परिव्यय लेखांकन: वस्तू व सेवा यांच्या निर्मितीवर आणि वितरणावर होणाऱ्या परिव्ययाचे विश्लेषण करून निरनिराळ्या कार्यांसाठी, प्रक्रियांसाठी किंवा विभागांसाठी लागणाऱ्या परिव्ययाची निश्चिती करण्याचे तंत्र व पद्धती. परिव्यय निश्चितीचे हे तंत्र वेगवेगळ्या उद्योगधंद्यांसाठी किंवा व्यवसायांसाठी निरनिराळ्या प्रकारचे असू शकते परंतु त्यासाठी विश्लेषणाची विशिष्ट तत्त्वे निश्चित करावी लागतात. या तत्त्वांचे विशादीकरण आणि परिस्थित्यनुरूप त्यांचा योग्य वापर याचे दिग्दर्शन व ऊहापोह करण्याची जबाबदारी परिव्यय लेखांकनाकडे येते.

कार्ये: (१) कोणत्याही संस्थेचा आय व परिव्यय यांची निश्चिती व विश्लेषण करणे. असे केल्याने संस्थेच्या निरनिराळ्या विभागांची कार्यक्षमता व तीमध्ये वेगवेगळया कालखंडांत होणारा फरक यांची तुलना करणे शक्य होते. मात्र त्यासाठी संस्थेचे विभाग, उपविभाग, प्रक्रिया, कार्ये, निर्मितपदार्थ वा सेवा, विक्री वा वाटप, प्रदेश, मागणी, ग्राहक इ. घटकांसंबंधी आय व परिव्यय यांची सविस्तर आणि निश्चित आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक असते. (२) परिव्यय नियंत्रणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी गोळा करून तिचा योग्य वापर करणे. या कार्याचा मूळ उद्देश अत्यंत कार्यक्षम क्रियापद्धतींचा अवलंब करून परिव्यय शक्य तितका कमी करता यावा, हा असतो. खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा, म्हणून खर्चातील प्रत्येक बाबीची छाननी होणे आवश्यक असते. हे उद्दिष्ट साधण्याकरिता लवचिक अशा अंदाजपत्रकांचा वापर करून संस्थेच्या कार्याचे नियोजन करावे लागते व प्रत्येक विभाग,काम, कामगारसमूह, कामगार आणि उत्पादित वस्तू (वा सेवा) यांसाठी सामग्री, मजुरी व वरकड खर्च कितपत असावा, यांसंबंधी काही प्रमाणे वापरावी लागतात. (३) आय व परिव्यय यांची जुळवणी करणे. व्यवस्थापन विभागाला त्यासाठी दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी संस्थेच्या विविध कार्यक्षेत्रांतील आय-परिव्ययांचा आढावा घ्यावा लागतो. असे करताना निर्मितीवर केलेला सर्व खर्च वस्तूंची विक्री होईपर्यंत झाल्यानंतरच त्या खर्चाचा संबंधित वस्तूसाठी केलेल्या परिव्ययात समावेश केला जातो. (४) व्यवस्थापकांना योजना तयार करण्यासाठी व धोरणे आखण्यासाठी उपयुक्त असणारे परिव्ययाचे अन्वेषण व विशिष्ट प्रश्नांचा सखोल अभ्यास करणे. नवीन वस्तूंच्या किंमती निश्चित करणे, संस्थेचा विस्तार वा संकोच करणे, यंत्रसामग्रीचे नूतनीकरण साधणे, वस्तूंच्या वितरणासाठी वापरलेल्या पद्धतीत बदल करणे यांसारख्या विशिष्ट प्रश्नांसंबंधी निर्णय घेण्यापूर्वी उच्च स्तरावरील व्यवस्थापकांना परिव्यय लेखा पद्धतीने केलेल्या अन्वेषाच्या निष्कर्षांची दखल घ्यावी लागते.

