगफ्रीडच करतो आणि ती ग्यूंटरने केली असे ब्रूनहिल्डला भासवितो. ब्रूनहिल्डला ग्यूंटरशी विवाह करणे भाग पडते. सीगफ्रीडचा विवाह क्रीमहिल्डशी करून दिला जातो. एक सामान्य आश्रिताशी ग्यूंटरने आपल्या बहिणीचा विवाह करून द्यावा, ही गोष्ट ब्रूनहिल्डला नाराज करते. एका पुरुषाकडून अखेरीस पराभूत झाल्याचे शल्यही तिच्या मनात असतेच. लग्नानंतरच्या रात्री ब्रूनहिल्ड ग्यूंटरला प्रतिकार करू पाहते, तेव्हाही अदृश्य रूपात सीगफ्रीड तेथे येतो आणि तिला काबूत आणून ग्यूंटरच्या स्वाधीन करतो. मात्र काळोखात निघून जाताना ब्रूनहिल्डची अंगठी आणि कमरपट्टा तो स्वतःबरोबर घेतो. हे सारे त्याने फक्त क्रीमहिल्डला सांगितलेले असते. पुढे एका प्रसंगी क्रीमहिल्डचा ब्रूनहिल्डशी मानापमानाच्या प्रश्नावरून खटका उडतो. रागाच्या भरात क्रीमहिल्ड ब्रूनहिल्डला सीगफ्रीडने बरोबर आणलेली तिची अंगठी व कमरपट्टा दाखविते त्यावर अपमानकारक भाष्य करते. ह्या प्रकाराने ब्रूनहिल्ड अतिशय संतापते. ग्यूंटरलाही हे समजते. त्यानंतर ग्यूंटरचा निष्ठावंत सेवक हागेन सीगफ्रीडचा सूड घेण्याची योजना आखतो. क्रीमहिल्डचा विश्वास संपादून सीगफ्रीडच्या मर्मस्थानासंबंधीची माहिती तो मिळवतो आणि मग शिकारीच्या वेळी सीगफ्रीड तलावाकाठी पाणी पीत असताना संधी साधून त्याला विश्वासघाताने ठार करतो. क्रीमहिल्ड व ग्यूंटर ह्यांच्यात अंतराय निर्माण होतो परंतु तो नाहीसा करण्याचा ग्यूंटरचा प्रयत्न काही काळ यशस्वी होतो. ह्या काळात सीगफ्रीडचा सुवर्णसंचय वर्म्झ येथे आणला जातो. तथापि हे सोने क्रीमहिल्ड हळूहळू वाटून टाकीत आहे आणि त्यामुळे तिचा प्रभाव व सामर्थ्य वाढण्याची शक्यता आहे, हे लक्षात येताच हागेन ते सर्व सोने ऱ्हाईन नदीच्या पात्रात कोठे तरी दडवून ठेवतो. हा ह्या महाकाव्याचा पूर्वार्ध.

