निमीलन सूक्ष्मदर्शक : एक ज्योतिषशास्त्रीय साहाय्यक उपकरण. यामध्ये सूक्ष्मदर्शक, भिंग, लोलक, छायाचित्रे ठेवण्याचे आधार व प्रकाशाचा उद्‌गम (दिवा) यांची विशेष काळजीपूर्वक मांडणी केलेली असते. या उपकरणात आकाशातील एकाच विवक्षित तारा-क्षेत्राची दोन छायाचित्रे वापरतात, मात्र ही छायाचित्रे भिन्न काळी घेतलेली असतात. ही जवळजवळ सारखीच असतात, पण छायाचित्रे घेण्याच्या दरम्यानच्या काळात जर एखादा तारा हलला असेल, तेज कमीअधिक झाले असेल, किंवा नवीन खस्थ पदार्थ दिसू लागला असेल, तर ही छायाचित्रे किंचित वेगळी असू शकतात. या उपकरणात ही छायचित्रे समोर ठेवून एका वेळी एका डोळ्याने एक आणि दुसऱ्या डोळ्याने दुसरे अशी पाहून त्रिमितदर्शकाप्रमाणे [⟶ त्रिमितिदर्शन] एकच प्रतिमा दिसेपर्यंत उपकरण जुळवून घेतात. दोन छायाचित्रांतील अल्प फरक ओळखण्यासाठी एक यांत्रिक निमीलन-

प्रयुक्ती या उपकरणात असते. तिच्यामुळे एक सेकंदात ३–४ वेळा बदल होईल इतक्या जलदपणे एकापाठोपाठ एक छायाचित्रे झाकली-उघडली (निमीलन) जातात. चित्रे घेण्यामध्ये लोटलेल्या काळात खस्थ पदार्थांच्या स्थितीत किंवा दीप्तीत झालेला बदल या उपकरणाने निरीक्षण करताना भासमान सापेक्ष हालचालींनी ओळखता येतो. उदा., तेवढ्या काळात जर एखादा तारा हलला असेल, तर तो निमीलनामुळे मागे-पुढे हलताना दिसेल. तसेच एखाद्या ताऱ्याच्या तेजात फरक झाला असेल, तर तो डोळ्यांची उघडझाप करावी तसा स्पंदन पावल्यासारखा दिसेल. एखादा ग्रह, धूमकेतू नव्यानेच आला असेल, तर त्याचे अस्तित्व या उपकरणाने चटकन कळून येते. कुबेर (प्लुटो) या ग्रहाचे अस्तित्व असेच कळून आले. याच तऱ्हेने लघुग्रह (मंगळ आणि गुरू यांच्या कक्षांच्या दरम्यान असलेले छोटे ग्रह), चलतारे, जास्त निजगती (निरीक्षकाच्या दृष्टिरेषेला लंब दिशेत असणारा ताऱ्याच्या स्वत:च्या गतीचा घटक) असणारे तारे इ. ओळखून काढता येतात. कित्येक वर्षांच्या अंतराने घेतलेल्या छायाचित्राने या उपकरणाच्या साहाय्याने निरीक्षण केले, तर ताऱ्यांच्या निजगतीचा अभ्यास करता येतो.

ठाकूर, अ. ना.