वित्तीय लेखांकन व परिव्यय लेखांकन: परिव्यय लेखापद्धती अस्तित्वात येण्यापूर्वी केवळ वित्तीय लेखांकन पद्धतीच प्रचारात होती. ह्या पद्धतीने संस्थेचे वित्तीय व्यवहार कालक्रमानुसार निरनिराळ्या लेखापुस्तकांत नोंदले जात आणि वर्षाच्या अखेरीस त्यांवर काही लेखाकर्म प्रक्रिया करून संस्थेची आर्थिक स्थिती दर्शविणारे आयव्यय पत्रक किंवा नफातोटा पत्रक तयार करून संस्थेचा तोळेबंदही तयार केला जाई. त्यावरून संस्थेच्या मालमत्तेत, भांडवलात व कर्जात काय फरक झाला, याची कल्पना व्यवस्थापकास व मालकास करता येत असे. ह्या पद्धतीद्वारा बनविलेल्या लेखापत्रकांच्या आधारे व्यवस्थापकांना उत्पादन, भांडवलपुरवठा, वितरण व प्रशासन या क्षेत्रांचे सर्व सर्वसाधारणपणे नियमन करणे शक्य होत असले, तरी त्यांच्यापुढील अनेक समस्यांना वित्तीय लेखांकनपद्धती वापरून निश्चित उत्तरे सापडणे शक्य होत नसे. परिव्ययाची व आर्थिक व्यवहारांची ऐतिहासिक रीत्या व बिनचूकपणे नोंद करण्यावरच वित्तीय लेखांकनाचा भर विशेषेकरून होता. त्यामुळे परिव्ययाचे विश्लेषण करून मिळणारी सविस्तर आकडेवारी व्यवस्थापकांना सातत्याने उपलब्ध होत नसे. अशा आकडेवारीच्या अभावी निरनिराळ्या कार्यक्षेत्रांच्या क्षमतेची वेळोवेळी तुलना करता येणे अशक्य होई. शिवाय उद्दिष्टे गाठण्यासाठी जे पर्यायी मार्ग असत, त्यांची परिव्यय व संभाव्य नफ्याच्या दृष्टीने तुलना करून सर्वांत फायदेशीर असलेल्या मार्गाची निवड करण्यातही व्यवस्थापकांना अडचणी येणे साहकिच होत. परिव्ययाचे सविस्तर विश्लेषण केलेले नसल्यामुळे खर्च कोठे वाजवीपेक्षा जास्त होत आहे, काटकसर कोठे व कितपत करता येणे शक्य आहे, कोणत्या बाबीवरील खर्च वाढविणे अधिक फायदेशीर होईल, असे व्ययस्थापकांपुढील प्रश्न सोडविण्यास वित्तीय लेखांकन पद्धती असमर्थ होती. नेमक्या याच कारणासाठी परिव्यय लेखा पद्धतीचा उदय झाला व जसजशी तिची उपयुक्तता पटू लागली, तसतसा तिचा प्रचार व वापर प्रकर्षाने होऊ लागला. परिव्यय लेखांकन केवळ व्यवस्थापकांनाच नव्हे तर श्रमिकवर्ग, बँका व इतर धनकोवर्ग, ग्राहकवर्ग व सामान्य जनता या सर्वांना उपयुक्त असल्यामुळेच लेखापालांना आणि त्यांच्या व्यवसायाला आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थेत विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

