निचर्डी : (लॅ. ट्रायंफेटा ऱ्हाँबॉइडिया व ट्रा. रोटुंडिफोलिया कुल-टिलिएसी). हे मराठी नाव एकाच वंशातील दोन वनस्पतींना लावलेले आढळते तसेच त्याच वंशातील तिसऱ्या एका जातीलाही (ट्रा. पायलोजा) ते लावतात. या तिन्ही जाती भारतात जंगली अवस्थेत आढळतात आणि त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी असली, तरी त्यांत किरकोळ फरक आहेत. या लहानमोठ्या ⇨ ओषधी किंवा लहान झुडपे असून त्यांवर तारकाकृती लव असते सर्व अवयवांत श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य असते. पाने साधी व एकाआड एक, लहान, दातेरी किंवा अखंड अथवा थोडीफार (३–५ खंडे असलेली) खंडित (विभागलेली) असतात. फुले द्विलिंगी, लहान, पिवळी, पानांच्या बगलेत किंवा त्यांच्या समोर थोड्या किंवा अनेकांच्या झुबक्यांनी सप्टेंबर ते नोव्हेंबरात येतात. बोंडे (फळे) गोलसर, काटेरी व लहान (०·४–०·६ सेंमी. व्यासाची) असून त्यांत सु. आठ, गुळगुळीत व भुरकट बिया असतात. फुलांची संचरना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ टिलिएसी कुलात (परुषक कुलात) वर्णिल्याप्रमाणे. ट्रा. ऱ्हाँबॉइडिया हिला हिंदीत ‘चिकटा’ म्हणतात. जंगलात हिंडून परत आल्यावर हिची अनेक फळे कपड्यास चिकटलेली आढळतात. त्यावरून वा तिच्यातील चिकट द्रव्यामुळे हे नाव पडले असावे. हिच्या व ट्रा. रोटुंडिफोलियाच्या खोडातील सालीपासून मऊ आणि चकचकीत धागा मिळतो तो दोऱ्या व जाडेभरडे कापड बनविण्यास वापरतात तसेच चिकटा औषधी आहे.
निचर्डीची पाने, फुले व फळे शामक (शांत करणारी) व स्तंभक (आकुंचन करणारी) असून परम्यावर देतात. मूळ कडू व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून प्रसूती लवकर होण्यास त्याचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) गरम करून देतात. साल व पाने अतिसार आणि आमांश यांवर देतात.
जमदाडे, ज. वि.
“