नीस्तर नदी : यूरोपीय रशियाच्या युक्रेन प्रजासत्ताकातील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी १,३५० किमी. उपनद्यांसह पाणलोटक्षेत्र ७२,००० चौ. किमी. हिमाच्छादित कार्पेथियन पर्वताच्या उत्तर उतारावर उगम पावून उत्तरेकडील व्हॉलिन – पोडोल्यन उंचवट्याचा भाग आणि दक्षिणेकडील कार्पेथियन पर्वत व बेसारेबियन उंचवट्याच्या प्रदेशांमधून वायव्य – आग्नेय दिशेने वाहते व ओडेसा बंदराच्या नैर्ऋत्येस ३२ किमी.वर काळ्या समुद्रावरील नीस्तर ल्यिमान या लांबट, उथळ खारकच्छाला अनेक मुखांनी मिळते. नीस्तरच्या स्ट्री, स्व्हिचा, लॉम्न्यित्स, बिस्त्रीत्स, रेऊत, बिक, बॉत्न ह्या उजवीकडून तर झलताइअल्यीप, स्ट्रिप, सिऱ्येत, स्मत्रीच, उशित्सा व मुराफा या डावीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या होत. नदीखोऱ्यातील हवामान मुख्यतः दमट असून उन्हाळे उबदार असतात. कार्पेथियन पर्वतात आणि काळ्या समुद्रकिनाऱ्यावर वार्षिक सरासरी अवक्षेपण अनुक्रमे १०० ते १२५ सेंमी. व ५० सेंमी. असते. अटलांटिक महासागरावरील पश्चिमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसामुळे आणि बर्फ वितळल्यामुळे नदीला पूर येऊन नदीखोऱ्याचे बरेच नुकसान होते. निझ्नी गावापासून उगमाकडील २७४ किमी.चा पहिला, निझ्नी ते डूबसारी ७२४ किमी.चा दुसरा आणि डूबसारी ते नदीमुखापर्यंतचा ३३८ किमी.चा तिसरा असे नदीप्रवाहाचे तीन टप्पे असून उगमाकडील ४८ किमी. चा नदीप्रवाह पर्वतरांगेतील खोल निदऱ्यांतून वाहतो. डूबसारीपासून नदीमुखाकडे नदीचे पात्र क्रमाक्रमाने रुंद होत जाते. तर बिंद्येरीपासून पुढे पात्रात लहानलहान सरोवरे व बेटे तयार झाली आहेत.
समुद्राचे पाणी नदीमुखातून आत शिरून ४३ किमी. लांबीची व जास्तीतजास्त ११ किमी. रुंदीची नदीमुखखाडी निर्माण झाली आहे. मुखापासून रझ्व्हाझिपर्यंत सु. १,२०० किमी. नदीचे पात्र नौसुलभ असले, तरी ब्येलमॉस्कपर्यंत प्रवासी व मालवाहतूक नियमित चालते. लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठीही नदीचा उपयोग केला जातो. कधीकधी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत नदीतील पाणी गोठते. नदीखोऱ्यातील गहू, ओट, बार्ली, बीट, कापूस, बटाटे, द्राक्षे ही प्रमुख उत्पादने असून द्राक्षापासून दारू गाळण्याचाही उद्योग चालतो. या नदीत कार्प, व्हाइट फिश, पाइक, पर्च, सॅमन, स्टर्जन इ. प्रकारचे मासे सापडतात.
या नदीखोऱ्यात दाट लोकवस्ती असून लाव्हॉव्ह, टर्नोपल, स्टन्यिस्लाफ, किशिनेव्ह ही खोऱ्यातील प्रमुख शहरे होत. डूबसारी येथे १९५४ मध्ये बांधलेला जलाशय आणि ५० हजार किवॉ. क्षमतेचे जलविद्युत् केंद्र आहे. १९७० मधील योजनेनुसार काम्यिंक, यांपल, मगील्यॉफ – पडॉल्स्की, झ्वांचिक व युनिझ या पाच ठिकाणी एकूण २३ लक्ष किवॉ. क्षमतेची जलविद्युत्केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
चौधरी, वसंत