परिव्यय लेखापद्धती व्यवस्थापकांना अनेक मार्गांनी उपयोगी पडते. आय आणि परिव्यय यांचे शक्य तितक्या विविध रीत्या विश्लेषण करून लेखापाल व्यवस्थापकीय नियमनासाठी लागणारी सर्व प्रकारची आकडेवारी व्यवस्थापकांना उपलब्ध करून देतो. या पद्धतीमध्ये उत्पादनसामग्री व पुरवठा यांचे विभागवार, प्रक्रियावार आणि वस्तुगणिक विभाजन कसे केले जाते, यांवर लक्ष पुरविण्यात येते. या विभाजनावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी सामग्री आणि पुरवठा यांची प्रत्येक प्रक्रिया केंद्रावरील आवकजावक नोंद करणारी पद्धत अंमलात आणणे, हे परिव्यय नियंत्रणाचे एक अत्यावश्यक अंग मानले जाते. ही सामग्री जसजशी पुढे सरकते, तसतशी तिची सविस्तर नोंद होत गेल्याने निर्माण पद्धतीमधील उणिवा उघडकीस आणल्या जाऊन त्या दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्णय घेणे व्यवस्थापकांना सुलभ होते. कामगारांवरील वेतनखर्चाचे योग्य नियमन करण्याची जबाबदारीही व्यवस्थापकांवर असते. ती पार पाडण्यासाठी काम, क्रिया, मजूर यांनुसार वेतनाचे दर किती द्यावे लागतात तसेच त्या त्या कामासाठी आणि क्रियेसाठी मजुराला किती कालावधी खर्च करावा लागतो, याची लेखापाल निश्चिती करतात. त्यामुळे निरनिराळ्या श्रमिकांची कार्यक्षमता मोजणे शक्य होते, वेतनाचे प्रमाणित दर ठरविता येतात व उत्पादनास प्रोत्साहन कसे द्यावे, हे समजू शकते. प्रत्येक क्रियेसाठी, कामासाठी व मजुरासाठी करावा लागणारा परिव्यय चटकन ध्यानी येत असल्याने वस्तूच्या दर एककासाठी श्रमिकावर करावा लागणारा परिव्यय किती, हे स्पष्ट होते. ह्या सर्व आकडेवारीचा उपयोग करून व्यवस्थापकांना श्रमिकांची उत्पादकता मोजता येते.परिव्यय लेखापद्धतीमुळे प्रत्यक्ष खर्च (सामग्रीवरील व मजुरीवरील) व वरकड खर्च यांची अलग विभागणी केले जाते. वरकड खर्चाची पुन्हा नियमन करण्याजोगा व नियमनबाह्य अशी विभागणी केल्यास नियमन करण्याजोगा खर्च आटोक्यात ठेवण्यावर प्रयत्न केंद्रित करणे सोपे जाते. परिव्यय लेखांकनाचा वापर व्यवस्थापनक्षेत्रातील जबाबदारी व प्राधिकार यांचे निरनिराळ्या स्तरांवरील व्यक्तीमध्ये वाटप करण्यासाठी प्रमाणे निश्चित करताना केला जातो. अशा रीतीने केलेले प्रत्यायोजन यशस्वी व्हावयाचे असेल, तर प्रत्यायोजित जबाबदारीचे पालन कितपत होत आहे किंवा झाले आहे, याची मोजणी करता आली पाहिजे व तिची सोपविलेल्या प्रमाणित जबाबदारीशी तुलना करता आली पाहिजे. परिव्यय लेखापद्धतीमुळे निरनिराळ्या कामगिरीसाठी व जबाबदारीसाठी प्रमाणे शोधून काढणे शक्य होते व म्हणून आधुनिक व्यवस्थापनतंत्रात तिला विशेष महत्त्व आले आहे. अशाच प्रमाणांपैकी अंदाजपत्रक हे एक नियोजित प्रमाण असते. ते तयार करताना उपलब्ध आकडेवारीच्या आधारे सामग्रीवेळ, श्रमिक शक्ती, खर्च इत्यादींविषयी अंदाज करून एक प्रमाणित कार्यक्रम तयार करता येतो व तो अंमलात आणण्याची जबाबदारी संघटनेतील विशिष्ट केंद्राकडे