नारायण, आर्. के. : (१० ऑक्टोबर १९०६– ). विख्यात इंडो-अँग्लिअन कादंबरीकार आणि कथाकार. संपूर्ण नाव, राशिपुरम कृष्णस्वामी नारायण. राशिपुरम किंवा रासीपूर हा सालेम जिल्ह्यातील एक तालुका. नारायण ह्यांचे पूर्वज तेथे राहत असत. नारायण यांचा जन्म मद्रास शहरी झाला. त्यांचा जन्म झाल्यानंतर लवकरच त्यांचे वडील कृष्णस्वामी ह्यांना म्हैसूरमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यांनी आपले कुटुंब तेथे नेले. १९३० मध्ये म्हैसूरच्या ‘महाराज कॉलेजा’तून नारायण पदवीधर झाले. त्यानंतर प्रथम म्हैसूर येथील सचिवालयात आणि नंतर काही दिवस शिक्षक म्हणून एका शाळेत नोकरी केल्यानंतर केवळ लेखनावर जगण्याचा निर्णय नारायण ह्यांनी घेतला. स्वामी अँड फ्रेंड्स (१९३५) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर द बॅचलर ऑफ आर्ट्स (१९३७), द डार्क रूम (१९३८), द इंग्लिश टीचर (१९४६), वेटिंग फॉर द महात्मा (१९५५), द गाइड (१९५८), मॅनईटर ऑफ मालगुडी (१९६२), द व्हेंडॉर ऑफ स्वीट्स (१९६७) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘मालगुडी’ नावाचे एक दक्षिण भारतीय गाव कल्पून त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्या रचिल्या आहेत. ह्या गावातील मध्यम आणि कनिष्ठ वर्गीयांचे वास्तववादी चित्रण करीत असताना, सरळ, साध्या आयुष्यातही आढळणारे नाट्य आणि विक्षिप्तपणा त्यांनी कौशल्याने टिपला आहे. साधी पण प्रसंगी वक्रोक्तियुक्त भाषाशैली व रचनासौष्ठव ही त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची उल्लेखनीय वैशिष्ट्ये. द गाइड ही त्यांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती. प्रवाशांचा ‘गाइड’ म्हणून काम करणाऱ्या राजूची ही कहाणी. खेडुतांच्या अंधश्रद्धेमुळे तो साधू बनतो पण पुढे त्या साधुत्वाच्या ओझ्याखाली चिरडून मरतो. आपल्या व्याजोक्तिपूर्ण, शैलीत त्यांनी ही कहाणी घाटदारपणे मांडलेली आहे. ह्या कादंबरीवरचा गाइड (हिंदी व इंग्रजी) हा चित्रपटही गाजला. १९६० साली ह्या कादंबरीस साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. नारायण ह्यांच्या कादंबरीलेखनाची वैशिष्ट्ये त्यांच्या कथांतही उतरलेली आहेत. ॲन अस्ट्रॉलॉजर्स डे (१९४७) आणि लॉली रोड (१९५६) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय कथासंग्रह होत.
संदर्भ : Sundaram, P. S. R. K. Narayan, London, 1973.
नाईक, म. कृ.
“