नान्सेन, फ्रित्यॉफ : (१० ऑक्टोबर १८६१ – १३ मे १९३०). उत्तर ध्रुवप्रदेशाचा नॉर्वेजियन समन्वेषक, शास्त्रज्ञ, मानवतावादी मुत्सद्दी आणि नोबेल शांतता पारितोषिक विजेता. ऑस्लोजवळच्या फ्रोएन येथे याचा जन्म झाला. क्रिस्तियाना (ऑस्लो) व इटलीतील नेपल्स येथे त्याने प्राणिशास्त्राचा अभ्यास व संशोधन केले. शिकार, मासेमारी, चपळाईचे व बर्फावरील खेळ यांतील प्रावीण्याचा त्याला पुढे फार उपयोग झाला. १८८२ मधील ग्रीनलंड समुद्रावरील सफरीनंतर १८८८-८९ मध्ये त्याने पाच सहकाऱ्यांसह, पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत मधला २,७१९ मी.चा हिमाच्छादित सर्वोच्च भाग ओलांडून, ग्रीनलंड पार केले. त्यामुळे ग्रीनलंडच्या अंतर्भागाची माहिती मिळून आर्क्टिक समन्वेषणाच्या तंत्राबद्दलच्या त्याच्या संकल्पनांस बळकटी आली. गॉट्‌हॉपला हिवाळा काढावा लागला, तेव्हा त्याने एस्किमोंच्या जीवनाचा अभ्यास केला व परतल्यावर त्यासंबंधी पुस्तक लिहिले. त्यामुळे त्याचा बोलबालाझाला. बेरिंगच्या सामुद्रधुनीजवळ फुटलेल्या नौकेचे अवशेष ग्रीनलंडजवळ वाहत आलेले पाहून वाहत्या हिमखंडांबरोबर उत्तरध्रुवास जाण्याची योजना त्याने मांडली. चिकाटीने पैसा उभा करून ‘फ्राम’ ही खास नौका बांधवून घेऊन तेरा सहकाऱ्यांसह जून १८९३ मध्ये तो निघाला. सप्टेंबरमध्ये हिमखंडांनी नौका वेढल्यावर ती एका हिमखंडास बांधून तो १४ मार्च १८९५ रोजी ८४°. येथे पोहोचला. मग नौका सोडून एका सहकाऱ्यानिशी कुत्र्यांच्या घसरगाड्यांवरून ८६°१३ उ. पर्यंत गेल्यावर त्याला परतावे लागले. तोपर्यंत उत्तरध्रुवाच्या इतके जवळ कोणीही पोहोचले नव्हते. फ्रान्झ जोझेफ बेटावर हिवाळा काढून वाटेत भेटलेल्या जॅक्सन हार्म्सवर्थ मोहिमेबरोबर ऑगस्ट १८९६ मध्ये तो नॉर्वेला परतला. आठच दिवसांनी ८५°५७. पर्यंत गेलेली फ्रामही परतली. या मोहिमेमुळे नान्सेनला मोठाच नावलौकिक व मानसन्मान मिळाला. १९०० मध्ये त्याने उत्तर समुद्र समन्वेषणात भाग घेतला. १९१० ते १९१४ पर्यंत त्याने उत्तर अटलांटिक व आर्क्टिक महासागरांत चार मोहिमा केल्या.

नान्सेन बर्गेनच्या निसर्गेतिहास संग्रहालयाचा (१८८२) व क्रिस्तियाना विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र संग्रहालयाचा (१८८९) अभिरक्षक व त्याच विद्यापीठात प्रथम प्राणिशास्त्राचा व १९०८ नंतर महासागरविज्ञानाचा प्राध्यापक होता. १८८७ मध्ये त्या विद्यापीठाने त्याला पीएच्. डी.पदवी दिली. १८९६ ते १९१७ पर्यंत त्याने शास्त्रीय संशोधनास वाहून घेतले होते. महासागर संशोधनविषयक संस्थांचा संचालक, संस्थापक, अध्यक्ष इ. पदे त्याने भूषविली. संशोधन उपकरणांची निर्मिती व त्यांत सुधारणा, हिमखंडांचे वहन, समुद्रप्रवाहांचे स्पष्टीकरण, आर्क्टिक पाण्याची वैशिष्ट्ये, आर्क्टिकमधील नान्सेन बेसिनचे समन्वेषण, महासागर विज्ञान, प्राणिशास्त्र व इतर ही विषयांवर विपुल लेखन हे त्याचे शास्त्रीय क्षेत्रातील कार्य होय.

व्यक्ती व राष्ट्रयांच्या संबंधांबद्दलचे त्याचे विचार मानवतावादी होते. स्वीडनच्या साम्राज्यातून नॉर्वेची मुक्तता (१९०५) करण्यातील सहभागी, नॉर्वेचा लंडनमधील पहिला मंत्री (१९०६–०८), १९१७ मध्ये अमेरिकेस व १९२० मध्ये राष्ट्रसंघाच्या पहिल्या बैठकीस गेलेल्या नॉर्वेच्या शिष्टमंडळांचा नेता, पहिल्या महायुद्धानंतर रशियातील ५,००,००० युद्धबंदींचे  स्वदेश प्रत्यावर्तन व रशियातील दुष्काळग्रस्तांस व आश्रयार्थींस साह्य यांसाठी राष्ट्रसंघाने आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीने नेमलेला महाआयुक्त या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्याने त्याला १९२२ चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. ऑस्लोजवळ ल्यूसाकर येथे स्वतःच्या घरी नान्सेन मृत्यू पावला. १९३१ मध्ये जिनीव्हा येथे आश्रयार्थींसाठी स्थापिलेल्या ‘नान्सेन आंतरराष्ट्रीय कार्यालया’ला १९३८ चे नोबेल शांतता पारितोषिक मिळाले.

शाह,र.रु.