चेन, सर एर्न्स्ट बोरिस: (१९ जून १९०६ —    ) जर्मन-इंग्लिश जीवरसायनशास्त्रज्ञ. १९४५ सालच्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म बर्लिन येथे झाला. १९३० मध्ये फ्रीड्रिख-व्हिल्हेल्म विद्यापीठाची रसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान या विषयांतील पदवी मिळविल्यानंतर त्यांनी बर्लिनमधील एका रुग्णालयात १९३० ३३ या काळात एंझाइमांवर (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगांवर) संशोधन केले. नाझींच्या वांशिक धोरणामुळे १९३३ साली ते इंग्लंडला गेले व केंब्रिज येथील जीवरसायनशास्त्र संस्थेत हॉपकिन्स यांच्या हाताखाली त्यांनी संशोधन केले. ऑक्सफर्ड येथील विल्यम डन स्कूल ऑफ पॅथॉलॉजी या संस्थेतही त्यांनी संशोधन केले. १९३६–४८ या काळात ते ऑक्सफर्ड विद्यापीठात रासायनिक विकृतिविज्ञानाचे (रोग उद्‌भवल्यामुळे शरीरात होणाऱ्या रासायनिक बदलांच्या अभ्यासाच्या शास्त्राचे) प्रयोगनिदर्शक व व्याख्याते होते. त्यानंतर १९४८–६१ मध्ये ते रोम येथील रासायनिक सूक्ष्मजीवशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेचे वैज्ञानिक संचालक होते. १९६१ साली ते लंडन येथील इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स या संस्थेत जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९७३ पासून ते त्याच संस्थेत सन्माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

चेन व हॉवर्ड फ्लोरी  यांनी १९३९ मध्ये पेनिसिलिनासंबंधी संशोधन करण्यास प्रारंभ केला. त्यापूर्वी नऊ वर्षे अगोदर ॲलेक्झांडर फ्लेमिंग  यांनी पेनिसिलिनाचा शोध लावलेला होता. चेन व फ्लोरी यांनी पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात तयार करून ते एक प्रभावी औषध असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनामुळे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या संशोधनाचा पाया घातला गेला. या कार्याकरिताच चेन यांना फ्लोरी व फ्लेमिंग यांच्या बरोबर नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

नोबेल पारितोषिकाखेरीज बर्झीलियस पदक (१९४६), पाश्चर पदक (१९४६) इ. अनेक पदके आणि पारितोषिके, तसेच अनेक देशांतील विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत. ते रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (भारत) इ. अनेक संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत. १९६९ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब मिळाला. जीवरसायनशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांतील त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झालेले असून त्यांतील पेनिसिलीन आणि प्रतिजैव पदार्थ या विषयांवरील निबंध महत्त्वाचे ठरले आहेत.

भालेराव, य. त्र्यं.