निळवेल : (काळी झिरकी, काळा दाणा, नीलपुष्पी हिं., गुं. कालाधना गु. कालो कुंपो सं. कृष्णबीज, श्यामबीज क. गणरीबीज इं. इंडियन जलाप, मॉर्निंग ग्लोरी लॅ. आयपोमिया निल कुल कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). आयपोमिया वंशातील आणखी तीन-चार जातींना (आ. पामेटा, आ. पुर्पुरिया, आ. व्हायोलॅसिया, आ. लिअरी ) मॉर्निंग ग्लोरी या इंग्रजी नावाने ओळखतात. त्यामुळे मराठीतही त्यांना निळवेल म्हणतात. आ. पर्गा (जलाप) व आ. निल या दोन वनस्पतींचे औषधी गुणधर्म सारखे आहेत, असे एच्. सांतापाव यांनी नमूद केले आहे. त्यावरून आ. निल या जातीस ‘इंडियन जलाप’ हे इंग्रजी नाव पडले आहे. आ. हेडेरॅसिया, आ. निल आणि आ. पुर्पुरिया यांमध्ये बरेच साम्य असल्याने त्यांना परस्परांपासून निराळे ओळखणे कठीण असल्याचे डी. व्ही. कॉवन यांचे मत आहे. आ. निल (रॉथ.) व आ. हेडेरॅसिया (जॅक.) ही दोन्ही नावे एकाच वनस्पतीची असल्याचा चुकीचा उल्लेख आढळतो. आ. पामेटा  [→ गारवेल] या जातीस इंग्रजीत ‘रेल्वे क्रीपर’ म्हणतात मॉर्निंग ग्लोरी नव्हे. पुढील वर्णन आ. निल (रॉथ.) किंवा आ. हेडेरॅसिया (ऑक्ट.) वनस्पतीचे आहे.ही साधारण केसाळ, एक वर्षभर वा अधिक वर्षे जगणारी ओषधीय [→ ओषधि] वेल भारतात सर्वत्र असून हिमालयात सु. १,८०० मी. उंचीपर्यंत आढळते. ती कुंपणावर कोठेही पसरलेली आढळते व बागेत शोभेकरिता लावतात. आ. हेडेरॅसिया (जॅक.) ही उ. अमेरिकेतील जाती भारतात फक्त बागेतच आढळते ती आणि आ. हेडेरॅसिया (ऑक्ट.) या एक जाती नव्हेत. निळवेलीची पाने साधी एकाआड एक, त्रिखंडी, अंडाकृती–हृदयाकृती आणि ५–१२ सेंमी. रुंदीची असतात. फुले मोठी, ३–५ सेंमी. व्यासाची, नसराळ्यासारखी, फिकट लालसर छटा असलेली आणि गर्द निळी असून १–५ फुलांच्या चवरीसारख्या वल्लरीवर [→ पुष्पबंध] पानांच्या बगलेत येतात. बोंड (फळ) गोलसर लांबट, लहान, गुळगुळीत असून त्यात चार ते सहा, काळ्या करड्या, लांबट (०·०६–०·०८ सेंमी.) बिया असतात इतर सामान्य लक्षणे ⇨ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात (हरिणपदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. बिया बाजारात ‘काळा दाणा’ या नावाने विकत मिळतात. त्या प्रथम गोड पण नंतर तिखट लागतात व नकोशा वाटतात. त्या स्वस्त व उत्तम रेचक आहेत त्यामुळे पित्त, कफ व जंत पडतात. अधिक प्रमाणात घेतल्यास प्रक्षोभक (आग करणाऱ्या) व विषारी आहेत. ताजी फळे भाजीकरिता वापरतात बिया जलाप नावाच्या औषधाऐवजी (एक्झोगोनियम पर्गा) रेचक म्हणून वापरतात. जलाप हे आ. पर्गा या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण असते. निळवेल बिहारमध्ये उसाच्या मळ्यात तणासारखी वाढते, त्यामुळे २०–२५% उत्पन्न घटते. ॲग्रोझोन (१%), फेर्नोझोन (०·१–०·२%) व फिनॉल–झायलीन ३० [फेनॉक्सिलीन ३० (०·३–०·६%)] हेक्टरी १,१०० लि. फवारल्यास या तणाचा नाश होतो, असे दिसून आले आहे. काळा दाणा बियांत तुळस, आयपोमियाच्या इतर जाती, बाभूळ, सनताग व हरमल यांच्या बियांची भेसळ करतात. बियांच्या शुद्ध नमुन्यात १४–१५% रेझीनयुक्त द्रव्य असते तेच तिखट–कडू असून दुर्गंधी व किळसवाणे असते. याशिवाय बियांत पिवळट स्थिर तेल (१२·४%) आणि सूक्ष्म प्रमाणात सॅपोनीन, टॅनीन व श्लेष्म (बुळबुळीत) द्रव्य असते. फुलांत अँथोसायनीन रंजकद्रव्ये असतात.

निळवेल (आयपोमिया निल) : फुलांसह फांदी

निळवेलीच्या वर उल्लेख केलेल्या जातींपैकी दुसरी एक जाती (आयपोमिया पुर्पुरिया ) काहीशी केसाळ, शाखायुक्त, ओषधीय व एक वर्ष जगणारी वेल असून ती मूळची अमेरिकेच्या उष्ण भागातील आहे. तथापि भारतात ती सामान्यपणे सर्वत्र व हिमालयात सु. २,००० मी. उंचीपर्यंत आढळते शोभेकरिता बागेतही लावतात. हिची पाने रुंदट, अंडाकृति–हृदयाकृती आणि अखंड असतात. फुले साधारणपणे वर वर्णन केलेल्या जातीप्रमाणे गर्द जांभळी असतात बोंड गोलसर, दोन कप्प्यांचे, टोकदार व गुळगुळीत असून त्यात चार, काळसर तपकिरी, लांबट व त्रिकोणी बिया असतात. नवीन लागवड बियांपासून होते व वाढ जलद होते. भिंतीवर, कमानीवर, कुंपणावर चढवून शोभा वाढविता येते. आफ्रिकेतील झुलू लोक या वनस्पतीचा उपयोग रेचक व उपदंशकारक म्हणून करतात. साधारणपणे पावसाळ्यानंतर हिला फुले येतात व थंडीच्या मध्यास फळे येऊन नंतर वेल वाळून जाते. फुलांच्या रंगाप्रमाणे भिन्न प्रकार आढळतात काही प्रकारांत पाने अखंड तर काहींत खंडयुक्त असतात. (चित्रपत्र ५३).

संदर्भ : 1. Cowen, D. V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1957.           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.

निळवेल (आयपोमिया पु्र्पुरिया : (१) फुलासह फांदी, (२) फुलोरा, (३) फूल, (४) फळ, (५) तडकलेले बोंड, (६) बीज.