निर्मोचन : प्राण्यांच्या शरीरावरील बाह्य आवरण –मग ते त्वचेचे, केसांचे किंवा पिसांचे असो अथवा शिंगे असोत– गळून पडण्याच्या अथवा काढून टाकण्याच्या क्रियेला निर्मोचन अथवा कात टाकणे म्हणतात. निघून गेलेल्या आवरणाच्या जागी नवे आवरण तयार होते. कित्येक प्राण्यांच्या बाह्य आवरणाचा, पिसांचा किंवा केसांचा नाश व त्यांचे पुनरुत्पादन सतत होत असते पण पक्षी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे प्राणी) आणि पुष्कळ अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणारे) प्राणी यांच्या त्वचेच्या बाहेरच्या स्तराची दुरुस्ती नेहमी केली जात नाही या त्याचे पुनरुद्‌भवनही सतत होत नाही. त्याऐवजी काही ठराविक काळाने एक अगदी नवे व संपूर्ण आवरण तयार होते व पूर्वीचे निघून जाते.

संधिपाद संघातील (आर्थ्रोपोडा) प्राणी कात टाकतात पण ही प्रक्रिया पृष्ठवंशी प्राण्यांच्या निर्मोचनाहून वेगळी असते. सगळ्या संधिपादांच्या शरीरावर कठीण बहिःकंकाल (बाह्य सांगाडा) असतो व त्याच्यामुळे शरीराची वाटेल तितकी वाढ होऊ शकत नाही. कारण हा बहिःकंकाल एकदा तयार झाल्यावर वाढून मोठा होत नाही. तो थोडा ताणला जातो म्हणून संधिपादांची वाढ होत असताना शरीरावरील उपत्वचा अधूनमधून काढून टाकली जाते आणि तिच्या जागी नवी तयार होऊन ती कठीण होण्यापूर्वी प्राण्याच्या शरीराची वाढ होते.

क्रस्टेशिया (कवचधारी) वर्गातील प्राणी वाढ होत असताना अनेक वेळा कात टाकतात. शेवंड्याला प्रौढ दशा येण्यास सु. चार वर्षे लागतात. विकासाच्या या काळात तो सु. २५ वेळा कात टाकतो. प्रौढ दशा आल्यावरही शेवंड्याचे कात टाकणे चालू असते. नर बहुधा वर्षातून दोनदा आणि मादी वर्षातून फक्त एकदा कात टाकते. कात टाकण्यापूर्वी शेवंडा अन्न खाणे बंद करतो व एखाद्या निवांत स्थळी जातो. निर्मोचन क्रियेची सुरुवात जिवंत कोशिकामय (पेशीमय) बाह्यत्वचा खाली दबून तिच्यावर असणाऱ्या उपत्वचेपासून वेगळी होण्याने होते. बाह्यत्वचा लगेच नवी उपत्वचा उत्पन्न करण्यास सुरुवात करते. दरम्यान बाह्यत्वचा-

कोशिकांच्या स्त्रावाने उत्पन्न झालेला द्रव पदार्थ–निर्वाचन-द्रव–जुन्या आणि नव्या उपत्वचेच्या मधल्या जागेत गोळा होतो आणि त्याच्या क्रियेने जुन्या उपत्वचेच्या आतल्या स्तरांचे पचन होते. अखेरीस हा निर्मोचन-द्रव बाह्यत्वचा शोषून घेते आणि अशा प्रकारे जुन्या उपत्वचेचे पचलेले बरेच घटक शरीरात परत येतात. शिल्लक राहिलेल्या जुन्या उपत्वचेला पाठीवर ठराविक ठिकाणी चीर पडून प्राणी तीतून बाहेर पडतो. नवी उपत्वचा मऊ व लवचिक असते. शेवंडा पिता येईल तितके पाणी पितो व त्यामुळे त्याच्या शरीराचे आकारमान बरेच वाढून उपत्वचा ताणली जाते व काही तासांतच ती कठीण होते.

कीटक : कीटकांच्या शरीरावरील बहिःकंकाल चिलखतासारखा कठीण व मजबूत असतो म्हणून फक्त कात टाकल्यावरच त्यांचा आकार बदलू शकतो आणि आकारमानात वाढ होऊ शकते. कीटकाला प्रौढ दशा आल्यावर तो कात टाकीत नाही. डिंभापासून (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेपासून) प्रौढावस्था येईपर्यंत पुष्कळ कीटक निरनिराळ्या अवस्थांतून जातात. या सगळ्या प्रक्रियेला रूपांतरण म्हणतात आणि ते होत असताना कित्येकदा निर्मोचन होते. निर्मोचन आणि रूपांतरण हॉर्मोनांच्या (उत्तेजक अंतःस्त्रावांच्या) नियंत्रणाखाली असतात. कीटकाच्या मेंदूंतील काही विशेषित कोशिकांच्या एका समूहापासून स्रवलेल्या हॉर्मोनाच्या योगाने कीटकाच्या निर्मोचन क्रियेला सुरुवात होते. या हॉर्मोनाच्या क्रियेने अग्र वक्षीय (कीटकाच्या छातीत अगदी पुढच्या तीन कायखंडांवरील) ग्रंथी एक हॉर्मोन स्रवते व या दुसऱ्या हॉर्मोनामुळे प्रत्यक्ष निर्मोचनाला आरंभ होतो.