महाकाव्याच्या उत्तरार्धात सीगफ्रीडच्या वधाचा सूड घेण्याच्या दृष्टीने हुणांचा राजा एत्सेल (ॲटिला) ह्याच्याशी विवाह करण्याची संधी क्रीमहिल्ड घेते. काही वर्षांनी एत्सेलकडून ती ग्यूंटरला आणि तिच्या अन्य भावांना दरबारी पाहुणचाराचे आमंत्रण देवविते. ह्या मंडळींसह हागेन यावा म्हणून तिचे विशेष प्रयत्न असतात. यातला धोका हागेन ग्यूंटरला सूचित करतो परंतु त्याचा उपयोग होत नाही. तथापि सर्वजण तेथे सशस्त्र जातात. हुणांच्या भूमीत ते पोहोचल्यानंतर क्रीमहिल्ड सूडाच्या दिशेने पावले टाकू लागते. यथावकाश लढाईची धुमश्चक्री उडते. क्रीमहिल्डच्या भावांसह सारे बर्गंडियन तर तीत मारले जातातच परंतु क्रीमहिल्डच्या व्यक्तिगत दुःखाशी आणि सूडाशी कसलाही संबंध नसलेले शेकडो लोकही ठार होतात. हागेन क्रीमहिल्डपुढे अखेरपर्यंत ताठरपणे वागतो सागफ्रीडचा खजिना कोठे ठेवला हे सांगत नाही म्हणून क्रीमहिल्ड स्वतः त्याचा वध करते. एका व्यक्तिगत सूडापायी एवढा विध्वंस झालेला पाहून एत्सेलच्या दरबारी आलेल्या डीट्रिच फोन बेर्नचा वृद्ध गुरू हिल्डेब्रांड हा एत्सेलच्या समोर क्रीमहिल्डचे डोके उडवतो. ‘अशी ही नीबलुङ्‌गांच्या नाशाची कथा’ या आशयाचे शब्द महाकाव्याच्या अखेरीस येतात.

या महाकाव्याच्या रूपाने आज आपणासमोर आलेल्या कथानकाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केलेला आहे. कार्ल लाखमान आणि आनड्रेआस हॉइस्लर ह्यांचा ह्या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल. लोकांत प्रचलित असलेल्या वीस गीतांतून नीबलुङ्‌गांलीडच्या कथेने आकार घेतला, असे आपले मत कार्ल लाखमान याने मांडले होते आणि या मताचा प्रभाव काही काळ होताही. तथापि मुळात स्वतंत्र असलेल्या दोन कथांची गुंफण या महाकाव्यात केली असल्याचे हॉइस्लरने दाखवून दिल्यानंतर लाखमानचे मत मागे पडले आहे. या दोन कथांपैकी पहिली ब्रूनहिल्डची आणि दुसरी बर्गंडियनांच्या पराभवाची. प्राचीन नॉर्स साहित्यात ब्रूनहिल्डची कथा स्वतंत्रपणे आलेली आहे आणि तेथे तिच्या व्यक्तिरेखेला महत्त्वाचे स्थान आहे. या कथेत सीगफ्रीड हा सिग्गुर्ड या नावाने आणि एक दुय्यम व्यक्तिरेखा म्हणून येतो. नीबलुङ्‌गलीडमध्येही ब्रूनहिल्डचा ग्यूंटरशी विवाह झाल्यापासून सीगफ्रीडच्या वधाचा कट शिजेपर्यंत सीगफ्रीडचे अस्तित्व जाणवत नाही.

बर्गंडियनांच्या पराभवाची कथा आइसलँडिक एडडांपैकी पोएटिकएडडाच्या दुसऱ्या भागात (यात प्राचीन जर्मानिक वीरपुरुषांसंबंधीची गीते आहेत) सापडते. इ. स. ४३७ मध्ये हुणांनी बर्गंडियनांचा पराभव केला होता, या ऐतिहासिक घटनेपासून आधार आणि स्फूर्ती घेऊन काही गीते रचिली गेली आणि त्यांचेच एक रूप पोएटिकएडडात आलेले आहे. अशा गीतांत इतिहासाचे फक्त काही धागेच उरले. इ. स. ४५३ मध्ये ॲटिला अकस्मात मरण पावला, त्या वेळी हिल्डिको ही एक जर्मानिक वंशीय रखेली त्याच्याजवळ होती, हाही इतिहासाचा एक धागा. या धाग्यातून एक आख्यायिका विणली गेली ती अशी ॲटिलाचा ग्रिमहिल्ड (क्रीमहिल्ड) या बर्गंडियन राजकन्येशी विवाह झालेला होता. बर्गंडियनांची संपत्ती मिळविण्याच्या हेतूने ॲटिलाने तिच्या भावांना आपल्या दरबारी बोलावले आणि कपटाने ठार केले. त्याचा सूड ॲटिलाचा खून करून ग्रिमहिल्डने घेतला. या आख्यायिकेवर आधारित असे एक फ्रँकिश काव्य इ. स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात झाल्याचे मानतात. कालांतराने या आख्यायिकेत थोडा पण महत्त्वाचा असा बदल झाला. ‘पतीच्या वधासाठी भावांचा सूड ग्रिमहिल्डने घेतला’, अशी ती आख्यायिका झाली. हा बदल बहुधा बव्हेरियनांनी घडवून आणला असावा. ॲटिलाला ते इतरांप्रमाणे रानवट समजत नव्हते.

