निर्यात आयात बँक :(एक्स्पोर्ट इंपोर्ट बँक–एक्झिंबँक). आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे कार्य करणारी अमेरिकाच्या संयुक्त संस्थानांची एक वित्तसंस्था. १२ फेब्रुवारी १९३४ मध्ये ‘एक्स्पोर्ट इंपोर्ट बँक ऑफ वॉशिंग्टन’ या नावाने अमेरिकेच्या निर्यात व्यापारास अर्थसाहाय्य करण्याच्या उद्देशाने हिची स्थापना करण्यात आली. १३ मार्च १९६८च्या कायद्यान्वये संस्थेचे नाव बदलण्यात येऊन ते सध्याचे ठेवण्यात आले व तिची मुदत ३० जून १९७३ पर्यंत वाढविण्यात आली. १९७१ मधील कायद्यानुसार बँकेचे कार्यक्षेत्र विस्तारण्यात येऊन तिची मुदत ३० जून १९७४ पर्यंत वाढविण्यात आली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी नेमलेल्या पाच संचालकांच्या मंडळाद्वारा बँकेचे व्यवस्थापन चालते.

निर्यात आयात बँक ही प्रत्यक्ष दीर्घमुदती कर्जे, हमी (मुख्यतः व्यापारी बँकांसाठी), अल्प-व मध्यम-मुदती विमा आणि व्यापारी बँकांना हुंडी कर्जे पुरविणे अशा प्रकारचे महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडते. अमेरिकेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा यांची परदेशी ग्राहकांकडून केली जाणारी खरेदीही बँकेच्या डॉलरसाहाय्यामुळे शक्य होते. या साहाय्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते : सार्वजनिक वा खाजगी उद्योगसंस्थांना भांडवली सामग्री व तज्जन्य सेवा यांच्या खरेदीसाठी लागणारे दीर्घमुदती कर्ज, परदेशी वित्तसंस्था स्थानिक उद्योगधंद्यांना पुनर्वित्तस्वरूपात उपलब्ध करून देत असलेल्या कर्जाऊ रकमा, अमेरिकेशी व्यापारस्त्रोत चालू राहण्यासाठी डॉलरटंचाईच्या प्रासंगिक अडचणीत सापडलेल्या राष्ट्रांना आवश्यक असे कर्ज पुरविणे आणि शेतमालखरेदीसाठी लागणारी कर्जे. उपर्युक्त कार्यक्रमांद्वारा निर्यात आयात बँक ही अर्धविकसित व विकसनशील देशांमधील विकास प्रकल्पांना उत्तेजन देण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असते.

निर्यात आयात बँकेचे कर्जवाटप व कर्जफेड ही दोन्ही डॉलरमध्येच करण्यात येत असून ती विशिष्ट हेतूनुसार असतात. खाजगी भांडवलाची स्पर्धक म्हणून नव्हे, तर त्यांची प्रोत्साहक व पूरक  म्हणून राहण्याचे कार्य बँकेला करावे लागते. बँकेला कर्जे, हमी आणि विमा यांच्या स्वरूपात दोन कोटी डॉलरहून अधिक अदत्त रक्कम ठेवता येत नाही. या कर्जांकरिता व अन्य कारणांसाठी उपयोगात आणावयाचा पैसा पुढील बाबींमधून जमा होऊ शकतो : (१) मुद्दलाची परतफेड व कर्जाऊ रकमांवरील व्याज (२) हमीशुल्क व विमाहप्ते (३) अमेरिकन सरकारच्या २,००० कोटी डॉलर भागभांडवलापासून मिळणारे उत्पन्न (४) अमेरिकेच्या अर्थखात्याकडून ६०० कोटी डॉलरपर्यंत मिळणारे कर्ज आणि (५) बँकेची ऋणपत्रे, वचनपत्रे इत्यादींच्या विक्रीतून उपलब्ध होणारे उत्पन्न.

गद्रे, वि. रा.