उभयचर : प्रौढ बेडूक, भेक आणि इतर उभयचर बहुधा महिन्यातून एकदा कात टाकतात. या प्रक्रियेत फक्त बाह्यत्वचा-कोशिकांचा अगदी बाहेरचा थर काढून टाकला जातो आणि या क्रियेला थोडे तासच पुरेसे असतात. काढून टाकलेली त्वचा प्राणी बहुधा खातो. ⇨ अवटू ग्रंथीच्या हॉर्मोनाच्या अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) निर्मोचन घडवून आणता येते त्याचप्रमाणे अवटू ग्रंथी जर काढून टाकली, तर उभयचर कात टाकू शकत नाहीत.

सरीसृप : सगळ्या सरीसृपांची कातडी शुष्क असते. बाह्यत्वचा स्तरित असते. तिचे बाहेरचे थर शृंगित (शिंगाच्या द्रव्यासारख्या द्रव्यापासून बनलेले) असून शरीरावरील आवरण त्यांचे बनलेले असते. सरीसृपांपैकी सरड्यांच्या शरीरावरील शृंगित बाह्यत्वचेचे आवरण अधूनमधून निघून जाते. साप वर्षातून २–६ वेळा कात टाकतात. कात टाकण्यापूर्वी बाह्यत्वचा–कोशिका जुन्या उपत्वचेखाली नवी उपत्वचा उत्पन्न करतात. नंतर जुन्या उपत्वचेच्या बुडाशी असणाऱ्या कोशिका नाश पावल्यामुळे आणि नव्या व जुन्या स्तरांच्या मध्ये ओलावा उत्पन्न झाल्यामुळे जुनी उपत्वचा सैल होते. लहान पाय असलेले किंवा पादरहित सरडे आणि साप यांची सगळी कात (उपत्वचा) एकदम निघून येते परंतु काही सरड्यांमध्ये ती तुकड्यातुकड्यांनी गळून पडते. कासव आणि मगर कात टाकीत नाहीत पण त्यांचे बाह्यपृष्ठ हळूहळू झिजते आणि ही झीज भरून येते.

पक्षी : पक्ष्यांच्या अंगावर पिसांचे आवरण असते व ते सामान्यतः दर वर्षी निघून जाऊन त्याच्या जागी नवे उत्पन्न होते. हेच पक्ष्यांचे कात टाकणे होय. पक्ष्यांच्या निरनिराळ्या जातींत कात टाकण्याच्या क्रियेत बराच फरक दिसून येतो. पुष्कळ पक्षी वर्षांतून एकदाच कात टाकतात. ही प्रक्रिया कित्येक आठवडे चालू असते. ती व्यवस्थित आणि क्रमाक्रमाने होणारी असल्यामुळे शरीराचा कोणताही भाग उघडा पडत नाही. शेपटी व पंख यांवरील पिसे जोडीजोडीने (एका पंखातील एक पीस आणि दुसऱ्या पंखातील त्याच्याच जोडीचे पीस याप्रमाणे) निघून जातात. यामुळे उड्डाणात व्यत्यय येत नाही. हंस, बदक वगैरे पक्ष्यांच्या पंखांची सगळी पिसे एकाच वेळी गळून पडत असल्यामुळे त्यांच्या जागी नवी पिसे येईपर्यंत त्यांना उडता येत नाही.

पक्षी बहुधा प्रजोत्पादनाच्या काळानंतर कात टाकतात. काही पक्षी विणीच्या हंगामाच्या आधी वसंत ऋतूत आणखी एकदा (दुसऱ्यांदा) कात टाकतात. एकाच कुलातील काही पक्षी वर्षातून एकदाच कात टाकतात (उदा., चंडोल), तर पिपिट पक्ष्यांसारखे काही दोनदा कात टाकतात. टार्मिगन वर्षातून तीनदा कात टाकतो. पक्ष्यांच्या कात टाकण्याच्या क्रियेवर अवटू ग्रंथीच्या हॉर्मोनाचे नियंत्रण असते.

सस्तन प्राणी : बहुतेक सस्तन प्राण्यांच्या शरीरावरच्या केसांचे आवरण क्रमाक्रमाने ठराविक काळात गळून जाऊन त्याच्या जागी नवे उत्पन्न होते. सामान्यतः ही क्रिया शरद ऋतूत घडून येते आणि केसांचे नवे आवरण हिवाळ्यात थंडीपासून बचाव करते. मृग आणि इतर काही प्राण्यांत वसंत ऋतूत देखील केसांचे आवरण गळून जाऊन त्याच्या जागी उन्हाळ्याकरिता विरळ केसांचे आवरण तयार होते. अगदी उत्तरेकडील प्रदेशात वीझल आणि ससे यांच्या शरीरावर उन्हाळ्यात तपकिरी केसांचे आवरण असते पण बर्फ पडू लागण्याच्या सुमारास तपकिरी केसांच्या जागी पांढरे स्वच्छ केस येतात.

मनुष्य : मनुष्याच्या शरीरावरील सगळे केस अधूनमधून गळून पडतात व त्यांच्या जागी नवे येतात. भुवया व पापण्या यांच्यावरील केस काही महिन्यांच्या अंतराने नवे येत असतात. डोक्यावरचे सगळे केस ४–५ वर्षांत नवे येतात.

कर्वे, ज. नी.