निरुत्थ : न उठणारे–जिवंत न होणारे–पूर्ण मेलेले, धातू, भस्म. पंचमित्र व धातुभस्म एकत्र करून मुशीत योग्य अग्नी दिल्यावर भस्म झालेली धातू जर पुन्हा तयार झाली, तर ते भस्म उत्थित म्हणतात. ती धातू पुन्हा तयार झाली नाही, तर ते भस्म निरुत्थ म्हणतात. असे भस्म शरीरात निःशल्य राहून त्याचे कार्य करते.
ही एक भस्म योग्य झाल्याची परीक्षा आहे. भस्म जसे निरुत्थ तसेच ते मृदू, जलतर, रेखाप्रवेशी असले पाहिजे. दातांखाली ते चावले असता कचकच न लागता केवडीच्या फुलातील परागांप्रमाणे मऊ लागले पाहिजे. पाण्यावर तरले पाहिजे, नव्हे त्या तरलेल्या भस्मावर गव्हाचा दाणा ठेवला, तर तो हंसासारखा वर राहिला पाहिजे. तसेच ते आंगठ्याच्या पाठीमागच्या त्वचेवर घासले, तर तेथल्या रेषांमध्ये भरले गेले पाहिजे. कणरूपाने बाहेर पडले न पाहिजे.
धातू, उपधातू, रत्नोपरत्ने इ. जे पार्थिव कठीण, जड, स्थूल पदार्थ हे अन्नाइतके मऊ सूक्ष्म, हलके पोटात गेले पाहिजेत तर ते उपकारक होऊ शकतात. तरीही हे पदार्थ अन्नासारखे होऊ शकत नाहीत, ते मृत असले तरी ते शरीराच्या दृष्टीने अमृत होणे जरूर आहे. म्हणून अमृतीकरण संस्कार अत्यावश्यक असतो. अन्न मृत नसते, अमृत असते. नित्य आहारात येणारे व शारीर घटकांची उच्च प्रत निर्माण करणाऱ्या गायीचे तूप, त्रिफला इ. पदार्थांत घालून शिजवून ते घ्यावे लागते. पार्थिव पदार्थ मानवी शरीराला अतिदूर वनस्पतींपेक्षा दूर म्हणून ते शरीरात गेल्याबरोबर वनस्पती प्राणिज प्रदार्थांप्रमाणे जवळचे वाटले पाहिजेत. म्हणून ते पुन्हा या दृष्टीने अमृत करावयाचे असते. शिवाय ते घेताना रोगकर दोषांना मारक अशा मध, तूप, गूळ, दूध इ. आहार्य द्रव्यांबरोबर शरीर ज्यांचे नित्य स्वागत करते, आपले मानते अशा दृढ परिचित पदार्थांबरोबर शरीरात पाठविले पाहिजे. भस्मादि औषधे ज्यांच्याबरोबर पोटात घेतली जातात त्या त्या पदार्थांना अनुपान म्हणतात.
पार्थिव पदार्थ शरीरात घालताना त्याने अपाय होऊ नये म्हणून व तो आत्मसात व्हावा म्हणून इतके सर्व करावे लागते.
जोशी, वेणीमाधवशास्त्री