दोन वेगवेगळ्या कथांतून एकात्म महाकाव्य घडविण्याचा कसोशीचा प्रयत्न नीबलुङ्‌गलीडच्या कर्त्याने केलेला आहे. हे काम अवघड होते कारण ब्रूनहिल्डच्या कथेतले वातावरण उघड उघड परीकथेचे आहे, तर क्रीमहिल्डच्या दुःखाची आणि सूडाची कहाणी मुख्यतः हाडामासाच्या मानवी जगातली आहे. याचा एक परिणाम असा, की महाकाव्याचा उत्तरार्ध त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक वजनदार वाटतो. सीगफ्रीडच्या वधाला निमित्त देऊन दूर झालेली ब्रूनहिल्ड स्मरणात रहात नाही क्रीमहिल्डच्या सूडाची अदम्य भावनाच महाकाव्य व्यापीत जाते. तिच्या व्यक्तिरेखेसमोर ताकदीने उभा राहतो फक्त हागेन. स्वामिनिष्ठा हे एकमेव मूल्य मानणारा शूर हागेन सीगफ्रीडचा वध करूनही एक सामान्य खलनायक ठरत नाही उलट एत्सेलच्या राजवाड्यात क्रीमहिल्ड आपल्या सूडासकट हळूहळू एकाकी पडत जाते आणि अखेरीस हिल्डेब्रांडच्या हातून तिचा शिरच्छेद होतो.

जर्मानिकांची जीवनमूल्ये आणि त्यांच्या संरक्षणार्थ एक प्रकारच्या आदिम जोमाने झगडण्याची त्यांची वृत्ती नीबलुङ्‌गलीडमधून प्रतिबिंबित झालेली आहे. अत्यंत ताठ कण्याची आणि तडजोड नाकारणारी माणसे येथे आहेत. हे महाकाव्य लिहिले गेले, तो काळ दरबारी-शिलेदारी रोमान्सलेखनाचा होता व त्या वस्तुस्थितीचा काही परिणाम या महाकाव्यावरही जाणवत असला, तरी ते रोमान्सच्या पठडीतले नव्हे. ते वीरकाव्याच्या परंपरेतीलच आहे. क्रीमहिल्डसारखी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आरंभी एखाद्या रोमान्सच्या नायिकेसारखी भासली, तरी हळूहळू हे रंग पालटत जातात ती एक निखळ, निष्ठुर स्त्री होते. तसे काही ख्रिस्ती तपशीलही त्यात आहेत, पण त्याचा गाभा आणि एकंदर स्वरूप धार्मिक नाही. त्याचा सूर जर्मनिकांच्या वीरयुगाशी – स्थलांतर काळाशी – जुळणारा आहे.

ग्रीकांचे जसे इलिअड तसे जर्मनांचे नीबलुङ्‌गलीड. अनेक उत्तरकालीन साहित्यिकांना त्याने स्फूर्ती दिलेली आहे. फ्रीड्रिख हेब्‌बेल (१८१३–६३) याने डी नीबलुङ्‌गेन हे आपले त्रिनाट्य त्यावर आधारलेले आहे. रिखार्ट व्हाग्नर (१८१३–८३) याने त्यावर चार संगीतिकांची एक माला लिहिली आहे.

कुलकर्णी, अ. र.