नायटा : विशिष्ट कवकसंसर्गामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या संसर्गामुळे) होणाऱ्या त्वचारोगाला सर्वसाधारण भाषेत ‘नायटा’म्हणतात. अंगावर गोलाकार उमटलेला त्वचेवरील चकंदळ दर्शविण्याचा त्यात प्रामुख्याने उद्देश असतो. दद्रू, ⇨गजकर्ण आणि नायटा ही जवळजवळ एकाच त्वचारोगाची निरनिराळी नावे असून शरीराच्या कोणत्या भागावर लक्षणे प्रामुख्याने आढळतात त्यावरून त्यांचे वर्गीकरण करतात.
अलीकडील संशोधनावरून आर्. एल्. बेअर आणि एम्. बी.सल्झबर्गर यांनी असे दाखवून दिले आहे की, ⇨कवकसंसर्ग रोग बहुतकरून सुग्राह्यता असणाऱ्या (रोग होण्याच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या) व्यक्तींना आणि तेही विशिष्ट शरीरभागावरच होतात. याशिवाय कवके ही रोगाचे दुय्यम अथवा अनाग्रहीकारक (रोगोत्पादक असूनही फक्त काही वेळाच रोगास कारणीभूत होणारे) असल्याचेही मान्य झाले आहे. आघात, मसृणीकरण (द्रवामध्ये भिजल्यामुळे ऊतक पेशीसमूह-मऊ होणे), ऊब, शरीरभागावर पडणारा अपुरा सूर्यप्रकाश आणि तेथे असणारी शुद्ध हवेची कमतरता, इतर सूक्ष्मजंतूंचे संक्रामण आणि शारीरिक दुर्बलता ही कवकसंसर्ग रोगाची साहाय्यक कारणे असल्याचेही दिसून आले आहे. वरील कारणांमुळे रोगी माणसाच्या निकट सहवासात असूनही त्यांपैकी फक्त काही व्यक्तींनाच हा रोग का होतो हे सहज समजते.
नायट्याच्या वा गजकर्णाच्या चकंदळांची कड खरवडून घेऊन, ती काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास रोगकारक कवकप्रकार ओळखता येतो. खरवडलेला भाग १५% पोटॅशियम हायड्रॉक्साइडाच्या कोमट थेंबभर विद्रावात भिजवून काचपट्टीवर ठेवून त्यावर आच्छादक काच ठेवून तपासतात. लस उत्पन्न होणाऱ्या प्रकारात लस अशाच प्रकारे तपासता येते. प्रयोगशाळेत संवर्धन करूनही रोगोत्पादक कवकप्रकार ओळखता येतात.
चेहऱ्यावरील दाढीचे आणि मिशीचे केस असणाऱ्या भागावरील कवकजन्य त्वचाविकृतीला ‘श्मश्रुकवक रोग’ म्हणतात. नखावर परिणाम करणाऱ्या विकृतीला ‘नखदद्रू’ म्हणतात. पोलंड, रशिया, यूरोपचा दक्षिणपूर्व भाग आणि द. आफ्रिका या देशांतून डोक्याच्या शिरोवल्क भागाला होणाऱ्या कवकजन्य रोगाला ‘टीनिया फेवस’ किंवा ‘फेवस’ म्हणतात. हा रोग ट्रायकोफायटॉन शोएनलिनाय नावाच्या कवकप्रकारापासून होतो. यामध्ये पांढरा लोण्यासारखा स्त्राव सर्व डोक्यावर पसरतो व डोके पांढरे दिसू लागते. द. आफ्रिकेत तर त्यास ‘विटकॉप अथवा पाढरे डोके’ असेच म्हणतात. कवकसंसर्ग रोग या नोंदीत ‘जंघीय दद्रू’ म्हणून वर्णिलेला प्रकार संभोगाच्या वेळी एकाचा दुसऱ्यास होण्याची शक्यता असते. तसेच हा प्रकार धोब्याकडे दिलेल्या कपड्यातून फैलावत असल्यामुळे त्यास ‘धोबी खाज’ असेही म्हणतात.
बहुतेक सर्व कवकसंसर्ग रोगांवर ग्रिझिओफलव्हीन हे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषध गुणकारी ठरले आहे. मात्र ‘पाददद्रू’ प्रकारात या औषधासहित स्थानीय कवकनाशक औषधे उदा., टोलनाफटेट १% बाहेरूनही लावल्याशिवाय तो बरा होत नाही. नखदद्रुसारख्या चिकट प्रकारावर ग्रिझिओफलव्हीन तोंडाने २५० मिग्रॅ. मात्रेत दिवसातून चार वेळा काही वर्षे दिल्यास तोही रोग संपूर्ण बरा होतो.
संदर्भ : 1. Behl, Pran Nath, Practice of Dermatology, Bombay, 1962.
2.Sulzburger, M. B. and Others, Dermatology : Diagnosis and Treatment, Calcutta,1965.
भालेराव, य. त्र्यं.
“