सोपविता येते. कार्यक्रमांची अथवा योजनेची अंमलबजावणी जसजशी होत जाते, तसतशी प्रत्यक्ष झालेल्या कामगिरीचे मोजमाप घेऊन त्याची तुलना मूळ अंदाजपत्रकीय कार्यक्रमातील तपशिलाशी करता येते व जरूर ते फेरफार करण्यासंबंधी आदेश देता येतात. वस्तूंच्या किंवा सेवांच्या विक्री–किंमती निश्चित करण्यासाठी, संस्थेचे व्यवसायक्षेत्र वाढविण्यासाठी व संस्थेने ठरविलेल्या धोरणाची अंमलबाजावणी करण्यासाठी व्यवस्थापकांना परिव्यय लेखापद्धतीचा अतिशय उपयोग होतो. केवळ व्यवस्थापक व मालक यांनाच नव्हे, तर श्रमिकांना देखील परिव्यय लेखांकनाचे फायदे मिळू शकतात. प्रोत्साहन पद्धतीचा वापर करून वेतननिश्चिती केल्यास श्रमिकांना मिळणारी प्राप्ती त्यांच्या उत्पादनाशी निगडित होते व त्यामुळे त्यांचा फायदा होतो. शिवाय परिव्यय लेखापालांनी तयार केलेल्या माहितीच्या व आकडेवारीच्या आधारे व्यवस्थापक श्रमिकांच्या बढतीचे योग्य निर्णय घेऊ शकतात. परिव्यय लेखापद्धतीमुळे उद्योगसंस्थेचा विकास होण्यास मदत होते व श्रमिकांना त्यांच्या योग्यतेनुसार जादा वेतन मिळणे शक्य होऊन त्यांच्या संस्थेवरील निष्ठेत भर पडते. बऱ्याच उद्योगसंस्थांचे हितसंबंध त्या ज्यांना उधारीवर माल पुरवितात वा कर्जे देतात, अशा व्यावसायिकांच्या स्थैर्यावर व उत्कर्षावर अवलंबून असतात.अशा रीतीने माल पुरविताना व कर्जे देताना त्या त्या संस्थेविषयी लेखापालांना पुरविलेली माहिती संस्थाचालकांना अत्यंत उपयोगी पडते. त्याचप्रमाणे कंपन्यांमधून भांडवल  गुंतविणारेसुध्दा लेखापालांच्या अहवालानुसार त्या त्या कंपनीच्या स्थैर्याविषयी आपापले अंदाज बांधू शकतात व त्या अंदाजानुसार आपली भांडवलगुंतवणूक करण्यास उद्युक्त होतात. परिव्यय लेखांकनाचा अप्रत्यक्ष फायदा सामान्य जनतेलादेखील मिळतो कारण परिव्यय लेखापद्धतीमुळे उत्पादन व वितरण परिव्ययांत काटकसर करता येऊन वस्तू व सेवा ग्राहकांना कमी किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होते.

थोडक्यात, परिव्यय लेखांकनतंत्र प्रामुख्याने उत्पादन, वितरण व प्रशासन यांसंबंधीच्या खर्चाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण करते, विविध परिव्यय केंद्रांचे नियमन करण्याचे मार्ग शोधून काढते, परिव्ययाची प्रमाणे ठरविण्यास मदत करते आणि नियोजित कार्यक्रमांची अंमलबजावणी निश्चित केलेल्या प्रमाणांनुसार होण्यासाठी आवश्यक ती कारवाई कशी करावी, हे सुचविते. कार्यक्षम व्यवस्थापनाचे एक मूलभूत साधन म्हणून परिव्यय लेखांकनाचा उपयोग करता येतो. म्हणूनच अलीकडे सर्व औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रांत त्याचा विस्तृत प्रमाणावर वापर होऊ लागला आहे व प्रशिक्षित परिव्यय लेखापालांना विशेष मागणी येऊ लागली आहे.

संदर्भ: 1. Blockev, J. G. Weltmer, W. K. Cost Accounting , New York, 1954.

2. Swaminathan, L. Lectures on Costing, New Delhi, 1970.

धोंगडे, ए. रा.